शेतकरी नवराच हवा गं बाई...

शेतकरी नवराच हवा गं बाई...
शेतकरी नवराच हवा गं बाई...

कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून प्रगतिशील शेतकऱ्यांचीही स्थळे नाकारणाऱ्या युवतींमध्ये जागृती करण्यात मलिकवाड (जि. बेळगाव) येथे झालेल्या शेतकरी वधू-वर मेळाव्याला यश आले आहे. येथील मुनीश्रुवतनाथ दिगंबर जैन मंदिर कमिटी, वीर सेवा दल आणि वीर महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एप्रिलमध्ये फक्त शेतकरी नवरा निवडीसाठी वधू-वर मेळावा आयोजित केला होता. त्याचा परिणाम म्हणून २२ विवाह जुळून आले अाहेत.  सध्या शेतकरी उपवर मुलांचे लग्न जमण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. निर्व्यसनी, सुस्वभावी, सुस्थितीत असणाऱ्या मुलांनाही केवळ ते शेती करतात म्हणून मुली पसंती देत नसल्याने एकप्रकारचे नैराश्‍य अनेक शेतकरी कुटुंबांत दिसते. ही सार्वत्रिक समस्या अाहे. या प्रश्नाची तीव्रता पाहून महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असणाऱ्या मलिकवाड येथील जैन मंदिर कमिटीने सहा महिन्यांपूर्वी जैन समाजातील शेतकऱ्यांसाठी अनोखा वधू-वर मेळावा घेण्याची घोषणा केली. प्रत्येक गावात जाऊन या बाबतची जनजागृती केली. प्रगतिशील शेतकऱ्यांचे संसार सुखाचे होऊ शकतात हे उदाहरणांसह पटवून दिले. त्यामुळे या उपक्रमाला गती आली. या मेळाव्यात सुमारे सातशेहून इच्छुक वर आणि तीनशेहून अधिक वधूंनी आपली नावे नोंदविली. मेळावा झाल्यानंतर समितीच्या सदस्यांनीही प्रयत्न करून जास्तीत जास्त विवाह व्हावेत यासाठी प्रयत्न केले. लग्न जमत नाही म्हणून दु:खी असणाऱ्या शेतकरी वरांसाठी हे प्रयत्न उत्साह वाढविणारे ठरले. त्यातून २२ विवाह पार पडून त्यांच्या संसाराला सुरवात झाली आहे. 

जोडप्यांचा सत्कार  समितीच्या वतीने लग्न झालेल्या जोडप्यांचा नुकताच मलिकवाड येथे सत्कार करण्यात आला. समितीच्या वतीने यापुढेही हे काम सुरूच ठेवण्याचा निश्चय व्यक्त करण्यात आला. तसेच इतर जातींतील प्रमुख व्यक्ती, विवाह संस्था यांनीही या विषयामध्ये गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. ॲग्रोवनविषयी कृतज्ञता `ॲग्रोवन`ने शेतकरी मुलांच्या विवाहाचा प्रश्‍न महत्त्वाचा मानून त्याला चांगली प्रसिद्धी दिली. बातम्यांबरोबर अग्रलेखामधूनही या प्रश्‍नाचे गांभीर्य स्पष्ट केले. त्यामुळे संयोजन समितीला राज्यभरातून फोन आले. अनेकांनी माहिती घेऊन या सोहळ्यात आपला सहभाग नोंदविला. `ॲग्रोवन`ने केवळ शेतीविषयक घडामोडी व संबंधित प्रश्नांवरच न थांबता सामाजिक समस्येचीही प्रभावी रितीने दखल घेतल्याबद्दल सर्वच वक्त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com