मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत गुरुवारी मराठा समाजाला आरक्षण देणारे विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून शिक्षणासह शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील सामाजिकप्रश्नी सर्व पक्ष आपली राजकीय भूमिका बाजूला ठेवून एकत्र येतात हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
संग्रहित चित्र
संग्रहित चित्र

मुंबई  : बहुप्रतीक्षित मराठा समाज आरक्षण विधेयक गुरुवारी (ता. २९) राज्य विधिमंडळात विनाचर्चा एकमताने मंजूर झाले. राज्यातील विद्यमान ५२ टक्के आरक्षणास धक्का न लावता या विधेयकान्वये मराठा समाजाला १६ टक्के स्वतंत्र आरक्षण लागू झाले आहे. या कायद्यामुळे मराठा समाजाला राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमध्ये नियुक्त्या आणि पदांमध्ये आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण विधेयकास दोन्ही सभागृहांत मंजुरी मिळताच भाजप, शिवसेना आमदारांनी एकच जल्लोष केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत २०१८ चे विधानसभा विधेयक क्रमांक ७८ महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) नागरिकांच्या वर्गाच्या प्रगतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्या आणि पदांच्या आरक्षणासाठी तसेच तत्संबंधित किंवा अनुषांगिक बाबींची तरतूद करण्यासाठी विधेयक मांडत असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर विधिमंडळात एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आले.  

विधानसभेत सव्वाबारा वाजता मुख्यमंत्र्यांनी प्रथमतः मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी नियुक्त केलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल मांडला. त्यानंतर तासभर विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. तोपर्यंत विधिमंडळातील सर्व सदस्यांना कृती अहवाल आणि मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा देण्यात आला. तासाभराने विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडले.

या विधेयकाला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार, शेकापचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख आदी सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दर्शविला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेने हे विधेयक एकमताने मंजूर केल्याचे जाहीर केले. त्यानंतर विधान परिषदेतही हे विधेयक मंजूर करण्यात आले.

मागासवर्ग आयोगाने राज्य शासनास १५ नोव्हेंबर २०१८ ला आपला अहवाल सादर केला आहे. आयोगाचा हा अहवाल, अहवालातील निष्कर्ष, अनुमान आणि शिफारशी शासनाने विचारात घेतल्या आहेत. मराठा समाजाचे सार्वजनिक सेवायोजन, शिक्षण, सामाजिक, आर्थिक स्थिती, लोकसंख्येचे प्रमाण, राहणीमान, कुटुंबांनी धारण केलेल्या अल्प जमिनी, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण, उपजीविकेसाठी करण्यात आलेल्या कामांचे प्रकार, कुटुंबांचे स्थलांतर आदींसारख्या विविध घटकांवर आधार सामग्रीद्वारे विश्लेषण केलेल्या आयोगाच्या परिपूर्ण अभ्यासाच्या आधारे शासनाने हा आरक्षणाचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधेयकाद्वारे स्पष्ट केले.

मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असून, तो एक मागास प्रवर्ग आहे. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून मराठा समाजाला घोषित केल्यावर निर्माण झालेली अपवादात्मक परिस्थिती व असाधारण स्थिती आणि ते आरक्षणाच्या लाभासाठी हक्कदार असल्याचे लक्षात घेऊन राज्यात सध्या लागू असलेल्या विद्यमान ५२ टक्के आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षणाची तरतूद करणे इष्ट वाटते, असे राज्य शासनाने विधेयकात स्पष्ट केले आहे.

त्यासोबत अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी कोणत्याही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या नागरिकांच्या प्रगतीसाठी कायद्याद्वारे विशेष तरतूद करणे इष्ट आहे. परंतु ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, महानगर पालिका आदींच्या निवडणुकांसाठी जागांच्या आरक्षणाचा अशा विशेष तरतुदींमध्ये समावेश असणार नाही.

अल्पसंख्याक वर्गाच्या शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त इतर शैक्षणिक तसेच खासगी शैक्षणिक संस्था मग त्या राज्याद्वारे अनुदानप्राप्त असोत किंवा नसोत यांमध्ये प्रवेश देण्यासाठी राज्याच्या अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या नावाने असलेले आरक्षण वगळून, राज्यातील लोकसेवांमधील नियुक्त्या व पदे यात आरक्षणाची तरतूद करणे इष्ट आहे.

मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे शासनाने या प्रवर्गासाठी सरळसेवा भरतीसाठीच्या शैक्षणिक अर्हतांचा दर्जा शासनाने कमी केला नसल्याने प्रशासनातील कार्यक्षमता बाधित होणार नाही आणि त्यामुळे अशा सेवा प्रवेशासाठी त्यांच्यामध्ये निश्चितपणे स्पर्धा निर्माण होईल आणि या प्रयोजनांसाठी योग्य तो कायदा करणे आवश्यक असल्याचे राज्य शासनाने विधेयकात म्हटले आहे. त्यानुसार राज्य शासनाने उन्नत व प्रगत गटाखालील अशा प्रवर्गातील व्यक्तींना सध्याच्या काळात पुढे आणण्यासाठी विशेष साह्याची गरज आहे, जेणेकरून त्यांना समाजाच्या प्रगत घटकासोबत समानतेच्या टप्प्यात येणे शक्य होईल. तेथून त्यांना स्वतःलाच पुढे जाणे शक्य होईल असे शासनाने स्पष्ट केले आहे. ही सगळी उद्दिष्टे साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू असल्याचे राज्य शासनाने म्हटले आहे.

आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने राज्यभरात ५८ मोर्चे काढण्यात आले. अत्यंत शिस्तबद्धपणे आणि शांततेत निघालेल्या मोर्चांनी आंदोलनाचा आदर्श घालून दिला. त्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनही विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर रान पेटवले होते. अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाने गुरुवारी (ता. २९) हा कायदा मंजूर केला.

७६ टक्के मराठा कुटुंबे शेती, शेतमजुरीत राज्यात मराठा समाजातील सुमारे ७६.८६ टक्के इतकी कुटुंबे त्यांच्या उपजीविकेसाठी शेती आणि शेत मजुरीचे काम करतात. तसेच या मराठा कुटुंबातील भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांची टक्केवारी (अडीच एकरपेक्षा कमी जमिनीची मालकी) ७१ टक्के इतकी आहे.   राज्य मागासवर्ग आयोगाचे प्रमुख निष्कर्ष अ) मागासलेपणा

  • राज्यातील मराठा नागरिकांच्या वर्गास सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास समाज म्हणून कमाल २५ पैकी २१.५ इतके गुणांकन मिळालेले आहे.
  • मराठा नागरिकांचा वर्ग हा त्याच्या मागासलेपणाच्या आधारे मागासवर्ग प्रवर्गामध्ये समावेश करण्यास पात्र आहेत.
  • मराठा समाजातील व्यक्तींनी सरासरी ४.३० टक्के इतकी शैक्षणिक व अध्यापक पदे व्यापलेली आहेत.
  • ब) सरकारी नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्व राज्यातील सरकारी नोकऱ्यांमधील अ, ब, क आणि ड या श्रेणींमध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधित्व हे त्यांचे राज्य लोकसंख्येतील हिश्‍श्‍याचे प्रमाण सुमारे ३० टक्के आहे. एवढेच नव्हे तर सरकारी पदांच्या या श्रेणीकरिता किमान शैक्षणिक अर्हता असलेल्या पदवीधरांच्या अपुऱ्या संख्येमुळे देखील पुरेसे नसल्याचे दिसून आले आहे.   आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडण्याबद्दलची असाधारण स्थिती

  • राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के इतके प्रमाण असलेल्या मराठा समाजाला संख्यात्मक आकडेवारीच्या आधारे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घोषित केल्यानंतर आणि त्याच्या परिणामी त्याला घटनात्मक आरक्षणाचा लाभ मिळण्याचा हक्क प्रदान करण्याची असामान्य परिस्थिती उद्भवली आहे. राज्यातील नोकऱ्यांसाठी आणि राज्याच्या शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी असलेल्या ५० टक्के आरक्षणाच्या विद्यमान मर्यादेचा, या असामान्य स्थितीच्या आणि अपवादात्मक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुनर्विचार करावा लागेल.
  • एका बाजूला ५० टक्क्यांच्या आरक्षण मर्यादेचे उल्लंघन न करणे आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांना नागरिकांचा प्रगत वर्ग म्हणून दाखवून त्याच्या विषम स्पर्धेला तोंड द्यावे लागणे यामुळे मराठा समाजाला आतापर्यंत खूप झळ सोसावी लागली आहे. प्रत्यक्षात, स्वातंत्र्यापूर्वी, त्यांचा मागास प्रवर्गात समावेश करण्यात आला होता. आणि त्यानंतर अगदी १९५२ पर्यंत, स्वातंत्र्यांच्या नंतरदेखील मध्यम जाती प्रवर्गात त्यांचा अंतर्भाव केला होता, जे नागरिकांच्या सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचा (एसईबीसी) नवीन स्वरूपाचे एक जुनेच रूप आहे.
  • तेव्हाच्या इतर अनेक जाती गटांचा मध्यम जाती प्रवर्गात समावेश करतेवेळी मराठा समाजाचा त्यात अंतर्भाव केला होता. किंवा ज्यांना त्या वेळच्या मध्यम जाती प्रवर्गात स्थान मिळाले नव्हते. त्यांचाही आता मागासवर्गाच्या विद्यमान यादीमध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे, परंतु मराठा समाजाला कोणतेही कारण न देता त्यातून वगळण्यात आले होते आणि नागरिकांच्या प्रगत वर्गात टाकण्यात आले आणि त्यांना या कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले.
  •   मराठा समाजाची सामाजिक स्थिती दर्शवणारे ठळक मुद्दे

