पुणे जिल्ह्यातील १७ धरणे ओसंडून वाहू लागली

पुर
पुर

पुणे : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील १७ धरणे ओसंडून वाहत असल्याने नद्यांना पूर आला आहे. मुळशी, पवना आणि खडकवासला धरणांतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने मुळा-मुठा, नीरा नदीने इशारा पूर पातळी ओलांडली आहे. तर भीमा नदीलादेखील मोठा पूर आला आहे. पश्चिम तालुके आणि घाटमाथ्यावर दमदार पाऊस पडत असला तरी, पूर्व भागात मात्र हलक्या सरींची येत आहेत.     कुकडी, भीमा, घोड, भामा, इंद्रायणी, पवना, मुळा-मुठा, नीरा आणि कानंदी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. खडकवासला धरणातून सुमारे ४५ हजार क्युसेक, मुळशी ३६ हजार क्युसेक आणि पवना धरणातून सुमारे १४ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीने इशारा पूर पातळी ओलांडली. बंडगार्डन बंधाऱ्याजवळ नदीपात्रातून सुमारे एक लाख क्युसेक वेगाने पाणी वाहत होते. तर वीर धरणातून सकाळी ७० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आल्याने नीरा नदी इशारा पातळीवर पोचली होती. दौंड येथे भीमा नदीपात्रातून ८५ हजार क्युसेक वेगाने उजनीत पाणी जमा होत होते.   जिल्ह्यातील पिंपळगाव जोगा, नाझरे धरण उपयुक्त पाणीपातळीत आले आहे. तसेच पुरेसा पाणीसाठा झाल्याने येडगाव धरणातून सुमारे ६० हजार, वडज क्युसेक ४ हजार, डिंभे १८ हजार, चासकमान २३ हजार, भामा असखेड १३ हजार, वडीवळे ७ हजार, आंद्रा २ हजार ५००, कासारसाई ३ हजार ५००, टेमघर ५६३, पानशेत १३ हजार, गुंजवणी ७ हजार आणि नीरा देवघर धरणातून १२ हजार क्युसेक वेगाने पाणी नदीपात्रात सोडण्यात येत होते.    रविवारी (ता. ४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) टेमघर १११, वरसगाव १२०, पानशेत १२३, खडकवासला ३२, पवना १८०, कासारसाई ८४, मुळशी १९०, कळमोडी ६६, भामा आसखेड ६२, आंद्रा ७७, वडीवळे १४४, गुंजवणी १००, नीरा देवघर १४२, पिंपळगाव जोगे ४३, माणिकडोह ५६, येडगाव ४२, वडज ३६, डिंभे ५४. लोणावळ्यात सर्वाधिक ३८४ मिलिमीटर पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि पश्चिम भागात पावसाचा दणका कायम आहे. रविवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासंमध्ये मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर, खेड तालुक्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. हवेली तालुक्यात मध्यम, तर पूर्व भागातील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांत हलक्या सरींचा पाऊस झाला. लोणावळा येथे सर्वाधिक ३८४ मिलिमीटर तर कार्ला येथे २६३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  जिल्ह्यात मंडळनिहाय पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : महसूल विभाग) : पौड १०६, घोटावडे १४०, थेरगाव ६२, माले १९०, मुठा १११, पिरंगूट १०५, भोलावडे १४८, आंबवडे ६१, निगुडघर १४२, वडगाव मावळ ९६, काळे १८३, कार्ला २६४, खडकाळा १४१, लोणावळा ३८४, शिवणे ९०, वेल्हा १३४, पानशेत १२३, विंझर ९८, आंबवणे ९०, राजूर १९७, डिंगोरे १२२, ओतूर ५९, वाडा ६६, कुडे १०८, आंबेगाव (डिंभे) ५४. घोड नदीपात्रात विसर्ग डिंभे धरण क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे डिंभे धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे धरणातून घोड नदीपात्रात २१०६० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. पाणी वाढवल्याने घोड नदीला पूर आला आहे. पावसाचे प्रमाण वाढले तर अजूनही पाण्याचा विसर्ग वाढवणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डिंभे धरण फुल्ल भरले आहे. त्यामुळे टप्प्या-टप्प्याने पाणी घोड नदी व उजवा-डावा कालव्यात सोडले जात आहे. २७ जुलै रोजी डिंभे धरण ४६ टक्के भरले होते त्यानंतर धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या आठ दिवसांत धरण ५० टक्के भरले. तसेच गेल्या चार दिवसांपासून घोड नदी, उजवा व डावा कालव्यात पाणी सोडले जात आहे. रविवारी ११ वाजता डिंभे धरणातून घोड नदी पात्रात २१०६० क्युसेक पाणी सोडण्यात आले. गोहे तलावातील पाणी तसेच ओढ्या नाल्यांचे पुराचे पाणी घोड नदी पात्रात जात आहे. त्यामुळे घोड नदीला पूर आला आहे. उजव्या कालव्यात १०० तर डावा कालव्यात ३०० क्युसेक पाणी सोडले जात आहे. डिंभे धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने डिंभे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे घोड नदी पात्रात पाण्याचा विसर्गात कधीही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घोड नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com