शेतकरी कुटुंबातील ३३ रणरागिण्या पोलिस सेवेत

प्रचंड इच्छाशक्ती आदी कारणांमुळे माळेगाव (ता. बारामती) येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या ३३ रणरागिण्या यंदा पोलिस सेवेत भरती झाल्या. तसेच तीन युवकांना पोलिस सेवेत काम करण्याची संधी मिळाली.
33 Ranaraginis from a farming family in the police service
33 Ranaraginis from a farming family in the police service

माळेगाव, जि. पुणे ः शेती व शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील युवतींमधला कणखरपणा, क्रीडा संकुलातील भरतीपूर्व अद्ययावत प्रशिक्षण आणि संबंधित युवतींच्या मनात ध्येय साध्य करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आदी कारणांमुळे माळेगाव (ता. बारामती) येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये प्रशिक्षण घेतलेल्या ३३ रणरागिण्या यंदा पोलिस सेवेत भरती झाल्या. तसेच तीन युवकांना पोलिस सेवेत काम करण्याची संधी मिळाली. 

या यशस्वी पोलिस काॅन्स्टेबल झालेल्यांचा सन्मान शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, माळेगावचे माजी संचालक दीपक तावरे, प्रशिक्षक लक्ष्मण भोसले यांच्या हस्ते झाला. गुरुवारी (ता. १३) पार पडलेल्या आनंदसोहळ्याची क्षणचित्र पाहून उपस्थित काही पालकांसह मुलींना अक्षरशः अश्रू अनावर झाले. 

या वेळी बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, छत्रपती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रेय येळे, प्रमोद जाधव, प्रा. अनिल धुमाळ, विजय भोसले, योगेश भोसले, प्रणव तावरे, नितीन तावरे, प्रशिक्षक राहुल पवार, कीर्ती पवार, अनिल काटे, राहुल घुले आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

दरम्यान, सौ. पवार म्हणाल्या, ‘‘माळेगावच्या यशस्वी मुलींनी स्वयंपूर्ण होऊन आपल्यासाठी एक वेगळी वाट निवडली. खाकी वर्दीतील रुबाबदार मुलगी जेव्हा गणवेशात घरी जाईल, त्या वेळी पालकांसह समाजाचा नक्की अभिमानाने ऊर भरून येईल. ग्रामीण भागातील होतकरू व गरीब मुलामुलींना पोलिस दलासह विविध क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. परंतु माळेगावच्या युवतींनी कणखरपणाच्या जोरावर व प्रशिक्षक लक्ष्मण भोसले, दीपक तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे यश संपादन केले याचा मला मनस्वी आनंद आहे,’’ असे मत त्यांनी व्यक्त केले.

तत्पूर्वी प्रशिक्षक श्री. भोसले यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितले, की अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे माळेगावात उभारलेले क्रीडा संकुल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या करियरसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. सन २०१४ पासून या क्रीडा संकुलामध्ये भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या २८० युवती पोलिस सेवेत दाखल झाल्याची नोंद आहे. त्यामध्ये यंदा ३६ मुलामुलींचा समावेश आहे.

मैदानाचे वैभव वाढणार...!  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडून माळेगाव क्रीडा संकुलामधील रनिंग ट्रॅक दुरुस्तीसाठी ७० लाख रुपयांचा फंड उपलब्ध करून दिला आहे. त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. यामुळे निश्‍चित मैदानाचे वैभव वाढेल, अशी माहिती दीपक तावरे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com