  • समाजातील सुमारे ७६.८६ टक्के मराठा कुटुंबे त्यांच्या उपजीविकेसाठी शेती आणि शेत मजुरीचे काम करीत असल्याचे आढळून आले आहे.
  • सुमारे ६ टक्के मराठा नागरिक हे शासकीय किंवा निमशासकीय सेवेत आहेत, त्यापैकी बहुतांश पदे ही राज्य सेवेतील गट ड मधील आहेत.
  • २०१३ ते १८ या कालावधीत एकूण १३,३६८ शेतकरी आत्महत्या झाल्या त्यापैकी २,१५२ (२३.५६ टक्के) आत्महत्या या मराठा शेतकऱ्यांनी केल्या आहेत.
  • गेल्या दहा वर्षांत २१ टक्के मराठा कुटुंबातील सदस्य उपजीविकेसाठी शहरी भागात स्थलांतरित झाले असून, त्यांना माथाडी, हमाल, डबेवाला, घरगडी, गोदी कामगार आदींसारखी कामे करावी लागतात.
  • सामाजिक मागासलेपणा किंवा प्रगतिशीलता यासाठी कोणत्याही समाजातील महिलांची स्थिती हा सर्वांत महत्त्वाचा निकष आहे. सर्वेक्षणात ८८.८१ टक्के मराठा महिला उपजीविकेसाठी मोलमजुरीचे काम करतात. यात कुटुंबासाठी त्या जी घरगुती कामे करतात याचा समावेश नाही.
  • मराठा समाजाची आर्थिक स्थिती दर्शवणारे ठळक मुद्दे

  • सुमारे ९३ टक्के मराठा कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १ लाख इतके आहे. हे उत्पन्न मध्यमवर्गीय कुटुंबांच्या सरासरी उत्पन्नापेक्षा कमी आहे.
  • मराठा समाजातील दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांची टक्केवारी ही २४.२ टक्के असून, ती राज्यात सरासरीच्या तुलनेत ३७.२८ टक्के आहे.
  • मराठा कुटुंबातील भूमिहीन व अल्पभूधारक शेतकऱ्यांची टक्केवारी (अडीच एकरपेक्षा कमी जमिनीची मालकी) ७१ टक्के इतकी आढळून आली आहे, तर सुमारे १० एकर इतकी जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांची टक्केवारी ही फक्त २.७ टक्के आढळून आली आहे.
  •   विविध अनुमान, निष्कर्षांच्या आधारे आयोगाने केलेल्या शिफारशी

  • मराठा नागरिकांच्या वर्गास नागरिकांचा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (एसईबीसी) म्हणून घोषित केले आहे. आणि राज्याच्या सेवांमध्ये त्यांचे अपुरे प्रतिनिधित्व आहे.
  • नागरिकांचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला मराठा नागरिकांचा वर्ग हा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १५ (४), १६ (४) मध्ये घालून दिलेल्या आरक्षणाचे लाभ व फायदे मिळण्यास हक्कदार आहे.
  • आरक्षणाच्या लाभासाठी, मराठा नागरिकांच्या वर्गाला, नागरिकांचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणून घोषित केल्यावर आणि त्यांचे अनुषांगिक हक्क यामधून उद्भवलेली अपवादात्मक व असाधारण परिस्थिती पाहता शासनास राज्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीची समस्या सोडवण्यासाठी संविधानिक तरतुदींमध्ये यथोचित निर्णय घेता येईल.
  • मराठा समाजाचा मोठा विजय ः राधाकृष्ण विखे पाटील

    मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या काँग्रेस आघाडी सरकारच्या निर्णयावर विधिमंडळात पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. संघर्ष आणि बलिदानातून मिळालेला हा मराठा समाजाचा मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

    माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण ः धनंजय मुंडे आजचा दिवस ऐतिहासिक आहे. विधान परिषदेत सरकारने मांडलेल्या मराठा आरक्षणाला माझ्यासह सर्व विरोधी पक्षांनी एकमताने पाठिंबा दिला. आज माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. या आरक्षणासाठी लढा देणाऱ्या सकल मराठा समाजाचे आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com