राज्यात केळी २०० ते १५०० रुपये क्विंटल

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील केळी बाजारात गुरुवारी (ता. ६) केळीची सुमारे ५० टन आवक झाली. या वेळी दहा किलोला ९० ते १०० रुपये दर मिळाला.
200 to 1500 per quintal of banana in the state
200 to 1500 per quintal of banana in the state

पुण्यात क्विंटलला ९०० ते १००० रुपये

पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील केळी बाजारात गुरुवारी (ता. ६) केळीची सुमारे ५० टन आवक झाली. या वेळी दहा किलोला ९० ते १०० रुपये दर मिळाला. 

पुणे बाजारात केळीची आवक प्रामुख्याने कंदर, अकलूज, इंदापूर या भागातून होत आहे. दिल्ली येथून मागणी वाढल्याने थेट बांधावरूनच दिल्लीसाठी गाड्या भरत आहेत. त्यामुळे पुणे बाजार समितीमधील आवक कमी झाल्याने दर २ ते ३ रुपयांनी वाढल्याचे केळीचे प्रमुख आडतदार राजू जाधव यांनी सांगितले.

सोलापुरात प्रतिक्विंटलला २०० ते ३०० रुपये दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात केळीच्या आवकेत कमालीची घट झाली. पण, मागणी असल्याने दर काहीसे टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. केळीला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३०० रुपयांचा दर मिळाला.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात केळीची आवक रोज किमान ५० ते १०० क्विंटलपर्यंत राहिली. केळीची आवक माढा, करमाळा या स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील जिल्ह्यातील आवक तुलनेने कमीच होती. केळीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होतो आहे. या सप्ताहात केळीला प्रतिक्विंटलला किमान २५० रुपये, सरासरी २७५ रुपये आणि सर्वाधिक ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

या आधीच्या सप्ताहातही आवकेचे प्रमाण साधारण प्रतिदिन ४० ते ८० क्विंटल असे होते. तर दर किमान २०० रुपये, सरासरी २५० रुपये आणि सर्वाधिक २८० रुपये असा दर मिळाला. गेल्या दोन आठवड्यात प्रतिक्विंटलमागे ३० ते ५० रुपयांच्या फरकांचा चढ-उतार वगळता दर काहीसे टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सू्त्रांकडून सांगण्यात आले.

परभणीत क्विंटलला ५०० ते ७०० रुपये

परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. ६) केळीची २०० क्विंटल आवक होती. केळीला प्रतिक्विंटल किमान ५०० ते किमान ७०० रुपये, तर सरासरी ६०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

जिल्ह्यातील बहुतांश व्यापाऱ्यांकडून थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन केळीची खरेदी केली जाते. त्यामुळे मार्केटमधील केळीची आवक तुलनेने कमी असते. सध्या मार्केटमध्ये स्थानिक परिसरातून दररोज केळीची १०० ते २०० क्विंटल आवक होत आहे. गेल्या महिनाभरात केळीचे दर प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपये होते.

गेल्या आठवड्यापासून केळीची आवक कमी झाली आहे. दरात थोडी सुधारणा झाली आहे. गुरुवारी (ता. ६) मार्केटमधील दर प्रतिक्विंटल ५०० ते ७०० रूपये होते. शेतातून प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपये दराने खरेदी झाली. स्थानिक बाजारात पिकविलेल्या केळीची किरकोळ विक्री १० ते २० रुपये डझन प्रमाणे सुरु होती, असे व्यापारी मो. अवैस यांनी सांगितले.

नाशिकमध्ये क्विंटलला ८५० ते १५०० रुपये 

नाशिक : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ५) केळीची आवक १६० क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ८५० ते १५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रुपये होते’’, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.४) आवक ६० क्विंटल झाली. तिला ८५० ते १५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रुपये राहिला.  सोमवारी (ता.३) आवक १६० क्विंटल झाली. त्यावेळी ८५० ते १५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रुपये राहिला. रविवारी (ता.२) फळ बाजार बंद असल्याने केळीची आवक झाली नाही.  शनिवारी (ता.१) आवक६० क्विंटल झाली. त्यावेळी ८०० ते १२५० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १००० रुपये राहिला. 

शुक्रवारी (ता.३१) आवक २९०क्विंटल झाली. तिला १००० ते १५०० रुपये दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रुपये राहिला. गुरुवारी (ता.३०) आवक ३३० क्विंटल झाली. तिला १००० ते १५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर १२५० रुपये राहिला.डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आवक टिकून होती. जानेवारी महिन्यात आवकेत घट झाल्याचे दिसून आले. मात्र, दराच्या बाबतीत ते स्थिर राहिल्याचे दिसून आले.

