राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत; उपाययोजनांसाठी समिती

राज्यातीलसुमारे २८० बाजार समित्यांनालॉकडाऊनमुळे कोणते दूरगामी परिणाम होऊ शकतात, कोणते बदल, उपाय योजना कराव्यात याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे.
280 market committees in the state are in trouble
280 market committees in the state are in trouble

लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या सुमारे २८० बाजार समित्यांना कोरोना कोविड १९ च्या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. याचे दूरगामी परिणाम बाजार समित्यांवर होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन आता शासनाने बाजार समित्यांवर कोणते दूरगामी परिणाम होऊ शकतात, अशा वेळी बाजार समित्यांत कोणते बदल अपेक्षीत आहेत, कोणत्या उपाय योजना केल्या गेल्या तर या बाजार समित्यांचे भवितव्य चांगले राहील याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे.

ही समिती बाजार समित्यांचे व्यवस्थापन, व्यापारी, अडत्यांच्या अडचणी, ऑनलाइन व्यवहार, डिजिटल पेमेंट अशा विविध घटकांचा अभ्यास करून त्याचा अहवाल शासनास सादर केला जाणार आहे.

राज्यात ३०७ बाजार समित्या आहेत. यातील वीस ते पंचवीस बाजार समित्या कागदोपत्रीच आहेत. सुमारे २८० बाजार समित्या कार्यरत आहेत. लॉकाडऊनच्या सुरुवातीच्या काळात या सर्वच समित्यांना फटका बसला. अनेक दिवस कामच सुरू होऊ शकले नाही. शिथिलता मिळाल्यानंतर हळूहळू बाजार समित्या सुरू झाल्या. आजही राज्यात २५० च्या दरम्यान बाजार समित्या सुरू आहेत. रेडझोन आणि कंटेन्मेंट झोनमधील बाजार समित्या बंद आहेत.

सुरू राहिलेल्या समित्यांना फटका मार्च एप्रिलचा कालावधी बाजार समित्यांसाठी महत्त्वाचा असतो. आवक मोठ्या प्रमाणात येते. यावर्षी लॉकडाऊनमुळे अनेक निर्बंध आले. गर्दी होऊ नये म्हणून दररोज एक दोन तास बाजार सुरू राहिला. अत्यंत कमी आवक घेण्यात आली. याचा मोठा फटका बाजार समित्यांना बसला आहे. तर दुसरीकडे भाजीपाला, फळांच्या बाजारात शेतकऱ्यांनी थेट ग्राहक शोधत नवीन मार्ग धरला. याचाही परिणाम झाला आहे.

समित्यांना बदलावे लागणार कोरोनाने सगळ्यांचीच जीवनशैली बदलली आहे. बाजार समित्यांनाही बदलावे लागणार आहे. ई नाम सारखी चांगली योजना व्यापारी आणि अडत्यांमुळे अडचणीत आली. पण आता बदलत्या काळात हीच ई नाम योजना महत्त्वाची ठरू शकणार आहे. स्पर्धा निर्माण झाली तर तशी चांगली सेवाही देता येणार आहे. ऑनलाइन मार्केटिंग, ई पेमेंटचा मार्ग आता बाजार समित्यांना धरावा लागणार आहे. त्या दृष्टीने देखील ही समिती अभ्यास करण्याची शक्यता आहे.

प्रतिनिधी अन् अधिकाऱ्यांची समिती राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजनेचा अभ्यास करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष पणन संचालक सुनील पवार हे आहेत. समितीत मुंबई बाजार समितीचे सभापती ए. के. चव्हाण, पुणे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, लातूर बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, वर्धा बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, जळगाव बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, बारामती बाजार समितीचे सभापती अरविंद जगताप, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक हे सदस्य आहेत. तर सदस्य सचिव पणन संचालनालयाचे सहसंचालक विनायक कोकरे हे आहेत.

लॉकडाऊनमुळे बाजार समित्यांवर परिणाम झाला आहे. या काळात पर्यायी व्यवस्थाही निर्माण झाल्या आहेत. बाजार समित्या बदलल्या नाहीत तर पुढचा काळ अवघड आहे. ई-नाम, ऑनलाइन मार्केटिंग, ई पेमेंट असे अनेक बदल पुढच्या काळात स्वीकारावे लागणार आहेत. उत्पन्न कमी झाले आहे. खर्चही कमी करावा लागणार आहे. व्यापारी, अडत्यांनाही बदलावे लागणार आहे. या सर्वांचा अभ्यास ही समिती करेल. यामध्ये बाजार समित्यांचे प्रतिनिधी आणि अधिकारी असल्याने सर्वच घटकांचा अभ्यास केला जाणार आहे. - सुनील पवार, संचालक, पणन मंडळ, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com