अकोला जिल्ह्यात पावणेतीन लाख कुटुंबे पात्रतेची शक्यता

अकोला जिल्ह्यात पावणेतीन लाख कुटुंबे पात्रतेची शक्यता
अकोला जिल्ह्यात पावणेतीन लाख कुटुंबे पात्रतेची शक्यता

अकोला :  शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबांची माहिती संकलित करण्याची कार्यवाही ग्राम स्तरावर होणार आहे. याकरिता तलाठ्याच्या नेतृत्वाखाली ग्रामसेवक, कृषी सहायक व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ७ ते १० फेब्रुवारीदरम्यान ही समिती गावनिहाय पात्र खातेधारक शेतकऱ्यांची यादी तयार करणार असून, १० ते १२ फेब्रुवारीदरम्यान कुटुंबनिहाय वर्गीकरण केले जाणार आहे. अकोला जिल्ह्यात सुमारे दोन लाख ६२ हजारपर्यंत शेतकरी कुटुंब यासाठी पात्र ठरण्याचा अंदाज अाहे. पात्र शेतकरी कुटुंबांची निश्चिती करणे आणि याकरिता राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, कृषी गणना २०१५-१६ व नैसर्गिक आपत्ती अनुदानवाटपाकरिता तयार करण्यात आलेली माहिती प्राप्त घेऊन विहित नमुन्यात नोंद करणे. योजनेची गावात व्यापक प्रसिद्धी करून मोहीम स्वरूपात गावातील शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक ही माहिती संबंधितांच्या सहमतीने प्राप्त करणे व त्याच्या नोंदणी विहित नमुन्यात करण्याची जबाबदारी ग्रामस्तरीय समितीची राहणार आहे. त्यानंतर १५ ते २० फेब्रुवारीदरम्यान पात्र शेतकरी कुटुंबांची यादी गावामध्ये प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागविल्या जातील. त्यानुसार पात्र शेतकरी कुटुंबांच्या यादीमध्ये आवश्यक दुरुस्त्या करून पात्र शेतकरी कुटुंबांची अंतिम यादी २० ते २१ फेब्रुवारीदरम्यान तहसीलदार कार्यालयात सादर केली जाईल. ज्या कुटुंबांचे सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक एकूण कमाल धारणक्षेत्र दोन हेक्टरपर्यंत असेल त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. पती, पत्नी आणि त्यांची १८ वर्षांखालील मुले म्हणजे एक कुटुंब असे वर्गीकरण करण्यात येणार असून, १ फेब्रुवारी २०१९ रोजी खातेधारकाने धारण केलेले क्षेत्र विचारात घेतले जाणार आहे. ग्रामस्तरीय समितीने दिलेला निर्णय मान्य नसल्यास तालुकास्तरीय समितीकडे दाद मागता येईल. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालीसुद्धा एक समिती स्थापन करण्यात आली असून, यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषिअधिकारी, डीस्ट्रिक्ट डोमेन एक्स्पर्ट, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी हे सदस्य असतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com