उजनी धरणाचे १६ दरवाजे उघडले

उजनी धऱण
उजनी धऱण

सोलापूर ः पुणे जिल्ह्यातील धरणातून सुमारे दोन लाख १४ हजार ७२४ क्‍युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने उजनी धरणाची पाणीपातळी सोमवारी (ता. ५) सुमारे ७० टक्क्यांपर्यंत पोचली. पाण्याचा वाढलेला विसर्ग आणि प्रचंड वेग यामुळे धरणातून पुढे भीमा नदीसह कालवा आणि बोगद्यातून पाणी सोडले जात आहे. त्यासाठी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून नदीत २५ हजार क्‍युसेक इतके पाणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे भीमा नदीकाठी पूरसदृश्‍य स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, कोणत्याही क्षणी नदीकाठी पाणी वाढून पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  सोमवारी सकाळपासून पाण्याच्या विसर्गात लक्षणीय वाढ झाली. रविवारी पुण्याकडून येणारा पाण्याचा विसर्ग एक लाख क्‍युसेकपर्यंत होता. पण सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास हाच वसर्ग २ लाख १४ हजार ७२४ क्‍युसेकपर्यंत होता. जवळपास त्यात आणखी एक लाख १४ हजार ७२४ क्‍युसेकने वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात जेमतेम सरासरी ५० टक्के इतकाही पाऊस झालेला नाही. ११ पैकी जवळपास पाच-सहा तालुक्‍यांत ५० टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस आहे. असे असले तरी पुणे जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण शंभरीकडे वाटचाल करू लागले आहे. उजनी धरण भरल्यानंतर माळशिरस, पंढरपूर, माढा, मोहोळ, करमाळ्याचा काही भाग, मंगळवेढ्याच्या काही भागांतील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्‍न मिटणार आहे.  मागील वर्षी ऑगस्टच्या अखेरीस धरण १०० टक्के भरले होते. पण, यंदा पुणे जिल्ह्यात लवकर पाऊस सुरू झाल्याने ते चार-पाच दिवसांत १०० टक्के भरण्याची शक्‍यता आहे. उजनी धरणात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात असल्याने बोगदा व कालव्यातून पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी सकाळी दहा हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत होते. दुपारी एकच्या सुमारास त्यात वाढ करून ते २५ हजार क्‍युसेकने सोडण्यास सुरवात केली आहे. तर कालव्यातून २००० तर बोगद्यातून १००० क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. त्याशिवाय वीजनिर्मितीसाठी १६०० क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे.  भीमा नदीकाठी पूरसदृश स्थिती दुसरीकडे वीर धरणातून मोठ्या प्रमाणात नीरा नदीत पाणी सोडल्यामुळे नीरा नदीलाही पूरस्थिती निर्माण झाली आहे. वीरमधून रविवारी ८० हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत होते. त्यात सोमवारी २० हजार क्‍युसेकने आणखी वाढ करण्यात आली. त्यामुळे एक लाख क्‍युसेक इतके पाणी नीरेतून पुढे संगम येथून भीमा नदीमध्ये मिसळत आहे. त्यामुळे उजनीतील २५ हजार क्‍युसेक आणि वीरमधील एक लाख क्‍युसेक असा सव्वा लाखाचा विसर्ग सध्या भीमा नदीमध्ये मिसळत असल्याने प्रशासनाने भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.  पंढरपुरात पुंडलिक मंदिराला वेढा वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने गेल्या चार दिवसांपासून वीर धरणातून पुढे नीरेत पाणी सोडले जात आहे. परिणामी, नीरेतून भीमा नदीत पाणी येत असल्याने पंढरपुरात नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वाळवंटातील श्री पुंडलिक मंदिरासह लगतच्या मंदिरांना पाण्याने वेढले आहे. त्यात आता उजनी धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढल्याने दोन्हीकडून येणाऱ्या पाण्यामुळे पूरपरिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उजनी धरणातील पाणीसाठा  एकूण पाणीपातळी: ४९५.४०० मीटर एकूण पाणीसाठा: १०१.२९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा: ३७.६२ टीएमसी पाण्याची टक्केवारी: ७०.२३ टक्के 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com