30 hectares of land to be acquired for Boramani Airport
30 hectares of land to be acquired for Boramani Airport

बोरामणी विमानतळासाठी संपादित होणार ३० हेक्‍टर जमीन

सोलापूर : सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्‍न सातत्याने समोर येऊ लागला आहे. होटगी रोडवरील विमानतळावरून सोलापूरची विमानसेवा सुरू होण्याची शक्‍यता आता जवळपास मावळली आहे. बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोलापूरची विमानसेवा सुरू होण्याची शक्‍यता आहे. बोरामणी विमानतळासाठी २९.९५ हेक्‍टर जमिनीचे भूसंपादन बाकी आहे. २८ जणांकडून ही जमीन संपादित केली जाणार आहे. या आठवड्यात भूसंपादन प्रक्रियेला अधिक गती येणार आहे.

दक्षिण सोलापूरच्या प्रांत कार्यालयाच्या वतीने ही जमीन संपादित करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. २८ शेतकऱ्यांना या कार्यालयाच्या वतीने खरेदीपूर्व जाहीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. खासगी वाटाघाटीद्वारे या जमिनीचे संपादन होणार आहे. या जमीन संपादनावर प्रांत कार्यालयाकडून १२ मार्चपर्यंत हरकती व दावे मागविण्यात आले आहेत. १२ मार्चनंतर आलेल्या हरकती व दाव्यांवर सुनावणी होणार आहे. खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादन न झाल्यास या जागेचे सक्तीने भूसंपादन करण्याची तयारी देखील उपविभागीय अधिकारी कार्यालयाने केली आहे.२०१४ मध्ये राज्यात सत्तेवर असलेल्या आघाडी आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या यूपीए सरकारने बोरामणी विमानतळाला प्राधान्य दिले होते. गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने होटगी रोडवरील विमानतळाला प्राधान्य दिले होते.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्या वतीने विमानतळासाठी भूसंपादन केले जात असून नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या विमानतळाच्या भूसंपादनासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने सोलापूरच्या विमानसेवेसाठी बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्राधान्य दिले आहे. कमीत-कमी कालावधीत हे विमानतळ कार्यान्वित करण्यासाठी सरकारने जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला सूचना दिल्या आहेत.

बोरामणी विमानतळासाठी आवश्‍यक असलेल्या जमिनीचे खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादन करण्यासाठी प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या प्रक्रियेतून बाधित शेतकऱ्यांना सुधारित कायद्याप्रमाणे जास्तीत जास्त मोबदला देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ग्रामस्थांसोबत प्रशासनाची यापूर्वी एक बैठक झाली आहे. दुसरी बैठकही  लवकरच होणार आहे.  - ज्योती पाटील, उपविभागीय अधिकारी, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com