रोजगाराच्या शोधात गेलेल्या १२ जणांचा अपघाती मृत्यू

अपघात
अपघात

महागाव, जि. यवतमाळ : कापूस वेचणीसाठी गेलेल्या माळवागद येथील पाच जणांसह १२ व्यक्ती भीषण अपघातात ठार झाले. दुष्काळामुळे गावात रोजगार नसल्याने कामाच्या शोधात हे सारे जण चंद्रपूर जिल्ह्यात गेले होते.  कोरपणावरून वणीकडे (एम.एच.२९-८५८२) क्रमांकाची काळीपिवळी येत होती, तर कोरपणाकडे जाणाऱ्या ट्रक क्र. (एम.एच.२९-१६८३) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटून काळीपिवळीला धडक दिली. धडक एवढी जोरात होती की काळीपिवळीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. यामध्ये १५ प्रवाशांपैकी १२ प्रवासी ठार झाले. महागाव तालुक्यातील माळवागद येथील ठार झालेल्या मजुरांमध्ये अमोल दगडू हटकर (२२), कुसुमबाई अशोक हटकर (३०), क्रिश अशोक हटकर (२) गजानन कोंडबा नवघरे (३०) रा. उटी, वनिता गजानन हटकर (२२) आदींचा समावेश आहे. तर, देवानंद अशोक हटकर हा गंभीर जखमी असून, त्यांच्यावर चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांचे रोजगारासाठी मोठया प्रमाणावर स्थलांतर झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून कामाच्या शोधात या मजुरांना आपला जीव गमवावा लागला, यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे, तर नातेवाईक हंबरडा फोडतांनाचे दृष्य काळीज चिरून टाकीत होते. गावात एकाही घरी चूल पेटली नाही, कारण आपल्या गावातील पाच जण कायमचे निघून गेले, हे सत्य गावक-याच्या जिव्हारी लागले आहे. पाच बहिणींचा भाऊ काळाने हिरावला    पाच बहिणींमध्ये व आई-वडिलांसाठी आधार असलेला अमोल दगडू हटकर हा २२ वर्षांचा अविवाहित तरुण रोजगारासाठी गेला तो न परतण्यासाठीच. हसऱ्या चेहऱ्याचा आणि गोड स्वभावाचा अमोल अपघातात ठार झाल्याने पाच बहिणीचा भाऊ काळाने हिरावला, कारण भाऊबीजेला ओवाळणी केली ती शेवटचीच ठरणार आहे.

बहीण -भाऊ झाले पोरके या भीषण अपघातात आदित्य गजानन नवघरे हे केवळ नऊ महिन्यांचे बाळ सुखरूप वाचल्याचे नवल आहे. तर, त्याची तीन वर्षांची बहीण आजी-आजोबाकडे आहे. मात्र, या अजाणत्या वयात नियतीने त्यांच्यावर पोरकेपणा लादला आहे. कारण या अपघातात वडील गजानन व आई वनिता हे जग सोडून गेलेत. त्यामुळे या पोरक्यांचे भविष्य कसे?असा गंभीर प्रश्न नियतीने त्यांच्या पुढ्यात वाढून ठेवला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com