वऱ्हाडात दहा लाख हेक्टर क्षेत्राला फटका

जिल्ह्यात ऑक्टोबरमध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाले. या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. प्रत्येक गावातील वस्तुनिष्ठ अहवाल तयार केला जाणार आहे. पिकाचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा किंवा आपल्या गावचा कृषिमित्र, कृषी सहायकाकडे ही कागदपत्रे द्यावीत. - मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला सोयाबीन, ज्वारीला कोंब फुटले. अतिपावसामुळे संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. लागवडीला लावलेला खर्चही निघालेला नाही. शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. - ओमप्रकाश धूत, शेतकरी, संग्रामपूर या वर्षी पावसाने कहर केला. सोयाबीन हे आमचे मुख्य पीक असून, यावरच शेतीची मदार आहे. अर्धेअधिक पिकांची कापणी करून कसेबसे जमा झाले. अर्धे पीक सोंगणी करताच न आल्याने शेतातच उभे राहिले. यामुळे पिकाला कोंब आले व जे कापणी करून जमा करायचे बाकी होते ते जागेवरच सडले. जमा केलेल्या सोयाबीन सुडीला सुद्धा अतिपाण्याने कोंब आले. त्यामुळे आता त्यालाही बाजारात भाव कमीच येणार आहे. आता पुढील पिकाच्या पेरणीसाठी शेत तयार करणे खूपच खर्चीक झाले. - मोहन तेजराव जगताप, वळती, ता. चिखली, जि. बुलडाणा
वऱ्हाडात दहा लाख हेक्टर क्षेत्राला फटका
वऱ्हाडात दहा लाख हेक्टर क्षेत्राला फटका

अकोला  : वऱ्हाडात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये सुमारे दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामे झाल्यानंतर नुकसान नेमके किती क्षेत्रावर झाले, हे समोर येणार आहे. विमा उतरविलेल्या क्षेत्राचा पंचनामा करण्यासाठी विमा कंपन्यांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने सरसकट निर्णय घेत एक समान धोरण ठरविण्याची गरज आहे.

या खरिपात लागवड केलेल्या एकूण क्षेत्रापैकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मागील दहा दिवसांत सातत्याने पाऊस होत असल्याने काढणीसाठी तयार असलेले सोयाबीन, ज्वारी पीक जमीनदोस्त झाले. शेतांमध्ये उभे असलेल्या कपाशीच्या झाडांवरील प्रत्येक कैरी काळवंडली असून, हे नुकसान कधीही भरून येणारे नाही.

खरिपात वऱ्हाडात सुमारे सात लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीन, तीन लाख हेक्टरपेक्षा अधिक कपाशी व ४० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर ज्वारीची लागवड झाली होती. या महिन्यात सोयाबीन तसेच ज्वारीची काढणी सुरू झाली आहे. सोबतच दिवाळीदरम्यान कापूस वेचणीचा मुहूर्त साधण्यासाठी शेतकऱ्यांची तयारी होती. पण, या वर्षी वेगळेच झाले आहे. तीनही जिल्ह्यांत या वर्षी सर्वत्र ओल्या दुष्काळाचे सावट पसरले आहे.   वऱ्हाडात सर्वाधिक ५ लाख १५ हजार हेक्टर, अकोल्यात ३ लाख २३ हजार हेक्टर बाधित झाले आहे. वाशीम जिल्ह्यातही जवळपास दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीप पिके जवळपास ८० टक्क्यांवर बाधित झाली आहेत. १० लाख हेक्टरपर्यंत हे बाधित क्षेत्र असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी हा भाग कमी पावसामुळे होरपळला होता. यंदा अतिपाऊस मारक ठरला.

सोयाबीन, ज्वारीला फुटले कोंब

ऑक्टोबरमधील पावसाने सुरवातीला रब्बीसाठी फायदा होईल, असे चित्र होते. पण, हा पाऊस सलग झाल्याने काढणी सुरू झालेला संपूर्ण खरीप हंगाम संकटात आला. सोंगणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या सुड्या ओलसरपणामुळे कुजल्या. शेंगांमधून कोंब फुटले. सोंगणी केलेल्या ज्वारीच्या कणसातूनही कोंब उगवले. कापसाच्या बोंडाचीही यापेक्षा वेगळी स्थिती नाही.जवळपास ८० टक्के खरीप सततच्या पावसाने नुकसानग्रस्त झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले. या हंगामाचे दूरगामी परिणाम शेतकऱ्यांच्या जगण्यावर होणार आहेत.

सर्वेक्षणाचे आदेश

सध्या दिवाळी सुरू आहे. सलग सुट्यांमुळे नुकसानीचे पंचनामे सुरू होण्यास विलंब होत आहे. परंतु, दुसरीकडे या भागातील सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रत्येक तालुक्यात जाऊन भेटीगाठी सुरू केल्या आहेत. आमदार, खासदार बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करीत आहेत. या नुकसानीचा वस्तुनिष्ठ स्थिती अहवाल बनविण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासह मलकापूरचे आमदार राजेश एकडे, खामगावचे आकाश फुंडकर, मेहकरचे डॉ. संजय रायमुलकर, बुलडाण्याचे संजय गायकवाड, अकोल्याचे रणधीर सावरकर, मूर्तिजापूरचे हरीश पिंपळे आदींनी आपापल्या मतदार संघात शेतशिवारांना भेटी दिल्या. शासनाकडून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले.

नुकसान दृष्टिक्षेपात 

  •   सोयाबीनचा ५० टक्के हंगाम वाया
  •   ज्वारी काळवंडली, कोंब फुटले 
  •   कापूस पिकाचे ३० ते ४० टक्के नुकसान
  • बाधित क्षेत्र (हेक्टर)

    अकोला जिल्हा  ३.२३ लाख
    बुलडाणा ५.११ लाख
    वाशीम  २ लाख

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com