हत्याकांडाचा ‘कडकडीत’ निषेध

लखीमपूर खिरीमध्ये भाजपा मंत्रिपुत्राच्या मोटारींखाली चार शेतकऱ्यांना चिरडून ठार केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला उत्तम प्रतिसाद मिळाला.
‘Strong’ protest of the massacre
‘Strong’ protest of the massacre

पुणे ः लखीमपूर खिरीमध्ये भाजपा मंत्रिपुत्राच्या मोटारींखाली चार शेतकऱ्यांना चिरडून ठार केल्याप्रकरणी महाविकास आघाडीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला उत्तम प्रतिसाद मिळाला. लखीमपूर घटनेचा जळजळीतपणे निषेध करण्यासाठी राज्यभर ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने आणि रास्तारोको करण्यात आले. ग्रामीण भागातील बाजारपेठा अपवाद वगळता कडकडीतपणे बंद होत्या. बंदमुळे अनेक बाजारसमित्यांमधील लिलाव झाले नाहीत. अत्यावश्यक सेवा वगळता खासगी आस्थापना व सेवा ठप्प होत्या. मुंबईत काही भागांत बसेसची तोडफोड तसेच रस्त्यांवर टायर जाळण्याचे प्रकार झाले. बंद समर्थकांची काही जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी धरपकड केली. मनसे, भाजपसह त्यांच्या घटक पक्षांनी मात्र या बंदवर बहिष्कार टाकला होता. बंदमुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमधील युतीचा घट्टपणा पुन्हा एकदा दिसून आला. राज्यातील विविध व्यावसायिक संस्था व संघटना, डाव्या पक्षांच्या संघटना, वाहतूकदार, माथाडी, कामगार, कष्टकरी संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला. ‘लखीमपूर हे दुसरे जालियनवाला बाग हत्याकांड असून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा’, अशी मागणी मात्र सर्वच जिल्ह्यांमधून केली जात होती.

मुंबई दणाणून सोडली आघाडीने यशस्वी केलेल्या या बंदच्या नियोजनाचे केंद्रस्थान मुंबईत होते. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी शक्तिप्रदर्शन करीत मुंबई दणाणून सोडली. भाजप सरकारचा धिक्कार करण्यासाठी कॉंग्रेसने मुंबईत राजभवनासमोर आंदोलन केले व काळ्याफिती बांधून निषेध नोंदविला. राज्यातील सर्वात मोठी मुंबई बाजारसमिती पूर्णतः बंद होती. मुंबईच्या हुतात्मा चौकात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलन केले. ‘मोदी सरकार हाय हाय,’ ‘योगी सरकारचा धिक्कार असो,’ ‘लखीमपूर के दरिंदो को फासी दों,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.  विदर्भ, मराठवाड्यात निदर्शने नांदेड बाजार समितीत मात्र बंदाचा परिणाम झाला नाही. सोयाबीनचे व्यवहार सुरळीत चालू होते. हिंगोलीत बाजारपेठा कडकडीत बंद होत्या. नांदेडला आंदोलन झाले. परभणीच्या शिवाजी चौकात जोरदार निदर्शने झाली. औरंगाबादमध्ये काही भागात बाजारपेठा बंद करण्याचे प्रकार झाले. विदर्भात ठिकठिकाणी निदर्शने झाली. नागपुरात राष्ट्रवादीने केंद्राच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. बुलडाण्यात भाजप व आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. चंद्रपूरमध्ये मात्र आंदोलकाकडून एकाला मारहाण झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याची  सुटकाही केली. 

भुसावळमध्ये दोन पक्ष भिडले जळगावमधील मुख्य व्यापारी पेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. वरणगावमध्ये मात्र, आघाडीचे बंद समर्थक आणि बंद विरोधक भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. बाचाबाची, हाणामारीही तेथे झाली. धुळ्यात म्हसदी फाट्यावर रास्तारोको केल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. नाशिकमध्ये आघाडीच्या नेत्यांनी शहरात निषेध फेरी काढली. ग्रामीण भागातही उत्तम प्रतिसाद मिळाला. अनेक  बाजारसमित्यांही कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या.

  • पुण्यात बहुतेक बाजारपेठा बंद होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध सभा 
  • सोलापूर भागात विडी कारखाने बंद आमदार प्रणिती शिंदे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण 
  • कोल्हापूर-बंगळुरू महामार्ग शिवसैनिकांनी काही वेळ रोखून धरला होता. 
  • किसान सभेनेही पुण्यासह २१ जिल्ह्यांमध्ये  बंदमध्ये सहभाग घेतला. 
  • हिंगोलीत मुख्य बाजारपेठ बंद, आंदोलकांकडून निदर्शने
  • रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने ठेवली बंद 
  • कणकवलीत दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांना भाजपने वाटले गुलाबपुष्प 
  • अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत बंदला प्रतिसाद
  • सोलापूर बाजार समितीत व्यापाऱ्यांनी व्यवहार ठेवले सुरू
  • नाशिकमध्ये आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून फेरी काढत बंदचे आवाहन
  • कोल्हापुरात बहुतांश व्यवहार सकाळी ठप्प, दुपारनंतर पुन्हा सुरू
  • नाशिक बाजार समितीमध्ये कडकडीत बंद
  • सांगलीत आघाडीतर्फे स्टेशन चौकात रॅली 
  • नांदेडमध्ये संमिश्र प्रतिसाद; व्यवहार सुरू
  • नगर शहर, जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद 
  • सातारा, कराड, ग्रामीण भागातील दुकाने बंद  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com