भारतातून युरोपात २३,७२९ टन द्राक्ष निर्यात

द्राक्षांच्या गोडीमध्ये यंदा लक्षणीय सुधारणा झाली आहे. या स्थितीत परराज्यांतून, तसेच परदेशांतूनही उठाव वाढला आहे. येत्या काळात आवक अजून कमी होत जाणार आहे. द्राक्षांच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होणार आहे. द्राक्ष उत्पादकांनी माल देण्याची घाई करू नये. पक्व नसलेला माल काढू नये. १८ ब्रीक्‍स झाल्याशिवाय खुडा सुरू करू नये. चांगल्या गोडीच्या द्राक्षांनाच उच्चांकी दर मिळेल. - जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना.
द्राक्ष
द्राक्ष

नाशिक : अर्लीतील द्राक्षांची वाढलेली आवक तसेच थंडीचे प्राबल्य यामुळे मागील महिनाभर द्राक्षांचे मार्केट स्थिर होते. उत्पादनात ३० ते ४० टक्के घट झालेली असताना बागेचा द्राक्षांचा खुडा वेळेपेक्षा लवकरच आटोपत आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्षाच्या परराज्यांतील बाजारपेठांतील थंडी कमी झाली आहे. याच वेळी गोड चवीची द्राक्षे बाजारात पोचत आहेत. या स्थितीत द्राक्षांना उठाव वाढला आहे.  गत सप्ताहाच्या अखेरपर्यंत (सोमवार, ता. १२ पर्यंत) भारतातून एकूण १८१३ कंटेनरमधून २३,७२९ टन द्राक्षांची युरोपीय देशांत झाली आहे. गतवर्षी याच तारखेपर्यंत देशातून १५०३ कंटेनरमधून १९,९०८ टन द्राक्षांची निर्यात युरोपला झाली होती. ही निर्यात नेदरलॅंड (१५,५२८ टन), इंग्लंड (३८१८), जर्मनी (३०८८), बेल्जियम (७४७), डेन्मार्क (७०३) यांसह एकूण १७ देशांत झाली आहे. युरोपसह रशिया, बांगलादेश या देशांतून मागणी वाढली असून, निर्यातीचे दर येत्या काळात टिकून राहतील, असे निर्यातदार राजाराम सांगळे यांनी सांगितले.   द्राक्ष उत्पादक मनोज जाधव म्हणाले, की मागील आठवड्यापासूनच द्राक्षांची आवक घटण्यास व दर वधारण्यास सुरवात झाली आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्‍चिम बंगाल या राज्यांतून मागणी वाढते. थंडीमुळे मागील महिन्यात द्राक्षांची मागणी स्थिर होती. मात्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून दरात किलोमागे ५ रुपयांनी वाढ झाली. येत्या काळात दरात टप्प्याटप्प्याने वाढ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्वाधिक निर्यात नाशिक जिल्ह्यातून  द्राक्षांची भारतातील संपूर्ण निर्यात एकट्या महाराष्ट्रातून झाली आहे. गत सप्ताहाच्या अखेरपर्यंत राज्यातून एकूण २३,७२९ टन द्राक्ष निर्यात युरोपात झाली. त्यातील सर्वाधिक निर्यात २१,३०३ टन एकट्या नाशिक जिल्ह्यातून झाली. त्यापाठोपाठ सांगली (१२१२ टन), सातारा (९२१), नगर (१७७), पुणे (१०८), सोलापूर (२४) या जिल्ह्यांतून लक्षणीय निर्यात झाली आहे. गत सप्ताहातील देशांतर्गत बाजारातील द्राक्षांचे दर (प्रतिकिलोचे)

द्राक्ष वाण    किमान     कमाल     सरासरी
थॉमसन   ३०     ४०      ३५
सोनाका    ४०    ४५   ४०
आरके, एसएस    ५०   ७०    ६०
जम्बो, नानासाहेब पर्पल     ५०     ६०     ५५
शरद सीडलेस    ४५     ५५  ५०

गत सप्ताहातील निर्यातीच्या बाजारातील द्राक्षांचे दर (प्रतिकिलोचे)

द्राक्ष वाण     किमान   कमाल   सरासरी
थॉमसन  ६०  ८० ७५  
   सोनाका     ४५    ५५       ५०
आरके, एसएस   ५०      ७० ६०
जम्बो, नानासाहेब पर्पल    ७०    ७७     ७५
शरद सीडलेस    ६०    ७५    ७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com