दूध अनुदानापोटी वाटले २५३ कोटी

दूध
दूध

पुणे: शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये भाव मिळण्यासाठी आतापर्यंत शासनाने २५३ कोटी रुपयांचे अनुदान वाटलेले आहे. उर्वरित अनुदान देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली. दरम्यान, पावडर व बटर बाजारातील तेजी आणि दुष्काळामुळे भविष्यात दुधाचे भाव कमी होण्याची शक्यता नाही, असे महाराष्ट्र दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे म्हणणे आहे.  संघाचे राज्य सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, की पावडरचे बाजार कोसळल्यामुळे मधल्या काळात शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची योजना सुरू केली. या योजनेमुळे दुधाचे दर शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपयांपर्यंत मिळू लागले. सध्याची स्थिती बघता दूध पावडर व बटरच्या किमती तेजीत आहेत. त्यामुळे शासनाने अनुदान बंद केले तरी दुधाचे दर शेतक-यांसाठी कमी होण्याची शक्यता वाटत नाही. दुष्काळात कमी होणारे दुग्धोत्पादन लक्षात घेता तसेच उपपदार्थांना मिळत असलेले चांगले दर विचारात घेतल्यास शेतकऱ्यांच्या खिशात जाणारे चार पैसे कमी करावेत, असे कोणत्याही दुग्ध प्रकल्पाला वाटणार नाही.  बाजारात दूध पावडरला सध्या प्रतिकिलो १९० रुपये तर बटरला २३० रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. त्यामुळे पावडर व बटर बाजारात तेजी असूनही दुधाचे खरेदीदर संघांनी का वाढविले नाहीत, असा सवाल दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच इतर कोणत्याही राजकीय पक्षाने हस्तक्षेप न केल्यामुळे दूध प्रकल्पांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याची टीकादेखील छोट्या दूधउत्पादक सोसायट्यांनी केली आहे.       शेतकऱ्यांच्या ‘एसएनएफ’वर दरोडा : डेरे कल्याणकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष गुलाबराव डेरे म्हणाले, ‘‘अतिशय कष्टाने दुष्काळी स्थितीत राज्यातील शेतकरी दुधाचे उत्पादन घेतो आहे. मात्र, मिल्क लॉबीशी पद्धतशीरपणे संगनमत करून राज्य सरकारच्या परवानगीने एसएनएफवर दरोडा टाकण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे राज्यात ३.२ फॅट्स व ८.३ एसएनएफच्या निकषाप्रमाणे दूधखरेदी व विक्री होणे आवश्यक आहे. मात्र, मिल्क लॉबीकडून ३.५ फॅट्स आणि ८.५ एसएनएफचा जुनाट निकष वापरून शेतकऱ्यांची लूट चालू आहे.  ८.३ एसएनएफ असल्यास थेट दोन रुपये कपात करण्याचा परवाना राज्य सरकारने कशाच्या आधारावर मिल्क लॉबीला दिला, दुग्धविकास खाते हा अन्याय शेतकऱ्यांवर होत असताना झोपा काढते काय, शेतकऱ्यांना रोजच्या दुधाच्या चिट्ठ्या देणे बंद करून दुधाचे भाव पाडू असा दम भरण्याचे काम सुरू असताना सरकार गप्प का बसले, असे संतप्त सवाल श्री. डेरे यांनी उपस्थित केले आहेत.  तीन महिन्यांचे अनुदानही मिळेल ः दुग्धविकास आयुक्त राज्याचे दुग्धविकास आयुक्त नरेंद्र पोयाम यांनी अग्रोवनला सांगितले, “शेतकऱ्यांना प्रतिलिटर २५ रुपये दर मिळण्याबाबत आधी घोषित झालेल्या योजनेतील अनुदानाच्या रकमा देण्यासाठी कार्यवाही अजूनही चालूच आहे. अडीचशे कोटीच्या आसपास अनुदान जमा करण्यात आलेले आहे. तीन महिन्यांचे राहिलेले अनुदान अदा करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे.”  दूध अनुदान योजनेच्या भविष्यकालीन अंमलबजावणीबाबत विचारले असता, “पुढील कालावधीत अनुदान राहील किंवा कसे, याविषयी आयुक्तालयाकडून कोणतेही भाष्य करता येणार नाही. ही बाब पुर्णतः धोरणात्मक आहे. अनुदान नसताना दुधाचे दर कसे असतील हे केवळ बाजारातील स्थितीवर अवलंबून असेल,”  असेही दुग्धविकास आयुक्तांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com