बेकायदा कीटकनाशक विक्री; १७ परवाने निलंबित

राज्यात एकाच वेळी कीटकनाशकांच्या साठ्याची तपासणी करण्याची कल्पना कृषी आयुक्तांनी मांडली होती. त्यानुसार झालेल्या कारवाईला मोठ्या प्रमाणात यश आले असून, बाजारात बोगस कीटकनाशके येण्यास आळा बसला आहे. - विजयकुमार इंगळे, कृषी संचालक, गुण नियंत्रण विभाग, कृषी आयुक्तालय, पुणे
बेकायदा कीटकनाशक विक्री; १७ परवाने निलंबित
बेकायदा कीटकनाशक विक्री; १७ परवाने निलंबित

पुणे : यवतमाळ विषबाधा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील कीटकनाशकांच्या साठ्यांची तपासणी करण्याचा निर्णय कृषी आयुक्तांनी घेतल्यानंतर आतापर्यंत बेकायदा साठा व विक्रीच्या १७ घटना उघड झाल्या आहेत. या प्रकरणात संबंधितांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.    कीटकनाशकांच्या साठ्यांची तपासणी करण्यासाठी मोहीम राबविण्याचे आदेश कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी एप्रिलमध्ये दिले होते. ‘‘कीटकनाशकांच्या साठवण स्थळांची अचानक तपासणी करण्याचा मुख्य हेतू या मोहिमेचा होता. १२ ते १४ जुलै या दोन दिवसांत राज्यभर एकाच वेळी मोहीम घेण्यात आली. त्यानुसार बेकायदा कामे करणाऱ्या १७ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. या मोहिमेत कारवाई करण्यात आलेले १७ जण हे विक्रेते आहेत की कंपन्या आहेत तसेच निलंबित परवानाधारक आणि परवाने रद्द करण्यात आलेल्या कंपन्या कोणत्या याची माहिती मात्र कृषी विभागाने जाहीर केलेली नाही. या मोहिमेत ६५ गुणवत्ता निरीक्षकांनी भाग घेतला होता.  यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे गेल्या वर्षी विषबाधा झाल्याने १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. शेकडो शेतकऱ्यांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले, तर २५ शेतकऱ्यांना अंधत्व आले. यामुळे राज्य शासनाला एसआयटी नेमून प्रकरणाचा तपास करावा लागला होता. कीटकनाशकांच्या तपासणी मोहिमेत एकूण ३४२ ठिकाणी तपासणी करण्यात आली. प्रयोगशाळेकडे यानंतर ६५२ नमुने पाठविण्यात आले. कीटकनाशक कायदा १९६८ आणि कीटकनाशके नियम १९७१ मधील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने १२.७५ टन कीटकनाशकांच्या साठ्यास विक्री बंदचे आदेश देण्यात आले.  राज्याचे गुण नियंत्रण संचालक विजयकुमार इंगळे व मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुभाष काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. ‘‘राज्यात कोणीही शेतकऱ्यांना अनधिकृत कीटकनाशके विकू नयेत, तसेच शिफारस केलेल्या पिकांसाठी व मान्यता असलेल्या भागांसाठी जी कीटकनाशके आहेत त्याचीच विक्री करावी. शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.  फरिदाबादच्या केंद्रीय कीटकनाशके मंडळ व नोंदणी समितीने कीटकनाशकनिहाय पिकांसाठी केलेल्या शिफारशी कृषी विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या वेबसाइटवर ‘निविष्ठा’ या तपशिलातील ‘कीटकनाशके’ या मेन्यूमध्ये दिलेल्या आहेत. शेतकरी बांधवांनी या वेबसाइटवरील शिफारशींप्रमाणेच कीटकनाशकांचा योग्य वापर करावा, असेही कृषी विभागाचे म्हणणे आहे.   सहा कंपन्यांचे परवाने रद्द   यवतमाळ तसेच इतर जिल्ह्यातील शेतमजूर व शेतकरी यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाल्यामुळे कृषी आयुक्तांनी गुणनियंत्रण विभागाला अतिशय दक्षता घेण्याच्या सूचना केल्या असून, आतापर्यंत सहा कंपन्यांचे परवानेदेखील निलंबित करण्यात आलेले आहेत.  कृषी विभागाची कारवाई...

  • वर्षभरात कीटकनाशकांबाबत कारवाई झालेली प्रकरणे ः २३४४ 
  • विक्री बंद आदेश दिलेल्या कीटकनाशकांच्या साठ्यांची किंमत ः १४.५६ कोटी रुपये 
  • जप्त करण्यात आलेली कीटकनाशके ः सात कोटी ४४ लाख रुपये
  • परवाना निलंबनाची प्रकरणे ः १९८ 
  • परवाने रद्द ः ५३ 
  • फौजदारी कारवाई झालेली संख्या ः १३
  • न्यायालयात दावा दाखल केलेली प्रकरणे ः १८६
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com