अतिवृष्टीतील नुकसानीपोटी १३९ कोटींची मदत वितरित

अतिवृष्टी
अतिवृष्टी

मुंबई: राज्यात गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी १३९ कोटी रुपयांची मदत राज्य शासनाने वितरित केली आहे. यात सर्वाधिक ४७ कोटी रुपयांची मदत औरंगाबाद विभागाला, तर त्याखालोखाल ४३ कोटी रुपयांची मदत अमरावती विभागातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.  २०१८ च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि फळपिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. त्यासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्व विभागीय आयुक्तांकडून मदतीची मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावाला २८ जूनच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार हा निधी वितरीत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. एकूण १३९ कोटी १९ लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे. हा निधी बाधित शेतकऱ्यांना वितरित करताना दक्षता घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. महसूल व कृषी विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या पंचनाम्याच्या आधारे पिकांचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या प्रकरणी ही मदत दिली जाणार आहे.  मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करावी, रोख किंवा निविष्ठा स्वरूपात मदत देण्यात येऊ नये. या रक्कमेतून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. वाटप पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी रक्कमेच्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी असे निर्देश मदत आणि पुनर्वसन विभागाने दिले आहेत. तसेच ही मदत वितरित करताना रक्कम शेतकऱ्याच्या आधार जोडलेल्या बँक खात्यात करावी, एखाद्या शेतकऱ्याचे बँक खाते आधारशी जोडलेले नसल्यास तो शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी इतर पर्यायी ओळखपत्रांच्या आधारे उदाहरणार्थ आधार ओळख नोंदणी पावती, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, पारपत्र, बँक पासबुक याची खातरजमा करून रक्कम वितरित करण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.  विभागनिहाय मदत वाटप - कोकण विभाग - ५० लाख रुपये, पुणे - २० कोटी ५२ लाख, नाशिक - १ कोटी १८ लाख, औरंगाबाद - ४७ कोटी, अमरावती - ४३ कोटी ५१ लाख आणि नागपूर विभाग - २६ कोटी ४६ लाख रुपये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com