निर्यात सुविधा केंद्रासाठी पणनला १५ एकर जागा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : महाराष्ट्रातून शेतमाल निर्यातीला अधिक चालना देण्यासाठी पणन मंडळाला निर्यात सुविधा केंद्रासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)मध्ये १५ एकर जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध झाली आहे. ही जागा निर्यातीसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीकरिता उपलब्ध करून दिलेली आहे. पाेर्ट ट्रस्टच्या वतीने विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण करण्यात येत आहे. या क्षेत्रातून शेतमाल निर्यातीसाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख प्रयत्नशील हाेते.

पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘देशातील एकूण हाेणाऱ्या शेतमाल निर्यातीमध्ये महाराष्ट्राचा वाटा माेठा आहे. भविष्यातील वाढणाऱ्या निर्यातीसाठी नवी मुंबई येथे निर्यात सुविधा केंद्रासाठी जागा आवश्‍यक हाेती. यासाठी सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या सूचनेनुसार जागेचा प्रस्ताव बंदरे व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात आला हाेता. त्यानुसार ही जागा उपलब्ध झाली आहे.’’

या जागेवर निर्यातीच्या पायाभूत सुविधा पी.पी.पी. तत्त्वावर उभारण्यात येणार आहेत. यासाठी मुंबई येथील फळे व भाजीपाला निर्यातदार असोसिएशन आणि अपेडाबराेबर चर्चा सुरू आहे. याबाबतचा अंतिम प्रस्ताव केंद्राला सादर करण्यात येणार आहे. निर्यातीसाठी कृषिमालाचे कंटेनर वेळेत जहाजावर पोचण्यासाठी कंटेनरची वाहतूक ग्रीन चॅनलच्या माध्यमातून स्वतंत्रपणे करण्याकरिता व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे.

या निर्यात सुविधा केंद्रामुळे शेतमाल निर्यातीमधून शेतकऱ्यांना परकीय चलन उपलब्ध हाेईल. तसेच देशांतर्गत कृषिमालाचे दर स्थिर राहण्यास आणि यामुळे कृषी विकासदर वाढण्यास चालना मिळेल, असा विश्वासदेखील पवार यांनी व्यक्त केला. या सुविधा मिळणार पाेर्ट ट्र्स्टमध्ये उपलब्ध झालेल्या जागेवर विविध पायाभूत सुविधा उपलब्ध हाेणार आहेत.

यामध्ये प्रीकूलिंग चेंबर्स, हॉट वॉटर ट्रिटमेंट सुविधा, शीतगृह, प्लॅंट क्वॉरंटाइन प्रयोगशाळा, रायपनिंग चेंबर, पॅक हाउस, एक्स्प्रेस फीडर, व्हेपर हिट ट्रिटमेंट प्रकल्प, कंटेनर टर्मिनल, इलेक्ट्रिकल सबस्टेशन, फायर स्टेशन, वजनकाटे, यांबरोबरच क्वॉरंटाइन विभागाचे कार्यालय, निर्यातदार आणि समन्वय संस्थेचे कार्यालय, आयातदारांना नमुने दाखविण्यासाठी प्रदर्शन हॉल आदी सुविधा उभ्या करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com