140 boxes of hapuas at customer's house in Karad
140 boxes of hapuas at customer's house in Karad

कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या हापूस

आंबा नाशवंत असल्यामुळे आत्मा शेतकरी ते ग्राहक साखळी तयार करत आहे. पहिल्या टप्प्यात काही बागायतदारांकडून आंबा पाठविण्यासाठी मिळाला आहे. एक गाडी कराडला रवाना केली आहे. - जी. बी. काळे, प्रकल्प संचालक, आत्मा

रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठांमधील कामकाज थांबले आहे. त्याचा परिणाम हापूसवर होत आहे. त्यातून आंबा बागायतदारांना दिलासा देण्यासाठी ‘आत्मा’ विभाग सरसावला आहे. रत्नागिरीतील बागायतदारांच्या पेट्या थेट सातारा, कराड, कोल्हापूर, पुणे येथील ग्राहकांकडे पाठविण्यासाठी पावले उचलली आहेत. पहिल्याच टप्प्यात १४० पेट्यांची गाडी कराडला रवाना झाली. 

संपूर्ण देश ठप्प झाला आहे. नागरिक घराबाहेर पडत नाहीत. जीवनावश्यक वस्तूंसह फळे, भाजीपाला विक्रीसाठी परवानगी आहे; मात्र ग्राहकांची कमतरता जाणवत आहे. त्याचा परिणाम हापूसवर होत आहे. वाशीतील व्यापाऱ्यांनी हात झटकल्यामुळे कोकणातील बागायतदार हतबल झाले आहेत. पिक येण्यासाठी लाखो रुपये खर्च करुन बसलेल्या बागायतदारांना दिलासा देण्यासाठी पणन, कृषी विभागाकडून प्रयत्न सुरु आहे. 

‘आत्मा’तर्फे रत्नागिरीतील बागायतदारांसाठी शक्कल लढवली आहे. त्या-त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन आंब्याची थेट विक्री केली जात आहे. कोल्हापूर, कराड, बारामती, पुणे येथील शेतकरी गट, गृहनिर्माण सोसायट्यांशी संपर्क साधून आंबा विक्रीची थेट साखळी तयार केली जात आहे. कराड येथील एका गटाने आंबा घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार रत्नागिरीतील बागायतदारांना आत्माकडून आवाहन करण्यात आले. जागेवर चार डझनची पेटी घेऊन ती कराडला पाठविण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी ही गाडी कराडला रवाना झाली. 

आंबा घेतल्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून त्याचे पैसे बागायतदाराला बँकिंग प्रणालीने जमा केले जाणार आहेत. पेट्या बागायतदरांच्या थेट बागेतूनच उचलण्यात येतील. त्यासाठी वाहतूकीचा खर्च बागायतदाराला करावा लागणार नाही. तसेच गृहनिर्माण सोसायटींशी चर्चा करुन त्यांच्या दारांत आंबा आणून देण्यासाठी ‘आत्मा’कडून प्रयत्न सुरु आहेत. त्याला यश आले, तर रत्नागिरीतील बागायतदारांचा आंबा किमान दरांत लोकांच्या घरात जाईल. यंदा झालेला खर्च भरुन काढण्याचे आव्हान बागायतदारापुढे आहे. 

कवडीमोलाचा दर 

ग्राहक नसल्यामुळे मोठ्या शहरातील व्यापाऱ्‍यांनी आंबा विक्रीसाठी हात वर केले. त्यामुळे बागायतदारांचा हिरमोड झाला आहे. सध्या आंबा विक्रीला काढला गेला, तरीही त्याला दर कवडीमोलाचाच मिळण्याची भिती बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. बाजारात डझनाला तीनशे रुपयांपर्यंत दराची मागणी होत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com