पंधरा लाख क्विंटल कांदा तुंबला 

अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने लेट खरीप कांद्याच्या लागवडी उशिराने झाल्या. आता हा कांदा काढणी करून पडला आहे.
onion
onion

नाशिक : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने लेट खरीप कांद्याच्या लागवडी उशिराने झाल्या. आता हा कांदा काढणी करून पडला आहे. तापमानात वाढ होऊन प्रतवारी व वजन घटत आहे. त्यातच दहा दिवस बाजार समित्या बंद राहणार असल्याने जिल्ह्यात प्रतिदिवस सरासरी दीड लाख क्विंटल आवकेप्रमाणे १५ लाख टन कांदा विक्रीविना तुंबला आहे. तर सरासरी ९०० रुपये प्रतिक्विंटल दराप्रमाणे १३५ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. 

सद्यःस्थितीत शेतकऱ्यांनी लेट खरीप कांदा काढून ठेवला आहे. मात्र तापमानात ३८ अंश सेल्सिअसवर वाढ झाल्याने गुणवत्तापूर्ण मालाचे अतोनात नुकसान होत आहे. असे असताना बाजार समिती व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून न घेता कामकाज बंद ठेवण्यात धन्यता मानली. पुढे कामकाज सुरू होऊन एकदाच आवक वाढण्याची मोठी शक्यता आहे. शेतकऱ्यांचे नुकसान व बंद काळातील शेतकऱ्यांची गैरसोय याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

मुख्य अडचणी अशा 

  • वाढत्या तापमानामुळे लेट खरीप कांद्याची आवरण निघून जाण्यास सुरुवात 
  • उन्हाळ ऐवजी ३० टक्के खरीप बियाणे निघाले 
  • उन्हाळ कांद्याच्या जागी लाल कांद्याचे अतिरिक्त उत्पादन 
  • तापमानामुळे कांद्याच्या वजनात व प्रतवारीत मोठी घट 
  • माल विकता येत नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक कोंडी 
  • पणन, सहकारी संस्था उपनिबंधकांना कळविलेच नाही!  जिल्ह्यातील १७ पैकी १५ बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक होते. त्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत, उमराने, येवला, मनमाड, नामपूर, देवळा येथे लाल कांद्याची आवक अधिक असते. सध्या बँका बंद आहेत हे वास्तव आहे. त्यामुळे रोखीने पैसे देण्यात अडचणी येतात अशी कारणे दिली जातात. मात्र याची पूर्वकल्पना असताना नियोजन केले जात नाही. गेल्या काही वर्षांत ४ ते ५ दिवस कामकाज बंद ठेऊन ताळेबंद करण्यासाठी वेळ घेतला जायचा. मात्र आता कामकाज संगणकीकृत होऊनही अधिक वेळ का घेतला जातो? याबाबत कुठलेच स्पष्टीकरण नाही. शेतीमाल खरेदीनंतर थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी काही बाजार समित्या पुढाकार घेतात. मात्र इतर बाजार समित्या या पद्धतीचा का अवलंबत नाही हा मोठा अनुत्तरित प्रश्‍न आहे. असे अनेक प्रश्‍न असताना बाजार समित्या बंद ठेवण्याबाबत समित्यांनी पणन विभाग व तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांना कळविले नाही.  प्रतिक्रिया  वीजजोडण्या खंडित केलेल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता बिले भरायची आहेत. मात्र बाजार समित्या बंदमुळे हातात पैसा नाही. त्यामुळे आता पिके जळण्याची भीती असून बाजार बंदचा मोठा फटका बसत आहे.  -किरण लभडे, शेतकरी, निमगाव मढ, जि. नाशिक  व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समित्या बंद ठेवणे म्हणजे दडपशाहीच म्हणावी लागेल. कोरोना व मार्चअखेरचा फायदा घेण्यासाठी हे सर्व सुरू आहे.  -डॉ. गिरधर पाटील, शेती प्रश्‍नांचे अभ्यासक  मागील वर्षी कोरोनामुळे परिस्थिती अनाकलनीय होती. मात्र सध्या शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना बाजार समित्या बंद ठेवणे ही व्यवस्थापनाची हतबलता आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर व्यापाऱ्यांनी मीठ चोळू नये. आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो असे व्यापारी सांगतात, मात्र अशा अडचणीच्या काळात त्यांची भूमिका कुठे लुप्त होते.  - नानासाहेब पाटील, संचालक, नाफेड, नवी दिल्ली  बाजार समित्यांनी कामकाज बंद ठेवण्याबाबत पणन मंडळाकडे कळविलेले नाही. जर बंद असल्यास तर का? त्याचे कारण व त्याचा अहवाल मागविणार आहे.  - चंद्रशेखर बारी, उपसरव्यवस्थापक, पणन मंडळ, नाशिक विभाग 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com