कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६ वाणांची चार एकरवर लागवड

बांबू लागवड
बांबू लागवड

दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक दृष्टीने बांबूची शेती होऊ शकत नाही, या मानसिकतेला येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयाने छेद दिला आहे. या महाविद्यालयातर्फे बांबूच्या एक दोन नव्हे तर तब्बल २६ वाणांची चार एकर जागेवर लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे कोकणातील बांबू व्यवसायाची ही सुरवात मानली जात आहे. सध्या कोकणात ठरावीक ठिकाणी बांबूची लागवड करण्यात येते. मात्र व्यावसायिक दृष्टीने होत नाही. वनशास्त्र महाविद्यालयाने ४ एकरात २४ जातींच्या बांबूची बेटे निर्माण केली. कोकणातील मातीत देखील बांबू रुजू शकतो हे दाखवून दिले आहे. नुसती बांबूची लागवड करून हे महाविद्यालय थांबले नाही तर कोकणातील शेतकऱ्यांना बांबू लावण्यासाठी प्रोत्साहन देखील देत आहे. याकरिता विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजनदेखील केले जात आहे. प्रशिक्षणात येथील शेतकऱ्यांना बांबूच्या विविध जातींची माहिती देऊन बांबूच्या दहा हजार रोपांची वर्षाला विक्री होते.  बांबूची रोपे ही कांडी पद्धतीने तयार केली जातात. याकरिता बांबूची काठी तोडून त्या काड्या गादीवाफ्यात लावतात. डिसेंबर महिन्यामध्ये गादीवाफे तयार करण्यात येतात. हे गादीवाफे सावलीत तयार करण्यात येतात. त्याला सहा महिने पाण्याची व्यवस्था करण्यात येते. त्यानंतर जून ते जुलै महिन्यामध्ये गादीवाफ्यामधून सर्व काड्या वेगळ्या करण्यात येतात व त्या वेगळ्या पिशव्यांमध्ये भरतात. एका पिशवीची किंमत ५० रुपये असते. या काड्या तीन बाय तीन अंतरावर शेतकऱ्यांनी लावल्यास एका काडीपासून चार वर्षांनी उत्पन्न सुरू होते. एका बेटातून शेतकऱ्याला वर्षाला सहा ते बारा बांबू विक्रीसाठी उपलब्ध होतात. एका हेक्टरमध्ये शेतकरी अकराशे रोपे लावू शकतात. असे तयार केलेले एक बेट तीस वर्षे जगते. बांबूच्या जाडीवरून त्याचा उपयोग ठरतो. विद्यापीठाने बासरीसाठी वापरण्यात येणाऱ्या ओकलॅन्डा ट्रॅव्हल कोटिका या विशेष बांबूची देखील लागवड केलेली आहे. ही जात विद्यापीठानने केरळमधून आणून दापोलीत रुजवली आहे. त्याचप्रमाणे मासे पकडायच्या गळाला वापरण्यासाठी ओलीव्हिरी या जातीच्या बांबूची देखील येथे लागवड करण्यात आली आहे. या जातीचे बांबू फार लवचिक असल्याने ते सहसा मोडत नाही. त्याचप्रमाणे आंबा काढणीसाठी झेलयाला लावण्यासाठी वापरण्यात येणारे मेलेकोना या बांबूची देखील विद्यापीठाने लागवड केलेली आहे.  वनशास्त्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मुराद बुरोंडकर, प्रा. डॉ. प्रदीप नारखेडे व विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली या बांबूच्या वनाची निर्मिती करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com