नगर जिल्ह्यातील वाटाणा उत्पादकांना वीस कोटींचा फटका

पारनेर तालुक्यासह राज्यात अनेक शेतकरी वाटाण्याचे उत्पादन घेत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने वाटाण्याचे मोठे नुकसान होत आहे. पीकविम्यात या पिकांचा समावेश नसल्याने मोठा आर्थिक फटका सोसावा लागत आहे. त्यामुळे वाटाणा पिकांचा प्रामुख्याने पीकविम्यात समावेश करावा. - प्रशांत गायकवाड, सभापती, बाजार समिती, पारनेर, जि. नगर
वाटाणा
वाटाणा

नगर ः वाटाणा उत्पादन घेणाऱ्या पारनेर तालुक्यातील जवळपास पस्तीस गावांत यंदा खरिपातील वाटाणा उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्याचे परिणाम दिसत आहेत. सुमारे वीस कोटी रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज शेतकरी आणि जाणकारांनी व्यक्त केला आहे.  या परिसरात अजूनही पुरेसा पाऊस नाही. त्यामुळे आता पुर्ण मदार परतीच्या पावसावर अवलंबून आहे. रब्बीत जर पुरेसा पाऊस झाला नाही, तर रब्बीतही वाटाणा उत्पादनाला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे नैसर्गिक लहरीमुळे नुकसान झाले तर, भरपाई मिळण्यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबवली असली तरी, वाटाण्याच्या पिकाचा मात्र पीकविम्यात समावेशच नसल्याने उत्पादक हवालदिल आहेत.  पुणे जिल्ह्यामधील सासवड तालुक्यात कित्येक वर्षांपासून घेतले जाणारे वाटाण्याचे पीक साधारण पंचवीस वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्‍यातील कान्हूर पठारच्या पठार भागात अनवधानाने घेणे सुरू झाले. या भागात पूर्वी कांदा व अन्य पिके घेतली जात. त्याची विक्री करण्यासाठी पुण्यात गेलेल्या शेतकऱ्यांनी वाटाण्याबाबत माहिती समजून घेतली आणि या भागात पीक घ्यायला सुरवात केली. सुरवातीला फक्त कान्हूर पठार गावांतील हे पीक घेत, पुढे चार वर्षांनी त्याकडे शेतकरी वळले आणि आता कान्हूर पठारसह विरोली, पिंप्री पठार, वडगाव दर्या, पिंपळगाव रोठा, गोरेगाव, नवलेवाडी, जामगाव, अणे (ता. जुन्नर) आदी परिसरातील सुमारे तीस ते पस्तीस गावांत सात ते आठ हजार एकर क्षेत्रावर हे पीक घेतले जाते.  गेल्या पंचवीस वर्षांपासून या भागातील अर्थकारणच वाटाण्यावर अवलंबून आहे. शिवाय या दुष्काळी भागात कमी पाण्याचे पीक म्हणून बहुतांश शेतकऱ्यांनी वाटाण्याचे उत्पादन घेणे सुरू केलेले आहे. सुरवातीच्या काळात साधारण वीस वर्षे या कमी पाण्यावर येणाऱ्या या पिकाने शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आणि पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार व परिसराची वाटाणा उत्पादक म्हणून ओळख निर्माण झाली. मात्र गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या कारणांनी हे पीक संकटात सापडले आहे. जास्त काळ पाऊस सुरू राहिला तर वाटाण्याच्या शेंगा सडतात. यंदा मात्र साधारण वीस गावांत सलग बावीस दिवस पाऊस सुरू राहिल्याने शेंगा सडल्या आणि त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. दरवर्षी साधारण एकरी दोन ते तीन टन उत्पादन निघते मात्र यंदा मात्र तब्बल ८० टक्के उत्पादन कमी निघाले असल्याचे वाटाणा उत्पादकांनी सांगितले आहे. 

बियाणे विक्रीवर परिणाम  वाटाणा उत्पादन घेत असल्याने नगर जिल्ह्मामध्ये फक्त कान्हूर पठार भागातच वाटाण्याच्या बियाण्याला मागणी असते. उत्तर प्रदेशातून हे बियाणे येते. दरवर्षी साधारण चारशे ते साडेचारशे क्विंटल बियाण्याची विक्री होत असते. यंदा पंचवीस टक्के विक्रीवरही परिणाम झाला आहे. रब्बीत साधारण दोन हजार एकर क्षेत्रावर वाटाण्याचे उत्पादन घेतले जाते. यंदा अजून पाऊस नसल्याने आता परतीच्या पावसावरच रब्बीची स्थिती अवलंबून आहे. जर परतीचा पाऊस आलाच नाही तर या भागाला गतवर्षीपेक्षाही गंभीर दुष्काळाला सामोरे जावे लागणार आहे. 

दरावरही परिणाम  रब्बीतील वाटाण्याचे उत्पादन साधारण ऑगस्टमध्ये हाती येते. वाटाणा खरेदीचे कान्हूर पठार हे केंद्र असून पुणे, मुंबईसह गुजरातचे व्यापारी थेट कान्हूरला खरेदीसाठी येतात दरवर्षी चांगले पीक असल्याने साठ ते सत्तर रुपये प्रती किलोचा दर मिळतो. यंदा मात्र शेंगांवरच परिणाम झाल्याने चाळीस रुपयाच्या पुढे दर मिळत नसल्याचे दिसून आले. शिवाय दरवर्षीच्या तुलनेत यंदा खरेदी विक्रीत निम्म्‍यावरच आली आहे.  प्रतिक्रीया ‘कान्हूर पठार भागात वाटाण्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. यंदा मात्र प्रामुख्याने संततधार पावसाचा आणि त्यानंतर पाऊस गायब झाल्याचा परिणाम झाला आहे. त्यांचा कोट्यवधी रुपयाचा फटका शेतकऱ्यांना बसला  आहे. यंदा वाटाणा उत्पादकांची परिस्थिती गंभीर आहे. - कैलास सोनावळे, शेतकरी व बियाणे विक्रेते, कान्हूर पठार, ता. पारनेर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com