शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटी

शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटी
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटी

परभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे यंदा (२०१९-२०) शेतीमाल तारण कर्ज योजना राबविण्यासाठी स्वनिधीतून १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी (२०१८-१९) या योजनेअंतर्गत ८९ शेतकऱ्यांना ९८ लाख रुपयांचे तारण कर्ज बाजार समितीतर्फे वाटप करण्यात आले,’’ अशी माहिती समितीचे सभापती समशेर वरपूडकर यांनी दिली.

बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्यानंतर भाव कमी होतात. परंतु, अनेक शेतकऱ्यांना आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी शेतीमाल विक्री केल्याशिवाय गत्यंतर नसते. त्यामुळे अशा वेळी शेतीमालाची साठवणूक करून भावात सुधारणा आल्यानंतर विक्री केल्यास फायदा होतो. त्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीतर्फे २००९-१० पासून ही योजना राबविण्यात येत आहे. 

गतवर्षी सोयाबीन, तूर, मूग, हरभरा आदी शेतीमाल तारण ठेवून बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ८९ शेतकऱ्यांना ९८ लाख रुपयांचे तारण कर्ज दिले. त्याची प्रतिपूर्तीही करण्यात आली. यंदाच्या (२०१९-२०) वर्षात बाजार समितीने या योजनेसाठी स्वनिधीतून १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याअंतर्गत वखार महामंडळाच्या गोदामामध्ये शेतकऱ्यांनी शेतीमाल ठेवल्यानंतर वखार पावती देण्यात येते. त्यावर नमूद शेतीमालाच्या वजन, एकूण किमतीनुसार रकमेएवढे विमा संरक्षण महामंडळाकडून दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी वखार पावती, अर्ज, १०० रुपयांचे मुद्रांक पेपरवरील करारनामा, सातबारा उतारा, बॅंक पासबुक, आधार कार्डची सत्यप्रत आदी कागदपत्रे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सादर करावी. त्यानुसार मूग, उडीद, तूर, सोयाबीन, हरभरा, भात, करडई, हळद, ज्वारी, बाजरी, गहू, मका आदी शेतीमालाच्या प्रतवारीनुसार प्रचलित दराच्या एकूण किमतीच्या किंवा शासनाने ठरवून दिलेला हमीभाव, यापैकी जी रक्कम कमी असेल, तिच्या ७५ टक्के तारण कर्ज, ६ टक्के व्याजदराने १८० दिवसांसाठी बाजार समितीकडून धनादेशाद्वारे देण्यात येईल.

या कर्ज रकमेची व्याजासह परतफेड करून माल ताब्यात न घेतल्यास या शेतीमालाची बाजार समितीतर्फे विक्री केली जाईल. या योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सभापती समशेर वरपूडकर, उपसभापती दिलीप आवचा, सचिव विला मस्के यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com