सांगलीत पुरामुळे दूध संकलनात दीड लाख लिटरची घट

महापुराच्या तडाख्यातून बचावलेले पशुधन जपण्यासाठी शासनस्तरावरून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. चारा खाद्य उपलब्ध करून देण्यासह औषध उपचारांसाठी पशुसंवर्धन विभागाने विशेष मोहीम राबवली आहे. - डॉ. एस. ए. ढकाते, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, मिरज
दूध
दूध

सांगली ः कृष्णा - वारणा काठाला महापुराचा अभूतपूर्व फटका बसला. शेतीवर अवलंबून असणारे अवघे ग्रामीण अर्थकारण संकटात आले. महापुराच्या काळात पशुधनाचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावे लागले, तर त्याचवेळी पाण्यात शेती बुडाल्यामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व चाराटंचाईचा फटका दुभत्या पशुधनाला बसला. दुभत्या जनावरांची चांगलीच आबाळ झाली. त्यामुळे जिल्ह्यातील दूध संकलनात दीड लाख लिटरने कमी झाले आहे. सांगली जिल्ह्यातील १०४ गावांना महापुराचा मोठा फटका बसला. यामध्ये शेतकऱ्यांचे पशुधनही मोठ्या संख्येने वाहून गेले. महापूर ओसरल्यानंतर बचावलेले पशुधन वाचविण्यासाठी सध्या बळिराजाची धडपड सुरू आहे. शेत वाहून गेल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, गावागावांतील खाद्यपुरवठा करणारी खासगी दुकाने आणि सेवा संस्थांही पुराच्या धक्‍क्‍यातून अद्याप सावरलेल्या नाहीत. त्यामुळे जनावरांची सध्या चारा आणि खाद्याविना प्रचंड उपासमार सुरू आहे.  सांगली जिल्ह्यात जुलैअखेर सहकारी खासगी आणि बहुराज्य संस्थांकडून १० लाख ७४ हजार १५१ लिटर दुधाचे संकलन होत होते. परंतु, महापुरानंतर हेच संकलन ऑगस्ट महिन्यात ९ लाख ४३ हजार २८१ लिटर इतके कमी झाले आहे. दुधाच्या ताज्या पैशातून घरचा खर्च चालविणारी नदीकाठावर हजारो कुटुंबे आहेत. यामुळे दुधाच्या ताज्या पैशावर संसार चालवणाऱ्या हजारो कुटुंबांची आर्थिक कोंडी झाली आहे. पुरातून बचावलेले पशुधनही अडचणींच्या विळख्यात सापडल्याने पूरपट्ट्यातील बळिराजा हतबल झाला आहे.  दीडशे कोटींचा फटका एरवी जिल्ह्यात प्रतिदिन बारा ते साडेबारा लाख लिटरच्या दरम्यान दुधाचे संकलन होते. मात्र, महापुराच्या काळात प्रतिदिन सहा ते साडेसहा लाख लिटर दुधाचे संकलन होऊ शकले नव्हते. दुग्धउत्पादकांपासून ते दुग्धसंकलन करणारा, दुग्धव्यावसायिक या पैशावर तेजीत चालणारी बाजारपेठ या चक्राला महापुराने ‘ब्रेक’ लावला आहे. यातून दूधउत्पादकाला दीडशे कोटींचा किमान फटका सोसावा लागला होता.   दूध उत्पादन घटण्याची कारणे 

  • पूरकालावधीत जनावरांची झालेली उपासमार 
  • पुरानंतर हवामानातील बदलामुळे उद्‌भवलेले आजारपण 
  • सध्या जाणवणारा चारा, खाद्याचा तुटवडा 
  • जुलै २०१९ 

  • सहकारी : २ लाख ७८ हजार ७४६ लिटर 
  •  खासगी : ५ लाख ७० हजार ८३५ लिटर 
  •  बहुराज्य संस्था : २ लाख २४ हजार ५७० लिटर 
  • ऑगस्ट २०१९ 

  •  सहकारी : २ लाख ५४ हजार ३८८ लिटर 
  • खासगी : ५ लाख १६ हजार ३९२ लिटर 
  • बहुराज्य संस्था : १ लाख ७२ हजार ५०१ लिटर 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com