पुराच्या विळख्यात अजूनही ३० गावे

पूरस्थिती
पूरस्थिती

पुणे : महापुराचा तडाखा बसलेल्या सांगली, कोल्हापूरमध्ये अजूनही धोका पातळीपेक्षा पाच फूट वर पाणी असून ३० गावे पुराच्या विळख्यात आहेत. हेलिकॉप्टर्स, बोटींसह आता वाहनांमधूनही मदतीचा ओघ पूरग्रस्त भागाकडे सुरू झाला आहे. दरम्यान, जनजीवन त्वरेने पूर्वपदावर आणण्यासाठी पूरग्रस्त ग्रामपंचायती, नगरपालिका व महापालिकांना निविदा काढून खासगी मनुष्यबळ व सामग्री पुरविण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 

या भीषण आपत्तीमधील बळींची संख्या आता ४३ झाली आहे. तीन जण बेपत्ता असून, चार लाख ७४ हजार नागरिक स्थलांतरित झालेले आहेत. यात सांगलीत एक लाख ८५ हजार, तर कोल्हापूरला दोन लाख ४७ हजार नागरिक आश्रयाला आले आहेत. त्यांना ५९६ निवारा केंद्रांमधून मदत दिली जात आहे. सोमवारी सांगलीतून तीन व कोल्हापूरमधून चार उड्डाणे घेऊन हेलिकॉप्टरमधून मदत पोचविली गेली. 

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी वार्ताहरांना सांगितले की, ‘‘आलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढविण्यात आला आहे, त्यामुळे पूर पातळी झपाट्याने उतरते आहे. तरीही सांगलीत ४५ फूट धोका पातळी असताना, तेथे अद्याप ५०.२ फूट पूर पातळी आहे. कोल्हापूरची धोका पातळी ४३ फूट असताना ४८ फुटांवर पाणी वाहते आहे. मात्र, पुणे-बंगलोर महामार्ग सुरू झाल्याने गॅस, पेट्रोल, डिझेल, पाणी, औषधे व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा वाढविला गेला आहे. 

आलमट्टीतून पावणेसहा लाखाने विसर्ग  आलमट्टी धरणात सध्या पाण्याची आवक प्रतिसेकंदाला ६.९० लाख क्युसेकने होत असून, विसर्ग मात्र ५.७० लाखाने सुरू आहे. कोयना धरणात ४४ हजार ३५७ क्युसेक पाणी गोळा होत असून ५३ हजार ८८२ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही १२८ टक्के, कोल्हापूरला १२९ टक्के, तर सातारा भागात १८३ टक्के पाऊस झाला आहे. ही स्थिती अभूतपूर्व असल्यामुळे पुराचे संकट ओढवले, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

वेढा पडलेल्या गावांमध्ये नागरिक सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार सांगलीत १२ गावांना, तर कोल्हापूरच्या चार तालुक्यांतील १८ गावे पुराने वेढलेली होती. त्यात शिरोळमधील ९, गगनबावडा एक, करवीर ३, तर हातकणंगलेमधील पाच गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये अजून स्वतःहून नागरिक थांबलेले आहेत. मात्र, तेथे बोटीमार्फत अत्यावश्यक वस्तू पाठविल्या जात आहेत, असे विभागीय आयुक्तांनी सांगितले. 

जिल्हाधिकाऱ्यांना पैसे काढण्याचे अधिकार महापुरातील मृतांच्या आप्तेष्टांना तातडीची मदत देण्यासाठी निगेटिव्ह बॅलन्सने (खात्यात रक्कम नसली तरी) पैसे काढण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोल्हापूर व सांगलीतील ३१३ एटीएम सुरू करून २५ कोटींची रोकड भरण्यात आली आहे, त्यामुळे पूरग्रस्तांना तातडीने रोख रकमेचे वाटप करणे शक्य होणार आहे. 

३२ ट्रक मदत प्रशासनाने पाठविली  पूरग्रस्तांसाठी प्रशासनाने ३२ ट्रक मदत रवाना केली आहे. याशिवाय बाहेरील १५ ट्रक पाठविले गेले आहेत. यात सांगलीला ३० तर कोल्हापूरला १७ ट्रक गेले आहेत. कोल्हापूरचे रस्ते उशिरा मोकळे होत असल्याने तेथे मदतीचे ट्रक कमी पोचले आहेत. साखर आयुक्तालयात अजून मदतीचे १२ ट्रक थांबलेले आहेत.   टूथब्रशपासून ते पिठापर्यंत एकूण ३० वस्तू असलेले किट तयार करण्याचा प्रयत्न आता प्रशासन करते आहे. सुट्या स्वरूपात मदत दिल्याने होणारी गैरसोय यातून टळणार आहे. पूरग्रस्तांना मदत केंद्रातून घराकडे जाताना शासनाकडून १० किलो गहू व १० किलो तांदूळ दिला जाणार आहे. शालेय सामग्री, पूल, रस्ते, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांची दुरुस्ती करावी लागेल. शासकीय इमारती व घरांची पडझड सर्वे केला जाईल. आवश्यक तेथे स्थलांतर केले जाईल.  

कोल्हापूरला एसटीचे मार्ग सुरू पूरग्रस्त भागात आता एसटी वाहतूक प्रथमच सुरू झाली आहे. कोल्हापूरला ३१ पैकी १५ आणि सांगलीत ४५ पैकी १५ मार्ग सुरू केले गेले आहेत. सर्व गावांमधील रस्ते प्रथम दुरुस्त करा, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला दिल्या आहेत. 

मुख्यमंत्र्यांकडून दोन वेळा आढावा मुख्यमंत्र्यांनी सोमवारी पूरग्रस्त स्थितीचा दोन वेळा आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांना खासगी संस्थांद्वारे मनुष्यबळ व सामग्री पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. गावांतील पाणी ओसरताच ही रसद विविध भागांकडे रवाना होणार आहे.  

जादा भावाने विक्री रोखण्यासाठी पथके   पूरग्रस्त नागरिकांची अडचण पाहून जादा भावाने वस्तूंची विक्री केल्याच्या तक्रारी येत आहेत, त्यामुळे राज्याच्या पुरवठा मंत्रालयाशी डॉ. म्हैसेकर यांनी संपर्क साधला. या समस्येला नियंत्रणात आणण्यासाठी वजन मापे निरीक्षकांची पथके नेमून कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पाच हजार कृषी रोहित्रे बंद  पुरामुळे पुणे विभागात २६ उपकेंद्रे अजूनही बंद पडलेली आहेत. यात तीन हजार ५१० बिगरकृषी, तर पाच हजार ४५ कृषी रोहित्रे आहेत. प्रथम निवासी व नंतर कृषी रोहित्रांची दुरुस्ती होणार आहे. कोल्हापूरची पाच उपकेंद्रे व ५६२ रोहित्रे सुरू केली गेली आहेत. सांगलीतही तीन उपकेंद्रे व ५३३ रोहित्रे सुरू केली गेली. 

साताऱ्यात भैरवगड डोंगर खचला राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, की सातारा जिल्ह्यातील भैरव गड डोंगर खचला. तेथे ११३ घरे माळीणप्रमाणे बाधित झाली असून ६५० लोक बेघर झाले. मी स्वतः गावाला भेट दिली. या गावाचे पुनर्वसन तात्पुरते करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com