परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
अॅग्रो विशेष
निर्यातीसाठी चौदा हजार आंबा बागांची नोंदणी
गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे आंबा निर्यातीसह देशांतर्गत व्यापार अडचणीत आला होता. यंदा मात्र निर्यातीसाठी १३,७०० बागांची नोंदणी झाली आहे.
पुणे : गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे आंबा निर्यातीसह देशांतर्गत व्यापार अडचणीत आला होता. यंदा मात्र निर्यातीसाठी १३,७०० बागांची नोंदणी झाली आहे. २०२०-२१ मध्ये ८,७०० बागांची तर २०१९-२० मध्ये ६,६०० बागांची नोंदणी होती. निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरीही कोरोनाचा धोका वाढत असल्याने अनेक देशांत लॉकडाऊन आहे. तर नुकत्याच झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने आंब्याला तडाखा बसला. यामुळे आंबा निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आव्हानांची मालिकाच उभी आहे.
कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर आंबा निर्यातीचे वेध लागले असून, निर्यात सुविधा देणाऱ्या राज्य कृषी पणन मंडळाने निर्यात सुविधा केंद्र आंतरराष्ट्रीय नियमांचे प्रमाणिकरण करुन सज्ज केली आहेत. यावर्षी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसह नव्याने अर्जेंटिना आणि मलेशिया या देशांची बाजारपेठ खुली होणार आहे.
यंदाच्या निर्यात हंगामाची माहिती राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली. पवार म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीच्या कोरोना संकटामुळे आंब्याची निर्यात होऊ शकली नव्हती. मात्र यंदा ही निर्यात जास्तीत जास्त होण्याच्या दृष्टीने पणन बाळासाहेब पाटील आणि राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार विविध निर्यात सुविधा केंद्रे सुसज्ज करण्यात आले आहेत. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन पाटील आणि देसाई यांनी निर्यातदारांना केले आहे.’’
यंदाच्या आंबा उत्पादनाबाबत पवार म्हणाले, की यंदा हवामानामध्ये होणारे बदल, अवकाळी आणि जास्त कालावधीसाठी झालेला पाऊस, उशिरा आलेली थंडी आदि विविध कारणांनी आंबा हंगामावर विपरीत परिणाम होणार आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याला मोहोर येण्याऐवजी पालवी आल्यामुळे मोहोर येण्याची प्रक्रिया उशिरा सुरु झाल्याचे बागायतदारांनी सांगितले आहे. परिणामी आंबा हंगाम जवळपास एक महिना उशिरा सुरु होईल असा प्राथमिक अंदाज आहे. मार्च मध्ये आंब्याची आवक अतिशय अल्प राहील असा अंदाज असून,आंबा उपलब्धतेचा कालावधी कमी राहण्याचा शेतकऱ्यांचा अंदाज आहे. असे पवार यांनी सांगितले.
तब्बल ९ हजार ५०० शेतकरी हापूस उत्पादकांनी १३ हजार ७०० आंबा बागांची निर्यातीसाठी नोंद केली आहे. हंगाम २०१९ मध्ये वाशीच्या विकीरण सुविधा केंद्रातून अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे सुमारे ६०० टन निर्यात झाली होती. हंगाम २०२० मध्ये करोनामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे विकिरण करून आंबा निर्यात होवू शकले नाही.
भौगोलिक मानांकनाचा फायदा
हापूसमधील भेसळ रोखण्यासाठी हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन कोकणतील शेतकऱ्यांनी प्राप्त करुन घेतले आहे. जीआय द्वारेच हापूसचे विपणन व्हावे यासाठी निर्यातदार व खरेदीदार यांना प्रोत्साहन देण्याचे काम कृषी पणन मंडळाच्या वतीने सुरु आहे. यामाध्यमातुन सुमारे ३६८ आंबा उत्पादकांनी नोंदणी केली असून, आंबा विक्रेते, खरेदीदार, व्यापारी, निर्यातदार असे एकूण ६९ घटकांची नोंदणी झालेली आहे.
