कोयना धरणातून १०७ टीएमसी विनावापर पाण्याचा विसर्ग

कोयना धरण
कोयना धरण

सातारा ः जिल्ह्यासह कोयना धरणात विक्रमी पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. यामुळे कोयना धरणासह सर्वच प्रमुख धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आजपर्यंत एकट्या कोयना धरणाच्या दरवाजातून १०७ टीएमसी म्हणजेच धरणाच्या क्षमतेपेक्षा अधिक पाणी विनावापर नदीपात्रात सोडण्यात आले आहे.  मॉन्सून लांबल्याने जिल्ह्यातील धरणे भरणार की नाही अशी चिंता निर्माण झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीस जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. प्रामुख्याने जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक होता. कमी कालवधीत जास्त पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. पावसास विलंब झाल्याने धरणे भरण्यास प्राधान्य दिले. यामुळे पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन करताना धरण व्यवस्थापनास तारेवरची कसरत करावी लागली. या दरम्यान संततधार पाऊस सुरू राहिल्याने पाण्याचा विसर्ग सूर करावा लागला होता.  पाण्याची आवक व धरणाची क्षमता यामध्ये मेळ घालण्यासाठी पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे धरणाचे दरवाजे १४ फुटापर्यंत उचलून लाखावर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू ठेवावा लागला होता. यामुळे कोयना, कृष्णा नद्यांना पूर आल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. कोयना धरणात पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी असून या क्षमतेच्या दुप्पटीपेक्षा जास्त म्हणजे २११.४३ टीएमसी पाण्याची आवक आजपर्यंत झाली आहे. धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून आतापर्यंत १०७.१६ टीएमसी पाणीसाठा सोडावे लागले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे ६६७१ मिलिमीटर नवजा येथे ७७६६ मिलिमीटर महाबळेश्वर येथे ६७१० मिलिमीटर पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे. सध्या धरणात एकूण १०४.९५ टीएमसी म्हणजेच ९९.०६ टक्के पाणीसाठा झाला आहे. विसर्ग सुरूच  मागील आठ ते दहा दिवसांपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी जास्त होत आहे. यामुळे विसर्ग कमी जास्त केला जात आहे. काही दिवसांसाठी हा विसर्ग पूर्णपणे बंदही करण्यात आला होता. मंगळवारी धरणाचे सर्व दरवाजे बंद केले होते. पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक विसर्ग होता. मात्र, सांयकाळी पावसाचा जोर वाढल्याने मंगळवारी मध्यरात्री दीड वाजता धरणाचे दरवाजे दोन फूट उचलून २० हजार ५३२ क्युसेक केला जात आहे. बुधवारी सकाळी दहापर्यंत हा विसर्ग कायम होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com