‘कस्तुरी’चा दरवळ मृत्यूनंतरही कायम

कस्तुरी नावाच्या या खिलार गाईने संपूर्ण कुटुंबाला आनंदी बनवले. ती घरातील सदस्यच झाली. अखेर वयोमानापरत्वे ती गेली. पण या कुटुंबाने मात्र, तिचे ऋण कायम ठेवत तिच्या मृत्यूचा सोहळा अविस्मरणीय केला.
‘Musk’ persists even after death
‘Musk’ persists even after death

कोल्हापूर : गेल्या सत्तावीस वर्षांपासून तिने पूर्ण कुटुंबाला लळा लावलेला. तिच्याशिवाय कुटुंबाची कल्पना म्हणजे अपुरेपणाच. ती आली आणि सगळे वातावरणच बदलून गेले. तिचे नाव ‘कस्तुरी’. अगदी ज्याप्रमाणे कस्तुरीमृग आपल्या जवळच्या पदार्थाचा सुगंध पसरवत असतो, अगदी त्याचप्रमाणे कस्तुरी नावाच्या या खिलार गाईने संपूर्ण कुटुंबाला आनंदी बनवले. ती घरातील सदस्यच झाली. अखेर वयोमानापरत्वे ती गेली. पण या कुटुंबाने मात्र, तिचे ऋण कायम ठेवत तिच्या मृत्यूचा सोहळा अविस्मरणीय केला. 

तिच्या ऋणातच राहणे पसंत केले. तिच्या उत्तरकार्यादिवशी तब्बल पंधरा हजार रुपये खर्च करून गाव जेवण घातले. कोल्हापूर जिल्ह्यातील मौ. नागनवाडी (ता. भुदरगड) येथील शेतकरी शिवाजी कदम यांच्या कुटुंबातील सदस्य असणाऱ्या खिलार गायीप्रती या कुटुंबाने दाखवलेला हा अनोखा स्नेह नक्कीच आदर्शवत असा आहे. नागनवाडी या सुमारे एक हजारच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या छोट्या गावात कदम हे शेतकरी कुटुंबीय राहते. सत्तावीस वर्षांपूर्वी त्यांनी पाहुण्याकडून केवळ सहा महिने वय असलेल्या गाईला आणले. गावातील ही पहिलीच गाय. मोठ्या कौतुकाने या गाईचे नाव कस्तुरी असे ठेवले. कदम कुटुंबीयांच्या गोठ्यामध्ये अन्य जनावरेही आहेत. पण ही गाय आल्यापासून गोठ्यात चैतन्य निर्माण झाले. 

गाईच्या उमेदीच्या काळात ही गाय दोन लिटरपर्यंत दूध देत होती. गावात एकच गाय असल्याने गावातील अन्य ग्रामस्थ गाय पूजनासाठी कदम कुटुंबीयांच्या गोठ्यातच येत असत. गायीचे पूजन म्हणजे कस्तुरीचेच पूजन अशी परंपराच गावात गेल्या काही वर्षापासून निर्माण झाली. कदम कुटुंबीयांच्या अनेक सुख-दुःखाची साक्षीदार असलेली कस्तुरी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. आर्थिकदृष्ट्या गाय सांभाळणे फायदेशीर होत नसले तरी कदम कुटुंबीयांनी मात्र तिच्याप्रती असणारा जिव्हाळा शेवटपर्यंत कायम ठेवून तिची सेवा केली. अखेरपर्यंत तिला वाचवण्यासाठी प्रयत्न झाले. अखेर तिचे निधन झाले. 

घरातील एखादा सदस्य गेल्याची भावना कदम कुटुंबियांत निर्माण झाली. शिवाजी कदम यांच्यासह पत्नी अंजना कदम, मुलगा श्रीधर, प्रकाश व सून पूजा यांनी तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत छोटा सोहळा केला. उत्तरकार्यादिवशी तिच्या फोटोचे पूजन करून सर्व विधी केले. त्या दिवशी भजनाचाही कार्यक्रम घेतला. इतकेच नव्हे तर पूर्ण गावाला अन्नदान करीत गाईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जरी गाईचे निधन झाले असले तरी तिचे अस्तित्व कायमपणे आमच्या आयुष्यात राहणार असल्याचे कदम कुटुंबीयांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com