जळगावमध्ये ई-पॉसचे १०० टक्के काम पूर्ण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

जळगाव : जिल्ह्यात खत वितरण व विक्री यासंबंधी पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले ई-पॉस मशिन बसविण्याचे काम १०० टक्के झाले आहे. यातच मध्यंतरी बिघाड झालेले आठ ई-पॉस यंत्र किंवा मशिन दुरुस्त झाले आहे. अडचणी सोडविण्यासाठी खत विक्रेते व अधिकारी यांचा व्हॉट्‌सॲप ग्रुपही तयार करण्यात आला आहे.

जिल्ह्यात एकूण १३६५ नोंदणीकृत खत विक्रेते होते. यातील काही दुकाने बंद झाली तर काही विक्रेत्यांनी विद्राव्य खते विक्री सुरू केली. विद्राव्य खते विक्रेत्यांना ई-पॉस बंधनकारक नाही. फक्त अनुदानित खते विक्रेत्यांना हे मशिन बसविणे बंधनकारक असल्याने सुमारे ३०० ई-पॉस मशिन परत पाठविले आहेत. हे मशिन मराठवाडा विभागात खत कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली.

आजघडीला ई-पॉससंबंधीचे १०० टक्के काम झालेले आहे. परंतु काही किरकोळ अडचणी येत आहेत. सर्वच विक्रेत्यांना एकसारख्या अडचणी येत असून, त्यात सर्व्हर डाऊन असणे, मशिनमध्ये आपल्या वाट्याचा खतसाठा न दिसणे, पेपर रोल प्रिंटिंग न होणे, मशिन चार्जिंग न होणे आदींचा समावेश आहे. यासंबंधी कृषी विभागाने एक व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला असून, त्यात केंद्रीय खते मंत्रालयाने राज्यात विविध विभागांसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचा, खत कंपन्यांच्या ई-पॉसची कार्यवाही करणाऱ्या प्रतिनिधींचा समावेश आहे. यासोबत अधूनमधून खते मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी दलजित सिंह यांची मदत कृषी विभागातील संबंधित घेतात.

आठ मशिन दुरुस्त मध्यंतरी राष्ट्रीय केमिकल्स ॲन्ड फर्टिलायझर्सतर्फे पुरविण्यात आलेल्या विदेशी कंपनीच्या बनावटीच्या आठ मशिन चार्ज होत नव्हत्या. त्या कृषी विभागात संबंधित खत विक्रेत्यांनी जमा केले होते. त्यांची संबंधित कंपनीने दुरुस्ती करून ते पुन्हा खत विक्रेत्यांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने दिली.

४० मशिन मागविले काही मशिन नादुरुस्त झाले व दुरुस्ती लवकर शक्‍य नसली, तर यावर उपाय म्हणून सुमारे ४० मशिन विविध खत कंपन्यांकडून कृषी विभागाने मागवून घेतले आहेत. ते ई-पॉससंबंधी नियुक्त केलेल्या कृषी विभागातील समन्वयक यांच्याकडे असल्याची माहिती मिळाली.

ई-पॉसबाबतच्या किरकोळ तक्रारी, अडचणी आहेत. पण त्या तत्काळ सोडविल्या जात असून, केंद्रीय खते मंत्रालयाचे प्रतिनिधी, खत कंपन्यांचे सहकारी यांचे सहकार्य मिळत आहे. यामुळे १०० टक्के काम जिल्ह्यात होऊ शकले आहे. - मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com