नांदेड जिल्ह्यात सन्मान योजनेचे २ लाख ८९ हजार लाभार्थी

शेतकरी सन्मान निधी योजनेचे २ लाख ८९ हजार लाभार्थी
शेतकरी सन्मान निधी योजनेचे २ लाख ८९ हजार लाभार्थी

नांदेड ः नांदेड जिल्ह्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गंत २ लाख ८९ हजार ३५१ पात्र शेतकरी लाभार्थी कुटुंब आहेत. त्यापैकी २ लाख ६० हजार ३०४ कुटुंबांची माहिती एनआयसी पोर्टलवर करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर २ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला जात आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील १ हजार ५७५ गावांपैकी ‘आठ अ’ प्रमाणे एकूण ७ लाख ९५ हजार ८०० शेतकरी खातेदार आहेत. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत परिशिष्ट ‘अ’ प्रमाणे अनिवार्य माहिती संकलीत झालेली गावांची संख्या १ हजार ५६८ असून परिपूर्ण असलेले पात्र शेतकरी कुटुंब २ लाख ८९ हजार ३५१ एवढी आहेत. त्यापैकी १ हजार ५१० गावांची माहिती एनआयसी पोर्टलवर अपलोड करण्यात आली. माहिती अपलोड केलेल्या पात्र शेतकरी कुटुंबांची संख्या २ लाख ६० हजार ३०४ एवढी असून टक्केवारी ८९.९६ एवढी आहे, अशी माहिती देण्यात आली. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा, तालुका, ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.  

या योजनेचा जिल्हास्तरीय प्रारंभ रविवारी (ता. २४) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहामध्ये झाला. या वेळी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. बी. चलवदे, कृषी उपसंचालक माधुरी सोनवणे, तहसिलदार किरण अंबेकर, उज्ज्वला पांगरकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, एन. टी. पाटे आदींची उपस्थिती होती.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमुळे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळत असून शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करणे सोईचे होईल, कर्ज काढावे लागणार नाही, असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोरखपूर येथे झालेल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा प्रारंभ तसेच ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दाखविण्यात आले.

प्रास्ताविक श्री. चलवदे यांनी केले. या वेळी शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. ‘वनामकृवि’अंतर्गत कापूस संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ अरविंद पांडागळे यांनी कापूस पीक, प्रगतिशील शेतकरी भगवान इंगोले यांनी सेंद्रीय शेतीची माहिती दिली. कृषी अधिकारी पूनम चातरमल, कृषी व महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com