पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्ज

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया २९ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये संचालकाच्या २१ जागांसाठी २९९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
299 applications for 21 seats
299 applications for 21 seats

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया २९ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये संचालकाच्या २१ जागांसाठी २९९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी (ता. ७) उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली असून, येत्या २२ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी दिली.   बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सोमवारी (ता. ६) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि भाजप या प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विद्यमान संचालक बाळासाहेब नेवाळे, आमदार अनिल भोसले, तुकाराम देवकाते, वर्षा शिवले यांनी या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत. उर्वरित सर्व विद्यमान संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार दिलीप मोहिते, संजय जगताप, अशोक पवार संग्राम थोपटे यांचेही उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. महिला संचालक पदासाठी दोन जागा आहेत. या दोन जागांसाठी ४१ उमेदवारी अर्ज महिला गटातून आले आहेत. या निवडणुकीत प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने महिला उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. अनेक इच्छुकांनी दोन ते तीन गटांतून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे बँकेच्या आजवरच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज आले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, विश्‍वास देवकाते, सविता दगडे, सतीश खोमणे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.

दिलीप वळसे पाटील बिनविरोध  राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. आंबेगाव सोसायटी मतदारसंघातून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. त्यांच्या गटात ५७ मतदार होते. यंदाच्या हंगामातील बिनविरोध निवडून जाणारे दिलीप वळसे पाटील पहिले मंत्री ठरले आहेत. ते जवळपास १९९१ पासून जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे देखील जिल्हा बँकेच्या रिंगणात आहेत

एका उमेदवाराने भरले ३४ अर्ज  सहकार कायद्याचा गैरफायदा घेत जुन्नर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक संजय काळे यांनी विरोधी उमेदवाराला सूचक मिळू नये म्हणून अ वर्ग सोसायटी गटातून तब्बल ३४ अर्ज दाखल केले आहेत. इतरही काही विद्यमान संचालकांनी सात- आठ अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्याचे राजकारण आणि ग्रामीण भागातील नाडी ताब्यात ठेवण्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक महत्त्वाची मानली जाते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com