रत्नागिरी जिल्ह्यात पुरामुळे १३०० हेक्टर भातशेतीचे नुकसान

रत्नागिरी जिल्ह्यात पुरामुळे १३०० हेक्टर भातशेतीचे नुकसान
रत्नागिरी जिल्ह्यात पुरामुळे १३०० हेक्टर भातशेतीचे नुकसान

रत्नागिरी : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील गावे पुरात सापडली होती. नदी किनाऱ्या‍वरील भातशेतीमध्ये सहा ते आठ दिवस पुराचे पाणी साचून राहिले. त्यामुळे सुमारे १३११.७१ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. परिणामी ३२६४ शेतकरी बाधित झाले आहेत, असे कृषी विभागाच्या प्राथमिक पाहणीत आढळून आले आहे. तसा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत ३४०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झाला. या पावसामुळे मंडणगडमधील भारजा, खेडमधील जगबुडी, चिपळूणातील वाशिष्ठी, संगमेश्‍वरातील बावनदी, शास्त्री, गडनदी, रत्नागिरी व लांजा तालुक्यांतून वाहत येणारी काजळी, राजापुरातील अर्जुना या नद्यांना पूर आला. गावेच्या गावे पुराच्या पाण्यात गेली. 

जून महिन्यात उशिरा पाऊस सुरू झाल्यामुळे लावण्यांची कामेही लांबली होती. भात लावणी पूर्ण झाल्यानंतर पुराचे पाणी शेतात घुसले. त्यामुळे अनेक ठिकाणी रोपेच वाहून गेली. काही ठिकाणी गाळ साचून राहिला आहे. मात्र, फुटवा आलेल्या रोपांना पुराचा फटका बसला नाही.

जिल्ह्यातील १३११ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू आहे. कृषी विभागाकडून प्राथमिक पंचनामे करण्याचे काम पूर्ण केले. त्यातील माहितीनुसार ३२६४ शेतकरी बाधित झाले आहेत. प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर यामध्ये कमी-अधिक आकडे बदलतील, असा अंदाज आहे.

तालुका भातशेती (हेक्टर) शेतकरी
मंडणगड ४० २५३
दापोली ३५.८ २५३
खेड २६४ ७२८
चिपळूण १०.५० २७
गुहागर ३.७२ २१
संगमेश्‍वर १६८.५७ १८७
रत्नागिरी ४५६ ६५४
लांजा  १७६ ३१३
राजापूर १५७.६४ ९८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com