मृदसंधारण
मृदसंधारण

मृदसंधारणात २५ कोटींचा घोटाळा

पुणे : शेतकऱ्यांना कृषी सल्ला आणि योजनांची माहिती देण्याऐवजी मृदसंधारणाच्या कुरणात यथेच्छ चरणाऱ्या महाभागांना कृषी सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी तडाखा दिला आहे. मृद संधारणातील २५ कोटींच्या घोटाळ्यात २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृदसंधारणात कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी राज्यभर घोटाळे करून ठेवले आहेत. यातील काही घोटाळे दडपण्यात आले असून, काही घोटाळ्यांबाबत गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील २५ कोटींचा घोटाळा जवळपास दाबण्यात आला होता. माजी कृषी उपसंचालक आबासाहेब साबळे यांनी स्वतः पाठपुरावा केल्यामुळे कृषी सचिव व आयुक्तांनी या घोटाळ्याच्या फाइल्स पुन्हा उघडल्या.  आयुक्तालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “मृदसंधारणाच्या अनेक घोटाळ्यांपैकी एका प्रकरणाचा तपास श्री. साबळे यांच्या समितीमार्फत सुरू होता. मात्र, समितीच्या कामात अडथळे आणले गेले. त्यानंतर पुन्हा देसाई समिती नियुक्त करण्यात आली. या समितीनेदेखील घोटाळा झाल्याचे नमूद केले. मात्र, काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून ही चौकशी बंद पाडली. उलट साबळे आणि देसाई समितीच्या विरोधात कारवाया केल्या. यामुळे श्री. साबळे यांनी स्वतः लढा देण्याचे ठरविले. त्यामुळेच शासनाने या प्रकरणाची दखल घेतली.” श्री. साबळे यांनी कृषी आयुक्तालय ते मंत्रालय असा सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यामुळे कृषी सचिवांनी या प्रकरणाची माहिती घेतली. “राज्य शासनाच्या निधीतून सोलापूर जिल्ह्यात केलेल्या मृत व जल संधारण कामात कृषी अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे केलेल्या गैरव्यवहार गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे जबाबदार असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करा,’’ असे आदेश (१०१६-प्रक्र-११४) मंत्रालयातून देण्यात आलेले आहेत. मंत्रालयातून आलेल्या आदेशानुसार कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनीदेखील या प्रकरणाची माहिती घेतली. आस्थापना सहसंचालक नारायण शिसोदे तसेच कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांच्याशी चर्चा करीत पुढील कारवाईला आयुक्तांनी हिरवा कंदील दिला. मंत्रालयातून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतरदेखील काही महिने कारवाईच करण्यात आली नाही. “ही चौकशी दाबता येते का याची चाचपणी सुरू होती. तथापि, आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याबरोबरच विभागीय चौकशीदेखील सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत,’’ असे आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. झेंडे यांच्यावर जबाबदारी “कृषी अधिकाऱ्यांनी मृद व जलसंधारणात केलेला घोटाळा अंदाजे २५ कोटींचा आहे. यात किमान २९ अधिकारी व कर्मचारी गुंतले आहेत. पहिल्या टप्प्यात तत्कालीन कृषी अधिकारी गजानन ताटे यांच्यासह जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. श्री. झेंडे यांना गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. फौजदारी कारवाईत प्रत्यक्ष कोणाची नावे आहेत याविषयी आता कर्मचारी वर्गात उत्सुकता लागून आहे. विस्ताराला कर्मचारी नाही; मात्र घोटाळ्यासाठी चढाओढ गाव पातळीवर शेतकऱ्याला योजना व कृषी सल्ला देण्यासाठी कृषी खात्याकडे कर्मचारीवर्ग सतत कमी असतो. मात्र, मृद संधारण व जल संधारणाच्या कामांमध्ये प्रत्येक तालुक्यात कोट्यवधीचा मलिदा मिळत असल्यामुळे मृदसंधारणाचा टेबल मिळवण्यासाठी खात्यात स्पर्धा लागलेली होती. ही स्पर्धा पुढे आपआपल्या तालुक्याला मृदसंधारणाची भरपूर कामे खेचून आणणे व त्यातून जास्तीत जास्त मलिदा लाटण्यापर्यंत गेली होती. मात्र, कृषी खात्याच्या सचिवपदाची सूत्रे एकनाथ डवले यांच्याकडे आल्यानंतर या घोटाळ्यांना चाप लागला आहे. श्री. डवले यांच्याकडेच रोजगार व जलसंधारण खाते असल्यामुळे दोन्ही खात्यांची माहिती असल्यामुळे अधिकाऱ्यांची अडचण झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com