गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख टन चारा

गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख टन चारा
गाळपेर क्षेत्रातून उपलब्ध होणार ३४ लाख टन चारा

पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकाही जनावराचे चाऱ्याअभावी कुपोषण होऊ नये म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा आहेत अशा १५१ तालुक्यांतील २ लाख १७ हजार शेतकऱ्यांना चारा बियाणे आणि उत्पादनासाठी निधी देण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून १० कोटी रुपये मंजूर झाले असून, याद्वारे सुमारे ११ लाख टन हिरवा चारा उपलब्ध होणार आहे. सुमारे ८५ हजार हेक्टर गाळपेर करण्यात येणार आहे. याद्वारे ३४ लाख टन चारा उपलब्ध होणार असून यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.  उमाप म्हणाले, की यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत पशुधन जोपासणे हे मोठे आव्हान शेतकरी आणि पशुसंवर्धन विभागावर आहे. चाऱ्याअभावी दुधाळ जनावरांचे कुपोषण होऊन आरोग्याच्या समस्या निमार्ण होऊ नयेत यासाठी हिरवा चारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. चारा उपलब्धीबरोबर शेतकऱ्यांना धान्य मिळण्यासाठी बाजरी, मालदांडी ज्वारी आणि मक्याच्या ११ हजार क्विंटल बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे. सर्व तालुका पातळीवर बियाणे वाटप झाले असून पशुपालक शेतकऱ्यांनी लागवडीचे नियोजन केले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या चारा नियोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती चारा लागवडीचे नियोजन करत आहे. तसेच गाळपेरावरदेखील चारा उत्पादनाचे नियोजन केले असून, धरण आणि तलावांच्या क्षेत्रात प्रत्येक जिल्ह्यात २ हजार हेक्टरवर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. संयुक्त वनव्यवस्थापन समितीद्वारे सुका चारा उपलब्ध करून द्या  वनक्षेत्रावर मोठ्याप्रमाणावर सुका चारा उपलब्ध असून, वणव्यांमध्ये चारा जळून जातो. हे नुकसान टाळून उपलब्ध चारा १२ हजार ५०० संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांद्वारे स्थानिक ठिकाणी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीदेखील पशुसंवर्धन विभागाने पत्राद्वारे प्रधान मुख्यवनसंरक्षक (वनबल) यांच्याकडे केली आहे.  शेतकऱ्यांनी पिकांचे अवशेष जाळू नये राज्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीमुळे चाराटंचाई भासू नये यासाठी शेतकऱ्यांनी गहू, भात, मका, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया या पिकांचे अवशेष जाळू नयेत. तर ते साठवणूक करत पशुधनाला चारा म्हणून द्यावेत. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मागदर्शन करावे, असे आवाहनदेखील कांतीलाल उमाप यांनी केले आहे.  दृष्टिक्षेपात पशुधन 

  • एकूण दुष्काळी तालुके ः १५१. 
  • एकूण दुष्काळी महसूल मंडळे ः २६८. 
  • १५१ तालुक्यांतील मोठी जनावरे ः ७६,६३,७६६, लहान जनावरे - ३१,२९,५८०. 
  • २६८ महसुली मंडळातील मोठी जनावरे ः १९,३८,९६२, लहान जनावरे - ५, ९८,८१५. 
  • एकूण जनावरे ः १,३३,३१,१२३. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com