विसर्गात घट, गोदावरीचा पूर ओसरला

विसर्गात घट, गोदावरीचा पूर ओसरला
विसर्गात घट, गोदावरीचा पूर ओसरला

औरंगाबाद : नांदूरमध्यमेश्‍वर, नागमठानमधून होणारा पाण्याचा विसर्ग घटल्याने बुधवारी (ता. ७) दुपारनंतर वैजापूर व गंगापूर तालुक्‍यात गोदावरीतील पुराचे पाणी ओसरण्यास सुरवात झाली. शिवाय या घटलेल्या विसर्गाचा परिणाम जायकवाडी प्रकल्पात होणाऱ्या प्रत्यक्ष आवकेच्या प्रमाणावरही झाला. त्यामुळे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास १ लाख ५१ हजार क्‍युसेकने सुरू असलेली पाण्याची आवक दुपारी २ वाजताच्या सुमारास १ लाख २४ हजार क्‍युसेकपर्यंत खाली आली.  

नाशिक जिल्ह्यातील पश्‍चिम भागात झालेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला. नांदूर मध्यमेश्‍वर व नागमठाणमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे वैजापूर व गंगापूर तालुक्‍यांतून वाहणारी गोदावरी नदी अनेक ठिकाणी पात्र सोडून वाहत असल्याचे चित्र होते. मंगळवारी (ता. ६) दुपारी तीन वाजेपर्यंत नागमठणामधून सुरू असलेल्या दीड लाख क्‍युसेकपेक्षा जास्त विसर्गामुळे वैजापूर व गंगापूर तालुक्‍यांतील नदीकाठच्या २५ गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला. प्रसंगावधान ओळखून दोन्ही तालुक्‍यातील जवळपास अठरा गावांमधील पाचशे कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

आपत्ती निवारण पथक व जिल्हास्तरीय बचाव पथक कार्यरत होते. नागमठाणमधून पाण्याचा विसर्ग बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ६९ हजार क्‍युसेकवर, नांदूर मध्यमेश्‍वरमधून बुधवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास ४१ हजार ७६ क्‍युसेकपर्यंत खाली आल्याची माहिती पूरनियंत्रण कक्षातर्फे देण्यात आली. 

पिकांचे मोठे नुकसान

पूर ओसरणे सुरू असले, तरी या पुराने शेतीपिकाचे मोठे नुकसान केले आहे. गाळपेऱ्यातील आशेने पेरलेली पिके पाण्याखाली गेली. वैजापूर तालुक्‍यातील नदीकाठच्या पिकांचेही पुराने नुकसान केले. वैजापूर तालुक्‍यात पूरबाधितांना पिण्याच्या पाण्याची व राशनची व्यवस्था करण्याचे काम सुरू होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com