गिरणा, वाघूरमध्ये २९ टक्केच पाणीसाठा

गिरणा, वाघूरमध्ये २९ टक्केच पाणीसाठा
गिरणा, वाघूरमध्ये २९ टक्केच पाणीसाठा

जळगाव : जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये समाविष्ट असलेल्या गिरणा व वाघूर धरणांतील साठा २९ टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे. पिकांसाठी कुठलेही पाणी या प्रकल्पांमधून देण्यात येणार नसल्याची स्थिती आहे. 

पिण्याच्या पाण्यासंबंधी गिरणा धरणातून तिसऱ्या आवर्तनाची मागणी सुरू झाली आहे. परंतु घटता जलसाठा लक्षात घेता प्रशासन तिसरे आवर्तन सोडण्यासाठी सकारात्मक कार्यववाही करील की नाही, असा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. वाघूरमधून फक्त एकदाच आवर्तन सोडण्यात आले होते. नंतर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली, परंतु दुसरे आवर्तन सोडण्यात आले नाही. सद्यःस्थितीत वाघूर धरणाच्या पाण्यावर जळगाव व जामनेर शहराच्या पाणीपुरवठ्यासंबंधी आरक्षण आहे. यामुळे शेतीसाठी पाणी या धरणातून मिळणार नाही, असे चित्र आहे.

तापी नदीवरील मुक्ताईनगर तालुक्‍यानजीकच्या हतनूर धरणातूनही रब्बीसाठी आवर्तनाची मागणी मागील महिनाभरापासून केली जात आहे. मध्यंतरी लोकप्रतिनिधींनीदेखील या पाण्यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. परंतु आवर्तन सोडण्याचा निर्णय प्रलंबित आहे. हतनूर प्रकल्प १०० टक्के भरला होता. वाघूर व गिरणामध्ये अनुक्रमे ४६ व ४७ टक्के जलसाठा होता. हा साठा झपाट्याने कमी झाल्याने जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील जलसंकट वाढेल, असे चित्र आहे. 

जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये रावेरातील सुकी, अभोरा व मंगरूळचा समावेश असून, या तीन्ही प्रकल्पांमध्येही ६० टक्‍क्‍यांपर्यंत जलसाठा आहे. चोपडानजीकच्या अनेर प्रकल्पातून रब्बीसाठी दोन आवर्तने सोडण्यात आली आहेत. यातही सद्यःस्थितीत ५५ टक्के जलसाठा आहे. चोपडामधील गूळ प्रकल्पातून नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. या प्रकल्पात सुमारे ५० टक्के जलसाठा आहे.

पाणीसाठा स्थिती चिंताजनक  जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील चाळीसगावमधील मन्याड प्रकल्प कोरडाठाक आहे. पाचोरामधील बहुळा, पारोळा व एरंडोललगतचे अंजनी, भोकरबारी, बोरी हे प्रकल्पदेखील कोरडेच आहेत. अग्नावती व हिवरामध्ये अनुक्रमे सुमारे २५ व ५ टक्के जलसाठा आहे. जामनेरातील तोंडापूर प्रकल्प पाच टक्के भरला होता. त्यातही शून्य टक्के साठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com