राज्यातील धरणांमध्ये ३४ टक्के पाणीसाठा

धरणसाठा
धरणसाठा

पुणे : उन्हाच्या झळा वाढू लागताच राज्यावर पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली आहे. यातच राज्यातील धरणांचा पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. शनिवारी (ता.२) राज्यातील मोठे, मध्यम आणि लहान अशा सर्व ३२६७ प्रकल्पांमध्ये ४८४.३२ टीएमसी (३४ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच तारखेला सर्व प्रकल्पांमध्ये सुमारे ४९ टक्के पाणी उपलब्ध होते. त्यातुलनेत यंदा धरणांतील पाणीसाठा स्थिती आणखी गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. यंदा मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील पाणीसाठा सर्वात कमी असल्याने पुढील काळात पाणीसंकट वाढणार आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात धरणांमध्ये अवघा ८ टक्के, पूर्व विदर्भातील नागपूर विभागात १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात आणि उत्तर महाराष्ट्रात नाशिक विभागात सुमारे ३० टक्के पाणीसाठा आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभाग आणि कोकण विभागात साधारणत:  निम्मा पाणीसाठा शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालावरून दिसून येते.  गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यातील धरणांचा पाणीसाठा १६ टक्क्यांनी कमी झाला आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून जवळपास तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने शिल्लक आहे. पाण्याची वाढती मागणी, बाष्पीभवन, गळती व इतर करणांमुळे धरणांतील पाणी कमी होणार असल्याने उर्वरित पाण्याचे काळजीपूर्वक नियोजन करावे लागणार आहे. मराठवाड्यात गतवर्षी ४४ टक्के, तर नागपूर विभागात २३ टक्के, अमरावती विभागात २५ टक्के पााणीसाठा होता. यंदा फेब्रुवारी महिन्यातच छोटे-मोठे बंधारे कोरडे पडले असून, प्रमुख प्रकल्पांचा पाणीसाठा तळाशी गेला आहे. नाशिक विभागाचा पाणीसाठा चिंताजनक नाशिक विभागातील नगर, जळगाव, नाशिक या तीन जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा चिंताजनक स्थितीत पोचला आहे. मुळे (नगर), कडवा, मुकणे, पालखेड, भावली या धरणांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे, तर बहुतांशी धरणाचा पाणीसाठा ३० ते ४० टक्क्यांवर आला आहे. नाशिक विभागातील सर्व प्रकल्पांमध्ये मिळून ६६.५३ टीएमसी (३१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी नाशिक विभागात सुमारे ५१ टक्के पाणीसाठा होता. नाशिक विभागातील मोठ्या २४ प्रकल्पांमध्ये ४४.१३ टीएमसी (३३ टक्के), मध्यम ५३ प्रकल्पांमध्ये १५.२१ टीएमसी (३६ टक्के) आणि लहान ४९४ प्रकल्पांमध्ये ७.१९ टीएमसी (१९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कोकणात निम्मा पाणीसाठा  कोकण विभागातील धरणांचा पाणीसाठा यंदा कमी झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. कोकण विभागात सर्व प्रमुख धरणांमध्ये ६९.३७ टीएमसी (५६ टक्के) पाणी शिल्लक आहे. यात पालघर जिल्ह्यातील कवडास बंधाऱ्यात १००  टक्के, धमणी धरणात ५८ टक्के, ठाणे जिल्ह्यातील उर्ध्व घाटघर धरणात ७६ टक्के, भातसा ५४ टक्के तर निम्म चौंडे धरणात ६२ टक्के आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिल्लारी धरणांत ५४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोकणातील ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये ४६.६८ टीएमसी (५४ टक्के), ७ मध्यम प्रकल्पांमध्ये १२.२१ टीएमसी (७१ टक्के) तर १५८ लघू प्रकल्पात १०.४८ टीएमसी (५३ टक्के) पाणी शिल्लक आहे.  पूर्व विदर्भात गंभीर स्थिती पूर्व विदर्भातील पाणीसाठा स्थिती अधिकच गंभीर झाली आहे. नागपूर विभागातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या २७.७१ टीएमसी (१७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गडचिरोलीतील दिना धरण मृत पातळीत पाचले असून, भंडारा जिल्ह्यातील गोसी खुर्द आणि बावनथडी, गाेंदियातील सिरपूर, नागपूरमधील खिंडसी, तोतलाडोह, नांद, आणि वर्धातील निम्नवर्धा आणि बोर या धरणांमध्ये खूपच कमी पाणीसाठा आहे. नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये १८.९४ टीएमसी (१५ टक्के), ४२ मध्यम प्रकल्पांमध्ये ४.५९ टीएमसी (२० टक्के), तर ३२६ लघुप्रकल्पांत ४.०३ टीएमसी (२३ टक्के) पाणी शिल्लक आहे.

पश्चिम विदर्भात पाणीसाठा ३२ टक्क्यांवर पश्चिम विदर्भातील अमरावती विभागात ४७.२७ टीएमसी (३२ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी अमरावती विभागात २५ टक्के पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठ्याची स्थिती तुलनेने चांगली असली तरी चिंताजनकच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण मृत पातळीत पाचले आहे, तर पेनटाकळी धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. विभागातील उर्वरित धरणात ३० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा आहे. विभागातील १० मोठ्या प्रकल्पांमध्ये २५.६३ टीएमसी (२९ टक्के), २५ मध्यम प्रकल्पांमध्ये ८.७९ टीएमसी (३८ टक्के), तर ४११ लघुप्रकल्पांत १२.८५ टीएमसी (३५ टक्के) पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुणे विभागातील धरणात ४७ टक्के पाणी पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील प्रमुख धरणांमध्ये यंदा २५३.२७ टीएमसी (४७ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १४ टक्के पाणीसाठा कमी असल्याचे दिसून येत आहे. उजनीचा पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. उपयुक्त (चल) पाणीपातळीत गतवर्षी सुमारे ७५ टक्के, तर यंदा अवघे १४ टक्के (७.२३ टीएमसी) पाणी शिल्लक आहे. चल आणि अचल पातळीचा विचार करता धरणात उजनीत ७१ टीएमसी अाणि कोयना धरणात जवळपास ८२ टीएमसी पाणीसाठा आहे. विभागातील ३५ मोठ्या प्रकल्पांमध्ये २१७.८६ टीएमसी (५० टक्के), मध्यम ५० प्रकल्पांमध्ये २३.२९ टीएमसी (४८ टक्के) आणि लहान ६४१ प्रकल्पांमध्ये १२.११ टीएमसी (२४ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील धरणे रिकामी सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाड्याला यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मराठवाड्यातील मांजरा, माजलगाव (बीड), येलदरी (हिंगोली), सिना कोळेगाव (उस्मानाबाद) निम्नदुधना (परभणी) ही धरणे अचल पाणीसाठ्यात गेली आहेत. जायकवाडी वगळता सर्वच धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणात ३.६६ टीएमसी चल, धरणातील अचल पाणीसाठा विचारात घेता २९.७२ टीएमसी (२९ टक्के) पाणी शिल्लक आहे. विभागातील मोठ्या ४५ प्रकल्पांमध्ये ९.०३ टीएमसी (६ टक्के), मध्यम ८१ प्रकल्पांमध्ये ४.३० टीएमसी (१२ टक्के), तर लहान ८३८ प्रकल्पांमध्ये ६.८५ टीएमसी (११ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com