केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यू

केरळ
केरळ

तिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या मुसळधार पावसाने केरळ राज्यातील जनजीवन विस्कळित केले आहे. या पावसामुळे राज्यातील मृतांचा आकडा हा २४७ वर गेला आहे. राज्यातील पूरस्थिती आणखी बिकट झाली असून, केंद्र सरकारने मदतकार्यासाठी अधिक आपत्कालीन बचाव पथके पाठवावीत, अशी विनंती केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी शुक्रवारी (ता.१७) केली आहे. एर्नाकुलम, अलाप्पुझा, त्रिसूर आणि पथनामतिट्टा या चार जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक गंभीर परिस्थिती असून हजारो नागरिकांचा संपर्क तुटला आहे, असे विजयन यांनी सांगितले. 

आठ ऑगस्टपासून केरळमध्ये पावसाने घातलेल्या थैमानामुळे दोन लाख तेवीस हजार नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. नौदल आणि लष्कराची १३ हेलिकॉप्टर मदतकार्य करत असली तरी परिस्थिती गंभीर असल्याने आणखी पथकांची आवश्‍यकता असल्याचे विजयन यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी केरळमध्ये रात्री दाखल झाले. आपत्कालीन बचाव पथकाने आतापर्यंत साडे चार हजार जणांची पुरातून सुटका केली आहे.

पेरियार आणि पंपा नद्यांची पातळी ओसरायचे नाव घेत नसल्याने अनेक ठिकाणचा संपर्क तुटला असून मदतकार्यात अडथळे येत आहेत. भारतीय वेधशाळेने केरळमधील आठ जिल्ह्यांमध्ये आगामी दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये केरळमध्ये आणखी हेलिकॉप्टर पाठविण्याचा निर्णय झाला आहे. 

आपत्कालीन समितीची पुन्हा बैठक  केरळमधील परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीची दोन दिवसांत शुक्रवारी दुसऱ्यांदा बैठक झाली. या बैठकीत केरळला आणखी मदत पाठविण्याचा निर्णय झाला. मोटार बोट, लाइफ जॅकेट्‌स, गमबूट, अन्नाची पाकिटे अधिक प्रमाणात पाठविली जाणार आहेत. लष्कर आणि नौदलाबरोबरच तटरक्षक दलाचे जवानही मदतकार्यात व्यग्र आहेत. 

कर्नाटकातही संपर्क तुटला  कोडगू जिल्ह्यात पावसामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार सुरूच असून, नद्यांच्या पातळीत वाढ झाली असल्याने या जिल्ह्याचा संपर्क तुटला आहे. विविध ठिकाणी दोनशेहून अधिक लोक अडकून पडले आहेत. 

सात राज्यांत ८६८ बळी  मॉन्सूनमुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत सात राज्यांमध्ये ८६८ जणांचा बळी गेला असून, त्यापैकी २४७ जण एकट्या केरळमधील आहेत. पावसामुळे उत्तर प्रदेश (१९१), पश्‍चिम बंगाल (१८३), महाराष्ट्र (१३९), गुजरात (५२), आसाम (४५) आणि नागालॅंडमध्ये (११) मोठी जीवितहानी झाली आहे. या सात राज्यांमध्ये मिळून एकूण २८ जण बेपत्ता आहेत. पावसामुळे डेंगीचाही फैलाव होत आहे. भारतीय हवाई दलानेही मदतकार्यासाठी २३ हेलिकॉप्टर आणि ११ वाहतूक विमाने पुरविली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com