राज्यात २६९ बाजार समित्या सुरु असल्याचा ‘पणन’चा दावा 

कोरोना लॉकडाऊनमध्ये बाजार समित्या सुरु ठेवण्याची भूमिका शासनाची होती आणि आहे. यासाठी सातत्याने विविध उपाययोजना आणि खबरदारी घेण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सातत्याने देण्यात आल्या आहेत. मात्र काही ठिकाणी कोरोनाचे वाढते रुग्ण, बाजार समित्या ज्या भागात आहेत. ते भाग हॉटस्पॉट म्हणून स्थानिक प्रशासनाने सिल केल्याने बाजार समित्या बंद आहेत. तर काही ठिकाणी कामगार नसल्याने बंद आहेत.अशा परिस्थितीत वारंवार सूचना करत आहोत. गुरुवारी (ता.१६) ३०५ पैकी २६९ बाजार समित्या सुरु होत्या. - सुनील पवार, पणन संचालक
राज्यात २६९ बाजार समित्या सुरु असल्याचा ‘पणन’चा दावा 
राज्यात २६९ बाजार समित्या सुरु असल्याचा ‘पणन’चा दावा 

पुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये बाजार समित्यांच्या कामकाजात विस्कळीतपणा आला आहे. स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या आदेशामुळे काही बाजार समित्या बंद आहेत. तर काही ठिकाणी अडते, कामगार संघटनांच्या आडमुठेपणामुळे बंद आहेत. मात्र आता स्थानिक पोलीस, महसूल आणि बाजार समिती प्रशासनाने समन्वयाने बाजार समित्या सुरु करण्याच्या भूमिकेमुळे राज्यातील ३०५ बाजार समित्यांपैकी २६९ समित्या सुरु असून ३६ बंद असल्याचे पणन संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  कोरोना लॉकडाऊनमध्ये सामाजिक अंतरासह विविध उपाययोजना आणि खबरदारी घेण्याच्या सूचनांसह बाजार समित्या सुरु ठेवण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र अनेक ठिकाणी स्थानिक पोलीस, महसूल प्रशासनाच्या विसंवादामुळे आणि वेगवेगळ्या आदेशांमुळे बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र कोणताही पर्याय न देता बाजार समित्या बंद ठेवल्यामुळे शेतमालाचा उठाव थांबल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तर शहरांमध्ये भाजीपाल्याचा तुटवडा झाल्याने ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दराने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.  मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शहरातील नागरिकांना भाजीपाला मिळत नसल्याने होत असलेल्या कोंडीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न उभा राहिला. तर शेतकऱ्यांचा देखील दबाव वाढल्याने अखेर बाजार समित्या टप्प्याटप्प्याने सुरु होऊ लागल्या आहेत. गुरुवारी (ता.१६) राज्यातील ३०५ बाजार समित्यांपैकी २६९ बाजार समित्या सुरु असल्याचा दावा पणन संचालनालयाने केला आहे. तर ३६ बाजार समित्या बंद असल्याचे सांगितले आहे.  दरम्यान, राज्यातील महत्त्वाच्या असलेल्या मुंबई आणि पुणे बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत होत असून, पुणे बाजार समितीचे मुख्य आवार हॉटस्पॉटमुळे बंद असून ४ उपबाजार आजपासून (ता.१६) सुरु झाले आहेत. चार उपबाजारांमध्ये २४८ वाहनांमधून सुमारे साडेपाच हजार क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती.  बंद असलेल्या बाजार समित्या  अकलूज, करमाळा, कुर्डूवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सोलापूर, भोर, इस्लामपुर, पारनेर, धडगांव, घोटी, कळवण, सुरगणा, कोपरगाव, चांदवड, मालेगाव, मनमाड, नागपूर, सटाणा, उमराणे, शेवगांव, नेवासा, हिंगोली, बीड, कडा, माजलगाव, परळी, पातोडा, वडवणी, अहमदपुर, कळंब, उस्मानाबाद, अंजनगाव सुर्जी, चिखली, मंगरुळपीर   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com