181 crore for destroyed crops in Nashik district
181 crore for destroyed crops in Nashik district

नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची मदत

नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या वतीने १८१ कोटी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात सुमारे सात लाख ७७ हजार शेतकऱ्यांच्या ६ लाख ४७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, जिल्हा प्रशासनाने ६३६ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा नुकसानीपोटी मदत देण्याची मागणी सरकारकडे करावी लागणार आहे. 

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे काम जिल्ह्यात हाती घेण्यात आले होते. नांदगाव, निफाड, मालेगाव, सिन्नर, चांदवड, येवला, बागलाण या तालुक्यांमध्ये पावसामुळे सर्वाधिक नुकसान झाले. मका, सोयाबीन, कांदा, द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला, कापूस या पिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या तुलनेत प्राप्त झालेली रक्कम पुरेशी नाही. १८१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी प्राप्त झाला असून, बाधित शेतकऱ्यांची संख्याही सात लाखांहून अधिक आहे. त्यामुळे एका शेतकऱ्याच्या वाट्याला २ हजार ३२९ रुपये येणार आहेत.

शेतकऱ्यांचे कितीही क्षेत्रावरील नुकसान झाले असले तरी त्यांना केवळ दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानासाठीच मदत दिली जाणार आहे. त्यामुळे शेतपिकांसाठी अधिकाधिक १६ हजार रुपये, तर बागायत पिकांसाठी अधिकाधिक ३६ हजार रुपये मदत शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. शिवाय प्राप्त अनुदान दोन हेक्टरच्या आतील व ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाच देण्याबाबतचे आदेश असून, त्यामुळे ३३ टक्क्यांपेक्षा कमी आणि दोन हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागणी ६३६ कोटींची; मिळाले फक्त १८१ कोटी 

शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने ६३६ कोटी २३ लाख ३३ हजार रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली होती. सरकारने शेतपिकांसाठी प्रतिहेक्टर आठ हजार रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी १८ हजार रुपये मदत जाहीर केली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान असल्याने जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात सर्वाधिक १८१ कोटी ५० लाख ८४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीचे मंगळवारी वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात नुकसान असे...

 बाधित गावे १ हजार ९५९ 
बाधित शेतकरी ७ लाख ७६ हजार ९७०
बाधित क्षेत्र ६ लाख ४७ हजार ३१५.६६

पिकांचे नुकसान असे (हेक्टरमध्ये) 

जिरायती पिके ४ लाख ९ हजार २७५ 
बागायती पिके १ लाख ५६ हजार ३५०
बहुवार्षिक फळपिके ८१ हजार २७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com