मजूरांना घेऊन २५ ट्रेन्स राज्यातून रवाना

लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या मजुरांना घेऊन आतापर्यंत २५ ट्रेन रवाना झाल्याची माहिती प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनी बुधवारी (ता.६) राज्‍य मंत्रिमंडळ बैठकीत दिली.
migrant-worker
migrant-worker

मुंबई: लॉकडाउनमुळे राज्यात अडकलेल्या मजुरांना घेऊन आतापर्यंत २५ ट्रेन रवाना झाल्याची माहिती प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनी बुधवारी (ता.६) राज्‍य मंत्रिमंडळ बैठकीत दिली. राज्‍यांतर्गत अडकलेल्‍यांनाही आपापल्‍या घरी जाता यावे यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबतही मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. पश्चिम बंगाल आणि कर्नाटक ही दोन राज्ये वगळता इतर राज्यांशी पार पडलेल्या चर्चेनुसार त्या राज्यांचे कामगार पाठविण्यास सुरुवात झाली आहे. देशात आत्तापर्यंत १०० रेल्वे या श्रमिकांची वाहतूक करीत असून महाराष्ट्रातून २० टक्के श्रमिकांनी लाभ घेतला आहे, असे बैठकीत सांगण्यात आले. महाराष्ट्रातून देशाच्या विविध राज्यांमध्ये परतणाऱ्या मजूर, कामगार आणि इतर व्यक्तींच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा मंत्रिमंडळाने घेऊन समाधान व्यक्त केले. महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली येथे बाहेरील राज्यातून श्रमिकांना घेऊन मंगळवारपर्यंत २ रेल्वे आल्या. युपीएससीच्या दिल्ली येथील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात रेल्वेशी बोलणी झाली असून लवकरच त्यांना भुसावळ येथे आणले जाईल. केवळ मध्यप्रदेश सरकारने त्यांच्या राज्यातील श्रमिकांसाठी रेल्वेचे सर्व पैसे भरल्याची माहिती ही देण्यात आली. या श्रमिकांना प्रत्येक डब्यात ५० जण असे सुरक्षित अंतर ठेऊन पाठविण्यात आले. त्यांना मास्क, जेवण, पाणी, पुरविण्यात आले, अशी माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातून स्वत:च्या वाहनाने इतर राज्यांत तसेच इतर जिल्ह्यांत जाण्यासाठी आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार ई-पासेस देण्यात आले आहेत. एसटी बसेसचे नियोजन ही वाहतुकीच्या दृष्टीने पुढील काळासाठी तयार आहे, असे डॉ. करीर यांनी सांगितले. परराज्यांतील लोकांप्रमाणे राज्यांतर्गत अडकलेल्या लोकानांही आपापल्या घरी जाण्यासाठी मंत्रिमंडळ सदस्यांनी सूचना केल्या.  डॉ. संजय ओक यांनीही बैठकीला उपस्थित राहून कोरोना विषयक वैद्यकीय आघाडीवर काय उपाय योजना आणि काळजी घेण्यात येत आहे त्याची माहिती दिली. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ . प्रदीप व्यास आणि मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यावेळी सादरीकरण केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com