सावधान, परभणी, नांदेड जिल्ह्यांत कपाशीवर गुलाबी बोंड अळी

गुलाबी बोंडअळी
गुलाबी बोंडअळी

परभणी ः यंदाच्या खरीप हंगामात जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये लागवड केलेल्या बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. मांडाखळी (ता. परभणी) शिवारातील कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  नांदेड जिल्ह्यातील जांभरुन (ता. अर्धापूर) येथील शेतकऱ्यांच्या शेतावर गुलाबी बोंड अळी आढळून आली असल्याचे कापूस संशोधन केंद्रातील सूत्रांनी सांगितले. मांडाखळी (ता. परभणी) येथील शेख मोबीन अडीच एकर तर मारुती राऊत यांनी दीड एकर क्षेत्रावर यंदाच्या खरीप हंगामात १० जून रोजी कापूस लागवड केली. कपाशीचे पीक पाते, फुले अवस्थेत आहे.  या शेतकऱ्यांनी गेल्या तीन चार दिवसांत कपाशीच्या पिकांची निरीक्षणे घेतली असता ८ ते १० कपशीच्या झाडांवर गुलाबी बोंड अळी आढळून आली. ळीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती समजताच शुक्रवारी (ता. २६) परभणी जिल्हा दौऱ्यावर असलेले कृषी आयुक्तालयातील उपसंचालक पांडुरंग शिगेदार, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, कृषी पर्यवेक्षक संजय पामे, क्रॅापसॅपचे आर. के. सय्यद, कृषी सहायक प्रशांत देवकर, भगवान शिंदे कृष्णा पाटील-रेंगे, शेतकरी महादेव राऊत, किशन कने, ईश्वर डोळसे, अशोक शिराळ, कल्याण शिराळ आदीच्या उपस्थितीत कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे रॅन्डम सर्वेक्षण करण्यात आले. या वेळी १५ ते २० डोमकळ्या आढळून आल्या. मांडाखळी येथील ४ ते ५ शेतकऱ्यांच्या सुमारे १० एकरवरील कपाशीवरील गुलाबी बोंड अळीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे. या वेळी गुलाबी बोंड अळीग्रस्त कपाशीच्या पिकांमध्ये कामगंध सापळे लावण्यात आले.  बोंड अळी प्रादुर्भावग्रस्त कपाशीच्या पिकांतील डोमकळ्या हाताने तोडून नष्ट कराव्यात. अद्याप प्रादुर्भाव न झालेल्या कपाशीवर ५ टक्के निंबोळीअर्क तसेच शिफारशीत कीटकनाशकांची कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी. बोंड अळी नियंत्रणासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला. अर्धापूर तालुक्यात प्रादुर्भाव नांदेड जिल्ह्यातील जांभरुन (ता. अर्धापूर) येथील शेतकरी शिवाजी पोतेवार यांच्या जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. पोतेवार यांच्या कपाशीमध्ये लावलेल्या कामगंध सापळ्यामध्ये २४ ते ३० जून असे सलग सहा दिवस गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळून आले होते. १९ जुलै पासून ८ ते१० पतंग आढळून येत आहेत. जाभंरुण येथील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानअंतर्गत गुलाबी बोंड अळी नियंत्रण प्रकल्पांतर्गत कामगंध सापळे, कडूनींब अर्क आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठअंतर्गत नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी तेलंग यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com