विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा जप्त 

गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे हब म्हणून विदर्भ नावारूपास आला होता. यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूकही झाली.
cotton seed
cotton seed

नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे हब म्हणून विदर्भ नावारूपास आला होता. यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूकही झाली. या वेळी मात्र हंगामापूर्वीच कृषी विभागाने अनधिकृत बियाणे पुरवठादारांच्या मुसक्या आवळत तब्बल अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिकचा साठा जप्त केला. अमरावती आणि नागपूर विभागांत ही कारवाई करण्यात आली. 

तणाला प्रतिकारक (एचटीबीटी) कापूस वाणाला अद्याप केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने परवानगी दिलेली नाही. गेल्या काही वर्षांत या अनधिकृत बियाण्यांचा पुरवठा करण्यात येत आहे. या व्यवहाराचे कोणतेही अधिकृत दस्तऐवज दिले जात नाही. त्यामुळे हे बियाणे न उगवल्यास शेतकऱ्यांना कोठेही दाद मागता येत नाही. काही नवखे शेतकरी मात्र बियाणे माफियांच्या आमिषाला बळी पडत आपले नुकसान करून घेतात. कृषी विभागाने देखील यंदाच्या हंगामात बियाणे माफियांवर कारवाईसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. 

नागपूर विभागात बियाणे माफियांवर आठ कारवाया करण्यात आल्या. या माध्यमातून १५५७३ पाकीटबंद, तसेच चार हजार १०० किलो खुले बियाणे जप्त करण्यात आले. या बियाण्यांची किंमत एक कोटी ८९ लाख ७९ हजार ३९३ रुपये आहे. याप्रकरणी तब्बल १६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील बेला, केळवद, कळमेश्‍वर. चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर शहर, पाटण, गडचिरोली जिल्ह्यात आष्टी व अहेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत या आठ कारवाया करण्यात आल्या. 

अमरावती विभागात सहा कारवायांमध्ये सहा लाख ५० हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. वाशीम जिल्ह्यातील मानोरा, अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, तिवसा, यवतमाळ जिल्ह्यात वनी, राळेगाव, दारव्हा या तालुक्यांमध्ये अनधिकृत बियाणेप्रकरणी कारवाई करण्यात आली. मानोरा येथे पाच लाख ९०४ रुपये चांदूर रेल्वे येथे २९ हजार १४६, यवतमाळ येथे एक लाख ८५ हजार ६१४ या प्रमाणे मोठ्या कारवाया करण्यात आल्या. नागपूर विभागाच्या तुलनेत यंदा अमरावती विभाग मात्र कारवायांमध्ये पिछाडला आहे.  आंध्र प्रदेश, तेलंगणातून आवक  नागपूर विभागातील काही जिल्ह्यांच्या सीमा या आंध्र प्रदेश तसेच तेलंगणाशी जुळलेल्या आहेत. या दोन्ही राज्यांतून मोठ्या प्रमाणावर ‘एचटीबीटी’ची आवक महाराष्ट्रात होते. चंद्रपूर-गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये साठवणूक करून तेथून मग विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये पुरवठा केला जातो. यंदा मात्र कृषी विभागाने पुरवठादारांवरच लक्ष केंद्रित केले. परिणामी, विदर्भात ‘एचटीबीटी’चा अपेक्षित पुरवठा रोखता आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com