राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची आत्महत्या

शेतकरी आत्महत्या
शेतकरी आत्महत्या

मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे, शेतीमालाला दरातील अभाव, कर्जमाफीची अपूर्ण प्रक्रिया त्यामुळे बँकांनी पीककर्ज नाकारणे आदी अस्मानी आणि सुलताना संकटांचा सामना करण्याऱ्या शेतकऱ्यांचा धैर्याचा बांध फुटत आहे. यामुळे राज्यातील सुमारे तेराशे शेतकऱ्यांनी चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीत मृत्यूला कवटाळले आहे. यात सर्वाधिक अमरावती विभागात ४६३ तर पाठोपाठ दुष्काळी औरंगाबाद विभागात ४३४ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. विशेषतः विदर्भातील अमरावती, बुलडाणा आणि यवतमाळ हे तीन जिल्हे शेतकरी आत्महत्यांमध्ये पुन्हा एकदा डेंजरझोनमध्ये आले आहेत.  गेल्यावर्षी राज्यात भीषण दुष्काळी स्थिती होती. १९७२ पेक्षाही हा दुष्काळ मोठा होता असे जाणकार सांगतात. अजूनही या दुष्काळाची झळ कमी झालेली नाही. पावसाचे उशिराने झालेले आगमन आणि मराठवाड्यासारख्या काही भागात अद्यापही पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांपुढील अडचणी कमी न होता वाढतच आहेत. त्यातच कर्जमाफीतील घोळामुळे अजूनही हजारो शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. बँकांनी कर्ज खात्यावर व्याजाच्या रकमेची थकबाकी दाखवल्याने शेतकऱ्यांना नवे कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागते.  गेल्या वर्षीच्या खरिपातील पीकविम्याचे पैसेही मिळण्यास विलंब झाला आहे. अद्यापही शेतकरी विम्याच्या लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्यावर्षीचा खरीप हंगाम वाया गेला, दुष्काळामुळे रब्बीतही शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. परिणामी राज्यातील शेतकरी गेले वर्षभर मोठ्या आर्थिक विवंचनेतून मार्ग काढीत आहेत. ही सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे, शेतीमालाला दरातील अभाव, बँकांकडून कृषी पत पुरवठा न होणे आदी विविध अस्मानी आणि सुल्तानी कारणांमुळे हतबल शेतकरी शेवटी मृत्यूला कवटाळतो हे कटू वास्तव आहे.  गेल्या काही वर्षांत राज्यात शेतकरी आत्महत्यांची वाढती संख्या चिंतेची बाब बनली आहे. विशेषतः अमरावती विभागात आणि दुष्काळी मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे मोठे आव्हान शासनापुढे उभे आहे. राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्याचे सांगितले जाते. मागील चार वर्षांत सिंचन सोडून कृषीच्या निधीत दुप्पटीने वाढ केली. पीकविमा, विविध आपत्ती आणि कर्जमाफीच्या माध्यमातून तब्बल ४८ हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले. कृषितील गुंतवणूक वाढवत नेतानाच शेतीचे पावसावरील अवलंबित्व कमी केल्याने राज्याच्या इतिहासात सर्वाधिक पीक उत्पादन झाल्याचे राज्य शासनाचे दावे आहेत. जर पाच वर्षांत थेट हजारो कोटी रुपये थेट शेतकऱ्यांना मिळाले असतील तर मग राज्यातला शेतकरी पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे का झिजवतो आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का कमी होत नाहीत, हे सवाल आवासून उभे आहेत.  शेतकऱ्यांपुढील समस्या

  • गेल्यावर्षी राज्यात भीषण दुष्काळ
  • अजूनही दुष्काळाची झळ कायम 
  • कर्जमाफीतील घोळामुळे प्रक्रिया अपूर्ण
  • थकबाकी दाखवल्याने शेतकऱ्यांना नवे कर्ज मिळत नाही
  • गेल्या खरिपातील पीक परतावा मिळण्यास विलंब
  • गेल्या रब्बीतही हाती काही लागले नाही
  • विभागनिहाय आत्महत्या पुणे - ५३, नाशिक - २५१, औरंगाबाद - ४३४, अमरावती - ४६३, नागपूर - १०४. सर्वाधिक आत्महत्यांचे जिल्हे अमरावती - १२२, बुलडाणा - १३४, यवतमाळ - ११२, बीड - ९६, उस्मानाबाद - ६६, औरंगाबाद - ६३, अहमदनगर - ७१.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com