देशभरात १६ हजार कोटींची एफआरपी थकली

सध्या कारखान्यांना तातडीने कर्जपुरवठा (सॉफ्ट लोन) करण्याबाबत केंद्राने पावले उचलणे गरजेचे आहे. जुन्या कर्जाचे पुर्नगठण करुन जलदरित्या नवे कर्ज मिळणे गरजेचे आहे. याशिवाय २०१९ च्या व्याजदराबाबत केंद्राने पावले उचलून सकारात्मक निर्णय घ्यावेत. तरच शेतकऱ्यांची थकबाकी कमी होइल आणि पुढील हंगामही सुरु करणे शक्‍य होइल - विजय औताडे, साखर तज्ज्ञ
देशभरात १६ हजार कोटींची एफआरपी थकली
देशभरात १६ हजार कोटींची एफआरपी थकली

कोल्हापूर: कोरोनाचा मोठा परिणाम देशातील साखर उद्योगावर झाला आहे. स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेची विक्री थांबल्याने देशातील साखर कारखानदारांना एफआरपी देणे शक्‍य होत नसल्याची स्थिती आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत देशातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे तब्बल १६ हजार कोटी रुपये थकविले आहेत. सर्वाधिक थकबाकी उत्तर प्रदेशातील कारखानदारांची तर त्या खालोखाल कर्नाटक राज्यातील कारखान्यांनी शेतकऱ्यांची रक्कम थकविली आहे. 

जागतिक मंदीचा फटका गेल्या दोन महिन्यात साखर उद्योगाला बसला आहे. वेळीच उपाय न झाल्यास येणाऱ्या हंगामात मोठा तोटा साखर उद्योगाला बसण्याची शक्‍यता निर्माण झाल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात येत आहे. यंदाचा अपवाद वगळता गेल्या तीन वर्षात साखरेच्या उत्पादनात वाढ होती. साखर शिल्लक राहत असल्याने साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना रक्कम देणे अडचणीचे ठरत होते. जानेवारी ते मार्चच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत निर्यात साखरेचे दर वाढत असल्याने यंदा मेपर्यंत तरी चांगली निर्यात होइल अशी अपेक्षा होती. सध्या ६० लाखांपैकी ४० लाख टन साखरेचे करार झाले आहेत. पण कोरोनाच्या तडाख्यात सापडलेल्या देशांनी सीमा सील केल्याने सध्या दहा लाख टन साखर बंदरात पडून राहिली. याचा फटका कारखान्यांना अद्यापही बसत आहे. यातच स्थानिक व आंतरराष्ट्रीय पातळीवरही मागणी कमी झाल्याने दर घसरले. स्थानिक बाजारपेठेत साखरेची किंमत क्विंटलला शंभर रुपयाहून अधिक प्रमाणात घसरली. यामुळे अर्थकारण बिघडले. कोणत्याही परिस्थितीस कारखान्यांच्या अर्थपुरवठ्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर पुढचा हंगाम सुरु करणे कारखान्यांना कठीण जाईल, अशी शक्‍यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.  सरकारकडून देय असलेले निर्यात अनुदान, अद्यापही अनेक कारखान्यांना मिळाले नाही. त्याची पूर्तता सध्या घडीला होणे गरजेचे आहे. याशिवाय कर्जाचा पुरवठा करतानाही सुलभपणा आणून जास्तीत जास्त रक्कम बॅंकांकडून कारखान्यांना मिळाल्याशिवाय कारखान्यांचा बोजा कमी होणे अशक्‍य असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. 

यंदा साखर निर्यात होणे अशक्‍य? जूनपर्यंत स्थिती सुधारली नाही तर पावसाळा संपेपर्यंत साखर निर्यात होणे अशक्‍य असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. जूननंतर अनेक ठिकाणी बंदर बंद होतात. सध्या अनेक बंदरावर लाखो टन साखर पडून आहे. तीच जूनच्या पूर्वी बंदरातून बाहेर पडणे गरजेचे आहे. देशात कोरोनाचा वाढता धोका पाहता मे मध्ये सुद्धा स्थिती कितपत पूर्वपदावर येते याबाबत शंकाच व्यक्त होते. बाहेरील देशात तर आणखीच भयंकर स्थिती असल्याने पहिल्यांदा बंदरातील अडकलेली साखर त्या त्या देशात पोच करणे हेच आव्हान असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com