अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसान

अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसान
अमरावती जिल्ह्यात २४५० कोटींचे नुकसान

अमरावती : मॉन्सुनोत्तर पावसामुळे जिल्ह्यात तीन लाख ७३ हजार ५५० हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. सुमारे २४५० कोटी रुपयांची हानी या माध्यमातून झाल्याचा अंदाज असताना प्रशासनाने मात्र राष्ट्रीय आपदा निधीतून अवघ्या २५४ कोटी ४० लाख ४८४ रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. ‘राजा उदार झाला, हाती भोपळा दिला’ याच आशयाची ही मदत ठरणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाप्रती तीव्र असंतोष व्यक्‍त होत आहे.

पावसाने जिल्ह्यातील एक लाख ३५ हजार ४७२ हेक्‍टरवरील कपाशीचे ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झाले आहे. कपाशीची हेक्‍टरी १५ क्‍विंटल सरासरी उत्पादकता व ५५५० रुपयांचा हमीभाव अपेक्षित धरल्यास ११२८ कोटी ८० लाख ४४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे हेक्‍टरी ६८०० रुपयांचीच मदत मिळणार आहे. कापसाप्रमाणेच सोयाबीन उत्पादकांचीदेखील तुटपुंज्या मदतीवरच बोळवण होण्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात २ लाख १२ हजार ३२९ हेक्‍टरमध्ये सोयाबीन पिकाचे ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झाले. सोयाबीनची हेक्‍टरी १५ क्‍विंटल उत्पादकता असल्याचा कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल आहे. आधारभूत किंमत २७१० रुपये गृहीत धरल्यास सोयाबीन उत्पादकांचे ११८१ कोटी ६१ लाख ८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे आंबीया व मृग बहरातील संत्र्याचीदेखील गळ झाली. भाजीपाला व इतर पिकांनादेखील पावसाचा फटका बसला.

जिल्ह्यात एकूण शेतकरी संख्येच्या ९४ टक्‍के म्हणजे तीन लाख ७५ हजार ३९८ शेतकऱ्यांचा ७८ टक्‍के खरीप हंगामातील पिके मातीमोल झाली. पिकांचे बाधित क्षेत्र सुमारे तीन लाख ७३ हजार ५५० हेक्‍टरचे आहे. २४५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. प्रशासनाने मात्र एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदतीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार २५४ कोटी ४० लाख ४३ हजार ४८४ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडून विभागीय आयुक्‍तांकडे केली आहे. 

एक लाख ९५ हजार शेतकऱ्यांचा पीकविमा

जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना विमासंरक्षण दिले आहे. त्यापैकी १ लाख ४०० शेतकऱ्यांनी ७२ तासांपूर्वी विमा कंपनी व कृषी विभागाकडे नुकसान सूचना अर्जाव्दारे माहिती दिली आहे. या शेतकऱ्यांच्या शेतीनुकसानीचे वैयक्‍तिक पंचनामे करण्यात आल्याने त्यांना भरपाई मिळण्याची आशा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com