राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊस

जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळाला. राज्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या ५३८.५ मिलिमीटरपैकी ६६९.९ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत तब्बल २४ टक्के अधिक पाऊस पडला.
24% above average rainfall in the state
24% above average rainfall in the state

पुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे अनेक जिल्ह्यांना दिलासा मिळाला. राज्यात जुलै अखेरपर्यंत सरासरीच्या ५३८.५ मिलिमीटरपैकी ६६९.९ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत तब्बल २४ टक्के अधिक पाऊस पडला. तर परभणी, जालना, सातारा, कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी येथे सर्वाधिक पाऊस पडला. खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव सर्वाधिक ओढ दिल्याचे आढळून आले. तर, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.

जुलैत सर्वसामान्य पावसाचा होता अंदाज  चालू वर्षी हवामान विभागाने दुसऱ्या टप्यांत चांगला पावसाचा अंदाज दिला असला तरी जुलै महिन्यात सर्वसामान्य पावसाचा अंदाज दिला होता. जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत ९४ ते १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर केला होता. राज्यात अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस कमी राहणार असून, दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता होती. खानदेशातील जळगाव, बुलडाणा, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्हयात सरासरीपेक्षा अधिक तर, कोकण, सातारा, सांगली, नंदुरबार, लातूर, उस्मानाबाद जिल्हयात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.

जूनमध्ये ३१ टक्के अधिक पाऊस पडला  जूनमध्ये मॉन्सून वेळेत दाखल झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. विदर्भात काही प्रमाणात दडी मारल्याची स्थिती होती. राज्यात जून महिन्यात सरासरीच्या २०७.६ मिलिमीटरपैकी २७२.९ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के अधिक पाऊस पडला. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ८३ टक्के अधिक तर अकोला जिल्ह्यात सर्वात कमी उणे ५१ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जुलैमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद  वीस जूनपासून राज्याच्या विविध भागात पावसाने ओढ दिली होती. यातच सकाळपासूनच उन्हाचा चटका वाढला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही असह्य झाले होते. पाच जुलै रोजी जळगाव येथे उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने मागील दहा वर्षातील उच्चांकी ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यातच तापमानात सरासरीपेक्षा पाच अशांहून अधिक वाढ झाल्याने तेथे उष्णतेची लाट आली होती. यापूर्वी २ जुलै १९९३ रोजी जळगावात आतापर्यंतच्या सर्वकालीन उच्चांकी ४३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.  

धरणक्षेत्रात जोरदार पाऊस जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. बंगालचा उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्र, कोकण किनारपट्टीला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा पूरक ठरल्याने कोकणासह घाटमाथ्यावर धो-धो पाऊस कोसळला. मराठवाडा, विदर्भातही हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. मात्र, ५ जून ते २० या कालावधीत चांगला पाऊस बरसला. गेल्या आठवड्यात २२ ते २८ जुलै दरम्यान दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी झाली. तर २१ ते २३ जुलै दरम्यान पुणे, सातारा, कोल्हापूरचा घाटमाथा आणि धरण क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली. २२ जुलै रोजी महाबळेश्वरमध्ये उच्चांकी ५९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून तुळशी धरणक्षेत्रात सर्वाधिक ८९५ मिलिमीटर पाऊस पडला होता. यामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत असल्याने गेल्या १३ जून ते २६ जुलै या दीड महिन्यात तब्बल ३७३ टीएमसी पाण्याची नव्याने आवक झाली आहे.

कोकणात सर्वाधिक पाऊस  कोकणात दरवर्षीप्रमाणेच यंदाही अनेक भागात जोरदार पाऊस पडला आहे. मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर कोकणसह, घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. १४ जून रोजी रत्नागिरी येथे २४३.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. राज्यात २० जूनपासून कोकणात पावसाचा प्रभाव कमी झाला. त्यानंतर काहीशी उघडीप दिली असली तरी तुरळक ठिकाणी पाऊस कोसळत होता. कोकणात सरासरीच्या १७५७.८ मिलिमीटरपैकी २२६७.५ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ३७ टक्के अधिक पाऊस पडला. ११ जुलै रोजी मुरुड येथे ३४८ मिलिमीटर पाऊस पडला. दोन महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून सरासरीच्या १९६५.१ मिलिमीटरपैकी ३००७.० मिलिमीटर म्हणजेच ५३ टक्के अधिक पाऊस पडला. तर मुंबईत १८ टक्के, तर पालघरमध्ये १४ टक्के अधिक पाऊस पडला.

