‘बाजार बंद’ची शेतीला झळ

फळे विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मागणी घटल्याने मागील महिनाभरापूर्वी मिळणाऱ्या दराच्या पन्नास टक्के दरानेच भाजीपाला फळांची विक्री करावी लागत आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका भाजीपाला, फळे उत्पादकांना बसत आहे.
‘Market closure’ hits agriculture
‘Market closure’ hits agriculture

नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या वाढत्या बाधेमुळे नगरसह राज्यातील बहुतांश बाजार समित्यांत भाजीपाल्याचे लिलाव बंद आहेत. आठवडे बाजारही बंद आहेत. त्यामुळे एेन हंगामाच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मागणी घटल्याने मागील महिनाभरापूर्वी मिळणाऱ्या दराच्या पन्नास टक्के दरानेच भाजीपाला फळांची विक्री करावी लागत आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका भाजीपाला, फळे उत्पादकांना बसत आहे.

गेल्या वर्षी लाॅकडाउनच्या काळात कृषी विभागाने फळे, भाजीपाल्याची थेट विक्री करण्याबाबत नियोजन केले होते. यंदा मात्र काही जिल्ह्याचे अपवाद वगळता थेट विक्रीचे नियोजन केल्याचे दिसत नाही.

राज्यात साधारण दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. भाजीपाला उत्पादन क्षेत्राचा आकडा सातत्याने बदलत राहतो. उन्हाळ्यात भाजीपाल्यासोबत कलिंगड, खरबूज आदी फळांचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असतो. भाजीपाला व फळांबाबत कृषी विभागाकडे निश्‍चित आकडेवारी नाही. मात्र यंदाही राज्यात जवळपास दीड लाख हेक्टरवर फळांचे उत्पादन घेतले गेल्याचा अंदाज आहे.

दहा दिवसांपासून राज्यात लॉकडाउन आहे. चार दिवसांपासून कडक लॉकडाउन झाले आहे. पंधरा दिवसांपासून आठवडे बाजार बंद आहे. कोरोनाचा विळखा पडल्याने चार-पाच दिवसांपासून अनेक बाजार समित्यांत भाजीपाला, फळांचे लिलाव बंद आहेत. गावपातळीवर यात्रा, महोत्सव बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला कोठे विकावा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बाजार समित्या बंद असून, केवळ दारोदार विक्रीला परवानगी आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते विक्री करत असले, तरी नेहमीच्या तुलनेत अर्धी मागणी कमी झाली आहे. त्याचा फटका थेट दरावर झाला आहे. महिनाभरापूर्वी मिळणाऱ्या दराच्या तुलनेत पन्नास टक्के दर कमी झाले आहेत. त्याचा मोठा आर्थिक फटका फळे, भाजीपाला उत्पादकांना सोसावा लागत आहे. अकोले, जुन्नर, नारायणगाव भागांत टोमॅटोचे मोठे उत्पादन घेतले जाते. टोमॅटोच्या दरालाही फटका बसत आहे.  

यंदा कृषी विभागाकडूनही दुर्लक्ष राज्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू लागल्याने लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे आठवडे बाजार, बाजार समित्या व अन्य सार्वजनिक विक्रीची ठिकाणे बंद झाल्याने फळे, भाजीपाला विक्रीची अडचण निर्माण झाली होती. मात्र कृषी विभागाने आत्माच्या मदतीने थेट ‘शेतकरी ते ग्राहक’ विक्रीचे नियोजन केले. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या  भाजीपाला, फळांच्या उपलब्धतेचे संकलन करून त्यांची माहिती घेतली. नगरपासून सुरू झालेल्या या मोहिमेला गतवर्षी राज्यभर मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात दररोज २ हजार टनापर्यंत राज्यात फळे, भाजीपाल्याची थेट ‘शेतकरी ते ग्राहक’ विक्री होत होती. यंदा काही ठिकाणचा अपवाद वगळता नगर जिल्ह्यासह राज्यात कृषी विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. नगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तर याबाबत बोलायलाही तयार नाही. शेतकऱ्यांचे लॉकडाउनच्या काळात किती नुकसान होईल, याची साधी माहितीही कृषी विभागाकडे नाही.

माझ्याकडे वांगे, पालक भाजी विक्रीला आहे. मात्र कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने व बाजार बंद असल्याने विक्रीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे मागेल त्या दरात विक्री करावी लागते. वांगे, पालक विक्रीला ग्राहक मिळाला नाही तर जनावरांना टाकण्याची वेळ आली आहे. - नामदेव वाणी, शेतकरी, ब्राह्मणगाव वेताळ, ता. श्रीरामपूर, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com