टॅंकर
टॅंकर

पाण्यासाठी धावताहेत सव्वातीन हजार टॅंकर

पुणे : राज्यात उन्हाच्या झळा वाढताच पाणीटंचाईचे संकट वाढू लागले आहे. यंदा टंचाईची दाहकता खूपच अधिक आहे. मार्च महिन्यातच उन्हाचा चटका असह्य झाल्याने पुढील काळात भीषण टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. मार्चअखेरीस राज्यातील २ हजार ६२९ गावे आणि ६ हजार ३१७ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी ३ हजार ३६९ टॅंकर सुरू असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले. नागपूर वगळता इतर सर्व विभागांना पाणीटंचाईने ग्रासले असून, औरंगाबाद विभागात सर्वाधिक टंचाई भेडसावत आहे.   

यापूर्वी २०१६ मध्ये तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. मार्च २०१६ च्या अखेरीस राज्यातील २ हजार ५९९ गावे ३ हजार ८९५ वाड्यांमधील टंचाईग्रस्त नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी ३ हजार ३८४ टॅंकर सुरू होते. यावर्षी त्यापेक्षा अधिक गावे आणि वाड्यांना टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यंदा परतीच्या पावसाने ओढ दिल्याने राज्यातील धरणांतील पाणीसाठा खालावला असून छोटे तलाव, पिण्याच्या पाण्याचे स्राेत कोरडे पडले आहेत. भूजल पातळीतही वेगाने घट होत असल्याने यंदाचा उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याची स्थिती गंभीर होणार आहे. गतवर्षी याचकाळात केवळ टंचाईग्रस्त ४५२ गावे, ३५ वाड्यांसाठीसाठी ४६१ टॅंकरने पाणी द्यावे लागत होते.  

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर या सर्वच जिल्ह्यांत टंचाई वाढू लागली आहे. विभागातील १ हजार ३९२ गावे, ४८२ वाड्यांमध्ये १ हजार ९०० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक ५८३ गावे, २२६ वाड्यांसाठी ८४५ टॅंकर सुरू आहेत. नाशिक विभागातील नगर, नाशिक, धुळे, जळगाव या चार जिल्ह्यांत ६७१ गावे, २ हजार ८५५ वाड्यांना ८६२ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पुणे विभागातील सातारा, पुणे, सांगली आणि सोलापुरात टंचाई वाढल्याने ४१५ गावे, २ हजार ८६९ वाड्यांमध्ये ४५८ टॅंकरने, अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यातील १०६ गावांना ११२ टॅंकरने, तर कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी जिल्ह्यातील ४५ गावे १११ वाड्यांना ३७ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com