आंबा निर्यात तयारी
राज्य कृषी पणन मंडळाने शेतमाल निर्यातीसाठी विविध भागात आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राची उभारणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व बंदर याचा फळे व भाजीपाला निर्यातीसाठी असलेले स्थान महत्त्व लक्षात घेता, पणन मंडळाने आंतरराष्ट्रीय पातळीवर आवश्यक निकषांची पुर्तता करुन व्हेपर हीट ट्रीटमेंट, विकीरण सुविधा, तसेच भाजीपाला प्रक्रिया केंद्र या तीन अद्ययावत सुविधांची उभारणी वाशी (नवी मुंबई) येथे केली आहे.येथून आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करुन युरोपियन देशांना निर्यात केली जाते. तसेच अमेरिका व ऑस्ट्रेलिया देशांकरिता आवश्यक
असलेली तीन मिनिटांची ५० ते २०० पी.पी.एम. सोडीअम हायपोक्लोराईडची ५२ अंश सेल्सिअसची प्रक्रिया सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
एप्रिलपासून निर्यात
जपान व दक्षिण कोरिया या देशांनी आंबा निर्यातीकरीता आपले निरीक्षक न पाठविता केंद्र शासनाच्या एन.पी.पी.ओ विभागाच्या निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया करून निर्यातीला परवानगी दिलेली आहे. तसेच न्यूझीलंड या देशाने यापूर्वीच अशी परवानगी दिलेली असल्याने या देशांमध्ये लवकरच आंबा निर्यात
सुरू होईल. वाशी येथील विकीरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलिया व अमेरिकेकरीता एप्रिल च्या (२०२१) पहिल्या आठवड्यापासून निर्यातीकरीता विकीरण प्रक्रिया करण्याचे नियोजन आहे. तसेच यावर्षी अर्जेंटिना आणि मलेशिया या देशांना आंबा निर्यातीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
कोरोनातही निर्यात
- २०२० मध्ये व्हेपर हीट ट्रिटमेंट प्रक्रिया केंद्रातून युरोप, जपान व न्यूझीलंड येथे ५८ टन निर्यात
- भाजीपाला प्रक्रिया केंद्र (व्ही.पी.एफ.) येथून युरोपियन देशांमध्ये ३८८ टन निर्यात
- रत्नागिरीच्या निर्यात सुविधा केंद्रातून ३२ टन निर्यात
- बारामतीच्या निर्यात सुविधा केंद्रातून ५५७ टन युरोप, अमेरिकेमध्ये निर्यात
अणु ऊर्जा विभागाकडून सुविधा प्रमाणित
विविध आयातदार देशांच्या मागणीनुसार पणन मंडळाने आंबा निर्यातवृध्दीसाठी आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उच्च तंत्रज्ञानावर आधारित वाशी येथील विकीरण सुविधा केंद्र सरकारच्या अणुऊर्जा नियामक मंडळ आणि अणुऊर्जा विभागासह अमेरिकेच्या यु.एस.डी.ए.- एफीस या संस्थेकडून प्रमाणित करुन घेतले
प्रतिक्रिया
निसर्ग चक्रीवादळ, थंडीचा कमी कालावधी या दोन नैसर्गिक आपत्तींमुळे यावर्षी आंब्याचे उत्पादन आणि कालावधी कमी होण्याची शक्यता आहे. त्यातच अमेरिकेचा हंगाम अद्याप अधांतरी आहे. त्यामुळे यंदा अर्जेटीना आणि मलेशियाला निर्यात सुरु करण्यात येणार आहे. विविध देशांमधील कोरोनाचे संकट निवळले आणि विमानफेऱ्यांची वारंवारता चांगली राहिली तर निर्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.‘‘
- डॉ. भास्कर पाटील, उपसरव्यवस्थापक, कोकण विभाग
आणि निर्यात विभाग प्रमुख
गेल्या तीन वर्षात विविध देशांमध्ये झालेली निर्यात (टनांत)
२०१७-१८ | २०१८-१९ | २०१९-२० |
४९,१८० | ४६,५१० | ४९,६५९ |
आकडेवारी स्त्रोत - राज्य कृषी पणन मंडळ
मॅंगोनेटवर झालेली बागांची नोंद
२०२१-२२ | २०२०-२१ | २०१९-२० | २०१८-१९ |
१३,७०० | ८,७०० | ६,६०० | ४,५०० |
- 1 of 674
- ››