शेततळे अस्तरीकरणासाठी १५६ कोटी निधी उपलब्ध

plastic paper
plastic paper

पुणे ः शेततळ्यांमध्ये पाणी साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या शेततळे प्लॅस्टिक फिल्म अस्तरीकरणासाठी शेतकऱ्यांकडून मागणी वाढत आहे. त्यामुळे शासनाने कृषी सिंचन योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १५६ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये पुणे विभागासाठी सर्वाधिक ५६ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे राज्यातील सुमारे सात हजार शेतळ्यांच्या अस्तरीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. दुष्काळी भागात उत्पादनवाढीसाठी आणि फळबागांना शाश्वत पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मागील काही वर्षांत शेतकऱ्यांनी शेततळ्यावर भर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, मागेल त्याला शेततळे, भरडधान्य अभियान, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, कोरडवाहू शेती अभियान, गळीतधान्य अभियान तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत सामूहिक शेततळे व इतर योजनांतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणात शेततळे झाले आहेत. या योजनेअंतर्गत खोदकाम पूर्ण झालेल्या शेततळ्यामधील पाणी झिरपून जाऊ नये यासाठी प्लॅस्टिक फिल्म अस्तरीकरणासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून वैयक्तीक शेततळे अस्तरीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. यंदाही या योजनेतून शेततळ्यास योग्य दर्जाच्या प्लॅस्टिक फिल्मच्या अस्तरीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे शेततळ्यामध्ये पाण्याचा साठा उपलब्ध होऊन साठवलेले पाणी झिरपून जात नाही. तसेच फलोत्पादन पिकांसाठी दुष्काळी भागात संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण होते. या योजनेत शेततळ्यांच्या प्लॅस्टिक फिल्म अस्तरीकरणासाठी एकूण खर्चाच्या ५० टक्के अथवा जास्तीत जास्त ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते. चालू वर्षीही राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेततळे अस्तरीकरणासाठी ६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून पुणे विभागाकरिता २१.७३ कोटी रुपयांचा उपलब्ध झाला आहे. राज्यात विविध योजनांमधून निर्माण झालेल्या शेततळ्यांची गरज लक्षात घेऊन शेततळे अस्तरीकरणाच्या निधीसाठी शेतकऱ्यांची अधिक मागणी येत होती. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचा निधी वळविला कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी केंद्र शासनाच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या ‘प्रति थेंब अधिक पीक’अंतर्गत इतर घटकांसाठी उपलब्ध होणारा निधी शेततळे अस्तरीकरणासाठी वळविण्याचा आग्रह केंद्र सरकारकडे धरला होता. त्यानुसार शेततळे अस्तरीकरणासाठी ९६ कोटी ६६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यातील ३५ कोटी रुपयांचा निधी पुणे विभागासाठी उपलब्ध झाला. त्यामुळे शेततळ्यांच्या अस्तरीकरणाचे काम पूर्ण होणार असून, सिंचन क्षमता वाढणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com