खानदेशात २०० कोटी नुकसानीचा अंदाज

crop damage
crop damage

जळगाव (प्रतिनिधी) : शहरासह जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पुर्वमोसमी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३० हजार २६० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. चोपडा तालुक्‍यात सर्वाधिक १६ हजार २० हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला आहे. जिल्ह्यात एकूण २९४ गावांतील ३१ हजार ११७ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास गारपिटीने हिरावला आहे. तर धुळे जिल्ह्यात शिरपुरातही सुमारे ५० ते ६० कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, खानदेशात मिळून २०० कोटींवर नुकसान झाल्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तविला आहे.  मंगळवारी (ता. १७) गारपिटीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्व नुकसान ३३ टक्‍क्‍यांच्यावर आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला आहे. रब्बी ज्वारी, गहू, मका, बाजरी, हरभरा, कांदा, केळी, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांना मोठा फटका बसला. सर्वाधिक सात हजार १०० हेक्‍टरवरील मक्‍याचे नुकसान झाले आहे. त्या खालोखाल सहा हजार ७७७ हेक्‍टरवरील गव्हाचे, तर पाच हजार ८७० हेक्‍टरवरील केळीला फटका बसला आहे.  जळगाव तालुक्‍यातील ३३ गावांमध्ये ३ हजार ४५२ शेतकऱ्यांचे ७ हजार ८२६ हेक्‍टरवर तर अमळनेर तालुक्‍यातील ४४ गावांमध्ये ४ हजार ६१३ शेतकऱ्यांचे ३ हजार ५८९.९१ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.  चोपडा तालुक्‍यात सर्वाधिक नुकसान  या गारपिटीचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्‍याला बसला आहे. यामध्ये तालुक्‍यातील ९२ गावांमधील २० हजार ६९१ शेतकऱ्यांच्या ३८३२ हेक्‍टरवरील गव्हाचे नुकसान झाले आहे. ३ हजार ७८७ हेक्‍टरवरील मकाही नष्ट झाला आहे. अशाच प्रकारे २ हजार ८८ हेक्‍टरवरील केळी, २ हजार ७६ हेक्‍टरवरील हरभरा, २ हजार ७२ हेक्‍टरवरील रब्बी ज्वारीचे नुकसान झाले आहे. या सोबतच इतरही पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी फॉर्म तातडीने भरावा सततचा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकाचे काढणीपश्‍चात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीबाबतचा विहित नमुन्यातील पीक नुकसान सूचना फॉर्म पूर्ण भरून ४८ तासांच्या आत विमा कंपनीच्या अधिकृत ई-मेल आयडी ro.mumbai@aicofindia.com, chandralantg@aicofindia.com वर पाठवावेत. अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावे. असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तालुकानिहाय नुकसान असे 

तालुका  बाधित गावे बाधित शेतकरी  नुकसान (हेक्‍टर) 
जळगाव   ३३ ३४५२ ७८२६.०० 
यावल    ५ ८७ ७०.६५
रावेर   ४  ५२.६९ 
बोदवड    ११ ८४  ८०.००
मुक्ताईनगर  ७०  ५४० ५१७.०० 
जामनेर  १४   ४३६  ३६०.०० 
अमळनेर  ४४ ४६१३  ३५८९.९१ 
धरणगाव   २३  १२१०   १७९५.००
चोपडा ९२  २०६९१ १६०१९.७० 
एकूण २९४  ३१११७    ३०२६०.९५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com