अकोल्यात क्विंटलला ४७५ रुपये दर

अकोला ः गेल्या काही दिवसांपासून केळीचे दर दबावात आहेत. दहा दिवसांपूर्वी ३७५ रुपयांपर्यंत घसरलेल्या दरात थोडी सुधारणा होऊन हा दर आता ४७५ रुपयांपर्यंत पोचला. बुधवारी (ता.५) या भागात बोर्डाचा दर ४७५ रुपये काढण्यात आल्याची माहिती केळी उत्पादकांकडून देण्यात आली. केळीच्या दरात मध्यंतरी घसरण झाली होती.

साधारणपणे दहा दिवसांपूर्वी केळीला ३७५ रुपये दर मिळत होता. मागील आठवडाभरात यात थोडी सुधारणा होऊन ४७५ रुपयांपर्यंत दर पोचला. सध्या खुटीचा माल अधिक प्रमाणात निघत आहे. हा माल एप्रिलपर्यंत चालणार आहे. मालाचा दर्जा चांगला असूनही केळीचे दर कमी असल्याने उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

साधारणपणे एप्रिलपासून नवीन माल सुरु होतो. सध्या जे दर कमी काढले जात आहेत, त्याबाबत कुठलेही ठोस कारण मिळत नसल्याचे शेतकऱ्यांमधून सांगण्यात आले. जिल्ह्यात अकोट तालुक्यात केळीचे सर्वाधिक क्षेत्र आहे. प्रामुख्याने पणज व परिसर हा केळीसाठी माहेरघर समजला जातो. त्या भागासाठी निघत असलेले दर इतर ठिकाणीही मान्य केले जातात.

नांदेडमध्ये क्विंटलला ६०० ते ७०० रुपये

नांदेड : अर्धापूर येथील केळी बाजारात सध्या केळीला ६०० ते ७०० रुपये दर मिळत आहे. सध्या केळीची आवक कमी आहे, अशी माहिती केळी अडते नीलेश देशमुख यांनी दिली. 

नांदेड जिल्ह्यात केळीचा हंगाम जून ते डिसेंबर दरम्यान चालतो. या काळात नांदेडची केळी देशांतर्गत बाजारासह आखाती देशात निर्यात होते. सध्या नांदेड बाजारात केळीचा हंगाम नसल्याने आवकही मंदावली आहे. स्थानिक व्यापारी सध्या जिल्ह्यातील केळीला ६०० ते ७०० रुपये क्विंटल दराने घेत आहेत, अशी माहिती मिळाली. 

दरम्यान, आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील ताडपत्री, पुलीवदला जिल्ह्यात सध्या केळीचा हंगाम सुरु आहे. या ठिकाणाहून दररोज २०० टन केळी गल्फ कंट्रीमध्ये जात आहेत. या केळीला ११०० ते ११५० रुपये दर मिळत असल्याची माहिती मिळाली.

जळगावात क्विंटलला २०० ते ५०० रुपये दर

जळगाव ः जिल्ह्यात केळीचे दर कमी अधिक होत आहेत. काढणी पूर्ण होत आलेल्या कांदेबाग केळीची गेल्या १० ते १२ दिवसांपासून आवक रखडत सुरू  आहे. दर प्रतिक्विंटल किमान २०० व कमाल ५०० रुपये, असा मिळत आहे. आवक प्रतिदिन २२० ट्रकवर होत आहे. 

सध्या आगाप लागवडीच्या नवती किंवा मृग बहरात लागवडीच्या केळीची काढणी काही भागात सुरू आहे. या केळीला प्रतिक्विंटल कमाल ८०० रुपये दर मिळत आहे. कांदेबाग केळी जळगाव, चोपडा, जामनेर, पाचोरा-भडगाव या भागात आहे. नवती केळीची काढणी रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात अलीकडेच सुरू झाली आहे. पुढे कांदेबाग केळीची आवक कमी होईल. कारण, काढणी पूर्ण होत आली आहे.

उत्तरेकडे मागणी कमी असल्याने कांदेबाग केळीचे दर कमी आहेत, अशी माहिती मिळाली. चोपडा, जळगाव, पाचोरा-भडगाव भागात केळीची आवक पुढे कमी होईल, असे संकेत आहेत. उत्तरेकडे थंडीची लाट ओसरल्यानंतर दरवाढ अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com