खानदेशात पावसाची ओढ  मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पावसाचा जोर अधिक होता. साधारणपणे कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या ३९७.८ मिलिमीटरपैकी ५००.४ मिलिमीटर म्हणजेच २६ टक्के अधिक पाऊस पडला. तर १९ जून रोजी कोल्हापुरातील गगनबावडा येथे २८१ मिलिमीटर तर २१ जुलै रोजी महाबळेश्वर येथे ४७० पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यानंतर पुणे, सांगली जिल्ह्यात काहीसा कमी जोर होता. सोलापूर, नगर, नाशिक, पुणे या भागात कमी पाऊस पडला असून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. सातारा जिल्ह्यात सरासरीच्या ५०१.३  मिलिमीटरपैकी ८५०.७ मिलिमीटर म्हणजेच ७० टक्के अधिक पाऊस पडला. नंदुरबार जिल्ह्यात सरासरीच्या ४६१.५ मिलिमीटरपैकी अवघे २६१.७ मिलिमीटर म्हणजेच उणे ४३ टक्के कमी पाऊस पडला.  

दुष्काळी मराठवाड्याला दिलासा  दुष्काळी अशी ओळख असलेल्या मराठवाड्यात यंदा पावसाच्या सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी पुरेसा पाऊस झाला. खरीप पिकांच्या पेरण्या झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला तरी जूनअखेरीस काहीशी ओढ दिली होती. परभणी, जालना, बीड या तीन जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली. जुलैअखेरपर्यंत मराठवाड्यात सरासरीच्या ३१७.१ मिलिमीटरपैकी ४२३.७ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ३४ टक्के अधिक पाऊस पडला आहे. परभणीमध्ये सरासरीच्या ३६४.५ मिलिमीटरपैकी ६२४.४ मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरीच्या ७१ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर सर्वात कमी पाऊस लातूर, हिंगोली जिल्ह्यात पडला. तर हिंगोलीमध्ये सरासरीच्या तुलनेत अवघा ५ टक्के अधिक पाऊस पडला आहे.

विदर्भात पावसाची हुलकावणीच विदर्भात उशिरा दाखल झालेल्या पावसाने जून व जुलैमध्ये हुलकावणी दिल्याचे चित्र आहे. जूनमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु विदर्भातील बुलडाणा, गोंदिया, अमरावती, अकोला या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. विदर्भात सरासरीच्या ४७७.७ मिलिमीटरपैकी ४९७.३ मिलिमीटर पाऊस पडला असून सरासरीच्या तुलनेत ४ टक्के कमी पाऊस पडला. तर, चंद्रपूर, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, वर्धा  जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस पडला. तर चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ५४०.७ मिलिमीटरपैकी ६७१.५ मिलिमीटर म्हणजेच २४ टक्के अधिक पाऊस पडला.

एक जून ते ३१ जुलैअखेर जिल्हानिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः स्त्रोत ः हवामान विभाग
विभाग सरासरी पाऊस प्रत्यक्ष पडलेला पाऊस पावसाची तफावत, टक्केवारीमध्ये
मुंबई शहर १२५१.९ १४७८.० १८
पालघर १३१६.९ १४९७.२ १४
रायगड १८६२.० २५२२.२ ३५
रत्नागिरी  १९६५.१ ३००७.० ५३
सिंधुदुर्ग १९२३.७ २७१३.४  ४१
ठाणे ४६१.९ ७३१.० २९
नगर २०५.८ २४९.८ २१
धुळे २९२.३ २२५.६ उणे २३
जळगाव ३१२.९ २६९.० उणे १४
कोल्हापूर १४४८.४ १५८३.२ ५१
नंदुरबार ४६१.५ ४६१.५ उणे ४३
नाशिक  ४८३.३ ५३८.८  ११
पुणे  ४८५.५ ६५०.८ ३४
सांगली २६४.५ ३६५.३ ३८
सातारा ५०१.३ ८५०.७ ७०
सोलापूर  १९७.३ २७३.१ ३८  
औरंगाबाद २७७.४ ३३९.८ २२
बीड २५६.१ ३५५.१ ३९
हिंगोली ३९९.४ ४२१.२
जालना २९९.० ४६३.४ ५५
लातूर ३२२.३ ३७७.८ १७
नांदेड ३९९.६ ५२३.७ ३१
उस्मानाबाद २६४.० ३३१.४ २६
परभणी ३६४.५ ६२४.४ ७१
अकोला ३६०.१ ३४७.३ उणे ४
अमरावती ४२३.१ ३८३.६ उणे ९
भंडारा ५७१.९ ६१६.३
बुलडाणा ३३१.५ २८९.७ उणे १३
चंद्रपूर ५४०.७ ६७१.५ २४
गडचिरोली ६३८.८ ५९२.४ उणे ७
गोंदिया ६०७.७ ५४५.१ उणे १०
नागपूर ४७०.७ ५४६.० १६
वर्धा ४४७.७ ४८१.८
वाशीम ४१०.० ४८७.६ १९
यवतमाळ ४२०.६ ४८२.३ १५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com